Teachers Day Agrowon
संपादकीय

Teachers Day 2023 : जीवन समृद्ध करणारे गुरुजन

Team Agrowon

Teachers Day : खऱ्या अर्थाने कुटुंब शिक्षित आणि शिक्षणामुळे सक्षम होत आहे. मुलामुलींचे शिक्षण समान आहे, याची जागृती शिक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. यामुळे गावातील सर्वच घरातील मुली शिकत आहेत. आज शिक्षक दिनानिमित्त जीवन समृद्ध करणाऱ्या गुरुजनांना वंदन!

बबन आव्हाड नावाचे परभणीतील गांधी विद्यालयातील मराठी विषयाचे शिक्षक. उत्तम मराठी शिकवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी माध्यमिक शिक्षण देताना मराठी विषयाचे मूलभूत ज्ञान त्यांच्या विद्यार्थ्यांना दिले. स्वतः शब्द आणि व्याकरणाच्या बाबतीत काटेकोरपणा पाळणाऱ्या आव्हाड गुरुजींचे विद्यार्थीही तेवढेच काटेकोर वागणारे ठरले.

नामू केशव खटिंग आणि जन्मंजय भारत काळे हे दोन विद्यार्थी एमबीबीएस डॉक्टर झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी पाठ शिकवताना मुळातून लेखक आणि कवींची ते सखोल आणि रंजक माहिती देतात. त्यामुळे विद्यार्थीही आवडीने मराठीचे वाचक होतात. वाचन विद्यार्थ्यांत मुरवणारे ते एक लेखक आहेत. ‘परवड’ नावाचा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे.

शिकवत असताना काही शिक्षक विद्यार्थ्यांना वेगळ्याच दुनियेत नेत असतात. एका गुरुजीने हरिश्चंद्र दरोडेखोराची गोष्ट मुलांना सांगितली. हरिश्चंद्राचे गाव विद्यार्थ्याच्या गावाजवळ होते. हरिश्चंद्राने त्याच्या वडिलाला मोफत गाय सांभाळायला दिली. सांभाळ आणि चारापाणी खाऊ घालून दूधदुभते घरादाराला मिळेल, या आशेने त्याच्या वडिलांनी गाय वळायला आणली. लक्ष्मण नावाचा या बापाचा विद्यार्थी हरिश्चंद्राजवळ गेला. गुरुजींचे संभाषण कौशल्य हेरून त्यानेही ते आत्मसात केले.

तुम्ही म्हणे, ‘‘अमिताभ बच्चनच्या घरी चोरी केली होती, हे खरं आहे का?’’ असा प्रश्न त्याने थेट हरिश्चंद्रालाच विचारला. मग हरिश्चंद्राने त्याला सगळी कहाणी सांगितली. ती बरोबर होती. चोरीची शिक्षा म्हणून पोलिसांनी केलेला गोळीबार आणि त्याच्या पायाला झालेल्या जखमा त्याने लक्ष्मणला दाखवल्या. मुंबईत समुद्राच्या पाण्यात लपून राहिला आणि वर पोलिसांचा पहारा; पोलिसांना गुंगारा देत केलेली सुटका; या गोष्टी ऐकताना लक्ष्मण वेगळ्याच दुनियेची सफर करून आला.

दुसऱ्या दिवशी वर्गात येऊन गुरुजींना त्याने हरिश्चंद्राशी झालेला संवाद सांगितला. मुले गुरुजींची सत्यता अशी तपासून पाहतात. आपणांसही खात्री करून घ्यायची असेल तर परभणी तालुक्यातील करडगाव येथे आजही दुधना नदीच्या काठाला लागून घरात हरिश्चंद्र आणि वाडी दमई गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता आठवीत शिकणारा लक्ष्मण भेटू शकतो.

हे उदाहरण याच्यासाठी दिले की, मुले गुरुजींचे व्यक्तिमत्त्व हेरून त्यांच्यातील अनेक गोष्टींचे परीक्षण करीत असतात. त्र्यंबक वडस्कर नावाचे शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना जीवनातील प्रत्यक्ष जीवनाचे दर्शन आपल्या साहित्यातून देणारे हे गुरुजी महाराष्ट्र शासनाचा आदर्श गुरुजी पुरस्कार प्राप्त आहेत.

