Migration Of Agriculture Labor : वाढते स्थलांतर गांभिर्याने घ्या

कोरडवाहू क्षेत्रातील शेतमजूर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे या सारख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत.
Migration Of Citizens
Migration Of CitizensAgrowon
Published on
Updated on

Agriculture Labor Migration : आज आपण कोरडवाहू शेतीतून (Dryland farming) होणाऱ्या स्थलांतर या विषयावर चर्चा करणार आहोत. कारण ग्रामीण भागातून (Rural Area) शहरी भागात शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. यावर आपली प्रशासन यंत्रणा फारसी गंभीर दिसत नाही.

आज महाराष्ट्रातील वहीती खालील एकूण क्षेत्राच्या जवळपास ७० ते ८० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. हे कोरडवाहू क्षेत्र दिवसेंदिवस लहरी निसर्गचक्रामुळे बेभरवशाचे होत चालले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील शेतमजूर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे या सारख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत.

या स्थलांतरामुळे शहरी नागरी वस्त्या बकाल होत आहेत. शहरी प्रशासन स्थलांतरित मजुरांच्या वस्त्यांना मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे शहरी भागात झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे. याचा परिणाम शहरी प्रशासनावर होऊन मूलभूत सुविधांची वाताहत झाली आहे.

याउलट पर्जन्य छायेतील जी शेती आहे या भागातील खेडी भकास होत चालली आहेत. खेडे गावात फक्त ज्येष्ठ नागरिक नजरेस पडत आहेत. त्याचप्रमाणे उच्च मूल्यवर्धित जे मनुष्यास लागणारे धान्य जसे बाजरी, ज्वारी, मटकी, हुलगे ही पिके पीकपद्धतीतून हद्दपार होत आहेत.

Migration Of Citizens
Sugarcane Cutting labourer : ऊस तोडणीसाठी मजुरांसोबत विद्यार्थ्यांचेही स्थलांतर

याचा परिणाम मनुष्याच्या आहारावर झाला आहे. गव्हासारखे धान्य कमी भावात मिळत असल्यामुळे लोकांच्या आहारात गव्हाचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. सरकारने कितीही गाजावाजा केला तरी भरडधान्य आहारात दुर्मीळ झाले आहे.

ग्रामीण भागातील शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची अवस्था अजून भयानक झाली आहे. काही खेड्यात पहिली ते चौथी पर्यंत २५ ते ३० विद्यार्थीच प्रत्यक्ष हजेरीपटावर आहेत. त्या शाळेवर दोन शिक्षक आहेत.

या शिक्षकांच्या वर कमीत कमी एक लाख रुपयापर्यंत पगारासाठी खर्च केला जातो. इतर सुविधांचा खर्च तर अजून वेगळा आहे. तसेच ऊसतोड कामगारांचा विद्यार्थ्यांचा प्रश्नही दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे.

ऊसतोड कामगारांची मुले जून ते ऑक्टोबर पर्यंत शाळेत पटावर हजर असतात. त्यानंतर त्यांचे पालक ऊसतोडीला गेले की, तेही विद्यार्थी पालकांच्या बरोबर जातात. त्यामुळे स्थलांतराचा परिणाम भावी पिढीवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

शहरात स्थलांतरित झालेले कामगार काम मिळाले नाही की, गैरमार्गाला लागतात. त्याचा प्रतिकूल परिणाम समाज व्यवस्थेवर होत आहे. स्थलांतरित मजूर हे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत.

Migration Of Citizens
Rain Updates: वाई, महाबळेश्‍वरमधील २३३ कुटुंबांचे स्थलांतर

खेडेगावातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याकडे बघण्यासाठी घरी कुणीच नाही. त्यामुळे त्यांचे जीवनही ते अत्यंत हलाखीने जगत आहेत. यातून एवढाच बोध घ्यावा की, शहरात गेलेले युवक व्यसनाधीनतेकडे त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी होत आहे. शहरात गेलेल्या महिला मिळेल त्या मजुरीवर काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.

कोणत्याही मोठ्या शहरात आता समाजात दोनच वर्ग शिल्लक राहिलेले आहेत. एक अति श्रीमंत आणि दुसरे अति गरीब. मधला मध्यम वर्ग हा पूर्णपणे लोप पावत चालला आहे. या स्थलांतराच्या विषयावर शासन-प्रशासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर शहरातील जे स्वतःला सुख वस्तू समजतात त्यांचे जगणे अवघड होईल असे दिसते.

शहरात स्थलांतर केलेल्या मजुरांमुळे शहरातील लोकप्रतिनिधींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा ग्रामीण भागात येणाऱ्या विकास निधीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे गरीब हे गरीबच कायम राहणार आणि श्रीमंत हे कायम श्रीमंतच होत जाणार.

शहरातील निवडणुका ह्या विकास कामावर न लढविता त्या केवळ पैशाच्या जोरावर लढवल्या जात आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या मागे लाचार कार्यकर्त्यांची फौज मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.

(लेखक - दीपक जोशी, जय जवान जय किसान शेतकरी मंडळ, देवगाव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com