Lumpy skin disease Agrowon
संपादकीय

Lumpy Skin Disease : आरपार लढा ‘लम्पी’शी!

Lumpy in Maharashtra : लम्पी’वरील विशिष्ट लस Lumpi-ProVacind निर्मितीची प्रक्रिया देशात सुरू असून, ही लस लवकर निर्माण करावी लागेल. या लसीचा वापर सर्व पशुधनांत करावा लागेल.

Team Agrowon

Animal Diseases : कोरोना महामारीपासून राज्यातील पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायाला लागलेले ग्रहण काही सुटताना दिसत नाही. अस्मानी-सुलतानी संकटांच्या एकापाठोपाठ एक बसत असलेल्या धक्क्याने राज्यातील पशुपालक हतबल झाला आहे. मागील तीन-चार वर्षांत महापूर, चाराटंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर, दुधाला मिळणारा कमी दर अशा संकटांच्या मालिकेबरोबर लम्पी स्कीन या आजाराने पशुपालकांचे मोठे नुकसान केले आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात राज्यात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले होते. त्यानंतर हिवाळा तसेच पुढे उन्हाळ्यात हा आजार बऱ्यापैकी कमी झाला होता. आता पुन्हा या वर्षीच्या पावसाळ्यात लम्पी स्कीनचा विळखा वाढत आहे.

राज्यात सध्या पाच हजारांवर जनावरे बाधित, तर गेल्या दोन महिन्यांत १२२५ पशुधन मृत्युमुखी पडले असल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. मात्र प्रत्यक्षात बाधित आणि मृत जनावरांची संख्या यापेक्षा अधिक असल्याचे पशुपालकांकडून बोलले जात आहे. पुढे पावसाळ्याच्या उर्वरित दीड महिन्यात पाऊस झाला, तर दसरा-दिवाळी काळात या आजाराचे प्रमाण अजून वाढू शकते. गावोगावच्या यात्रा-जत्रांचाही दसरा-दिवाळीनंतर सुरुवात होते. यात पशुधनाचा सहभागही अधिक असतो. याच दरम्यान उसाचा गळीत हंगामही राज्यात सुरू होतो. त्यामुळे ऊस वाहतुकीसाठी पशुधन खासकरून बैल मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. अशावेळी लम्पी स्कीनचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता आहे. अशा एकंदर परिस्थितीमध्ये हा आजार बळावू नये म्हणून सर्वांनीच अतिदक्ष राहायला हवे.

लम्पी स्कीन हा विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू देवी गटातील ‘कॅप्री पोक्स’ या प्रवर्गातील आहे. आपल्या देशात-राज्यात प्रामुख्याने गोवंशात हा आजार आढळत आहे. हा संसर्गजन्य आजार असून याचा प्रसार डास, चावणाऱ्या माश्या, गोचीड आदी कीटकांमार्फत होतो. या आजाराचा विषाणू उत्परिवर्तनातून (म्युटेशन) दिवसेंदिवस अधिक घातक बनत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. राज्यात लम्पी स्कीनला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जातोय. सध्या देण्यात येणारी लस ही लम्पी स्कीनवरची नसून हा रोग टाळण्यासाठी देण्यात येणारी पर्यायी ‘गोट पॉक्स’ लस आहे. या लसीची परिणामकारकता ८० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही २० टक्के जनावरे बाधित होण्याची शक्यता आहे. त्यातच अनेक पशुपालक लहान वासरे, गाभण गाईंचे लसीकरण करून घेत नाहीत. दुर्गम-डोंगराळ भागात लस पोहोचत नाही. त्यामुळे देखील लसीकरणातून अनेक पशुधन सुटतात आणि आजार बळावतो. लम्पीवरील विशिष्ट लस Lumpi-ProVacind निर्मितीची प्रक्रिया देशात सुरू असून, ही लस लवकर निर्माण करावी लागेल. या लसीचा वापर राज्यातील नव्हे तर देशभरातील सर्व पशुधनात करावा लागेल. हे करीत असताना लम्पी स्कीन आजाराची लागण तसेच त्याचा प्रसार होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

बाधित जनावरांचे त्वरित विलगीकरण करून त्यावर शास्त्रशुद्ध उपचार सुरू करावेत. लहान वासरे बाधित जनावरांच्या संपर्कात येऊ देऊ नये. जनावरांचे विलगीकरण झाल्यानंतर गोठा निर्जंतुक करून घ्यावा. लम्पीचा प्रसार कीटकांमार्फत होत असल्याने ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ हे अभियान सर्वांनीच गांभीर्याने घ्यायला हवे. कीटक निर्मूलन मोहीम राज्यभर राबवायला हवी. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या पशुसंवर्धन विभागांच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होईल, ही काळजीही घ्यावी लागेल. या संदर्भात रोगनिदानापासून ते उपचारापर्यंत मनुष्यबळासह कुठल्याही साधनसाहित्याची कमतरता भासणार नाही, हे पशुसंवर्धन विभागाने पाहावे. लम्पी स्कीनशी लढताना पशुसंवर्धन विभागाला इतर विभागांचे सहकार्यदेखील लाभले पाहिजेत. ग्रामविकास, महसूल, सहकार, कृषी, पोलिस यंत्रणा अशा सर्वांनी लम्पी स्कीनसोबतची लढाई जिंकण्यासाठी पुढे आले पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department LOGO : कृषी विभागाचं नवीन 'बोधचिन्ह' आणि 'घोषवाक्य' ठरलं; राज्य सरकारचा निर्णय

Hawaman Andaj: राज्यात थंडी वाढायला सुरुवात; उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट

Post Harvest Tips: काढणीपश्‍चात साठवणीतील नुकसानीची कारणे

PDKV Akola: आत्मनिर्भरतेसाठी राष्ट्र हाच धर्म मानून प्रयत्न हवे; डॉ. गडाख

Rabi Season: रब्बी लागवड अवघी ८.१८ टक्के

SCROLL FOR NEXT