Pune News : राज्यात लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, पशुधनाला विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्यात सद्यःस्थितीत ५ हजार पशुधन बाधित असल्याचा दावा पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे करण्यात आला असला तरी, यापेक्षा जास्त पशुधन बाधित असल्याची वस्तुस्थिती आहे.
राज्यात गेल्या दोन महिन्यांत २ हजार १२५ पशुधन मृत्युमुखी पडले असल्याची अधिकृत आकडेवारी पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात हा आकडा मोठा असल्याचे पशुपालकांकडून सांगण्यात येत आहे.
एकट्या कोल्हापूरमध्ये एक हजारांहून अधिक पशुधन बाधित आहे. तर परभणीमध्ये ६७३, सोलापूरमध्ये ३१९, छत्रपती संभाजीनगर येथे ५१७, नागपूरमध्ये १३८ बाधित असल्याचे समोर येत आहे. तर गेल्यावर्षीचा लम्पीच्या फैलावाचा अनुभव पाहता यावर्षीचा लम्पीचा फैलाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने १ जुलैपासून युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या वर्षभरात राज्यातील ३३८ तालुक्यांमध्ये ४ लाख ९० हजार ८९३ पशुधन बाधित झाली होती. यापैकी औषधोपचाराने ४ लाख ४५ हजार ९८६ पशुधन बरी झाली आहेत. तर आतापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यावर्षी लम्पीची बाधा होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी १ जुलै पासूनच लसीकरणाला प्रारंभ केला आहे.
पुढील दोन महिन्यांत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर गेल्यावर्षी देखील १०२ टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याने पशुधनाला लम्पीची लागण होण्याचा धोका कमी झाल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील सुमारे ८ लाख ४६ हजार गायवर्गीय पशुधनापैकी ३ लाख ८९ हजार पशुधनाला लसीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
६७ लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण
राज्यात ९ ऑगस्टअखेर १ कोटी ३९ लाख ९२ हजार गायवर्गीय पशुधनांपैकी ६७ लाख पशुधनाला लसीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी दिली. तर गोवर्गीय पशुधनाच्या लसीकरणासाठी १ कोटी ४६ लाख लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीनुसार त्यांच्या मुख्यालयी साठा पाठविण्यात आला आहे.
पशुधनात लक्षणे आढळल्यास हे करा...
लम्पी स्किन आजार आटोक्यात असून, पशुपालन आणि शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. गाय किंवा बैलांना अशक्तपणा, ताप आला असल्यास तातडीने स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करून घ्यावेत.
आजारी पशुधनाला इतर पशुधनापासून दूर बांधावे. डांसाची उत्पत्ती होणार नाही याची खबरदारी घेऊन गोठा आणि परिसर स्वच्छ ठेवावा, गोठा निर्जंतुकीकरण करून घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.