माणसांचे प्रत्यक्ष वागणे आणि व्यवहारातील वागणे यातील विसंगती टिपणारे आणि संस्कार आणि नैतिकतेचे धडे देणारे त्यांचे ‘सर, तुम्ही गुरुजी व्हा!’ हे अप्रतिम बालनाट्य आहे. संस्कारांचे सिंचन ते हसतखेळत विद्यार्थ्यांमध्ये करतात. खरं पाहता, शिक्षणाधिकारी साहेबांनी हे बालनाट्य जरूर अनुभवण्याचे आहे. ते पाहिल्यानंतर ‘‘साहेब, तुम्ही गुरुजी व्हा!’’ हे मनोमन शिक्षणाधिकारी मान्य करतील. अशा कलागुणी शिक्षकांची कदर समाज करत आहे.

विनोद शेंडगे नावाचे 'वाचन वेडे'गुरुजी पंचवीस हजार पुस्तकांचा संग्रह लोकसहभागातून करून विद्यार्थ्यांनाही वाचनाचे पाठ देत आहेत. कृतियुक्त संदेश बोलण्यापेक्षा परिणामकारक आणि प्रभावी असतो. त्यामुळे गुरुजींच्या हरेक गोष्टी विद्यार्थी निरीक्षण करतात. त्यामुळे येणाऱ्या किमान ३० ते३५ पिढ्या आणि सहज शिक्षणातून शेकडो विद्यार्थी उत्तम नागरिक म्हणून शिक्षकांच्या हातून घडत असतात ग्रामीण जीवनामध्ये आज शिक्षणाची उत्क्रांती होत आहे.

संगणक शिक्षण, चला निसर्गाकडे, परिसरातील क्षेत्र भेटी उदाहरणार्थ: दुधना धरणाला भेट, गावातील दुग्ध व्यावसायिक, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, कृषी पूरक उद्योग अशा अनेक क्षेत्रांच्या भेटी, शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, गावातील कुठल्याही पंगतीत आणि लग्नात केटर्सवाल्यांपेक्षा उत्तम वाढ करणारे आणि स्वच्छतेचे काम करणारे विद्यार्थी, पोलीस भरती-सैन्य भरतीत यशस्वी होणारे विद्यार्थी, भाजीपाला विकणारे विद्यार्थी, टेलरिंग, टेक्निशियन, वेल्डर, ऑपरेटर, खाजगी बँकिंग, वैज्ञानिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, कलावंत, गायक, राजकारणात नेतृत्व करणारे विद्यार्थी, उत्तम वक्ते, सूत्रसंचालक, पत्रकार आदी क्षेत्रात विद्यार्थी नामांकित झालेले आहेत, होत आहेत. कवी इंद्रजित भालेराव यांची कुणब्याच्या पोरांसाठी एक प्रेरणादायी कविता आहे. ती कविता वाचून पल्लवी जाधव पोलीस अधिकारी झालेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांसाठी ती कविता प्रभावी आहे.

कविता अशी:
शिक बाबा शिक लढायला शिक
कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक
लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक
घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इख
मागं मागं नको पुढं सरायला शिक
...
तुझं ऐकत नाही त्याला झाडायला शिक
तूच दिली सत्ता त्यांना पाडायला शिक
जातील हे दिस आणि होईलही ठीक
उद्या तुझ्या शेतामधी उधाणेल पीक
गाळलेल्या घामासाठी रस्त्यावर टिक
हक्कासाठी लढ बाबा मागू नको भीक
ग्रामीण जीवनामध्ये महत्त्वाचे म्हणजे, मुली स्वयंप्रेरणेने शिक्षण आणि उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. नर्सिंग, शिक्षिका, संस्थाचालक, ब्युटी पार्लर, दुकानदार, स्वागतिका, हवाईसुंदरी ,चित्रपट निर्माती, एवढेच काय कामाची लाज न बाळगता बायांचा टुप्पा करून शेत कामे, स्वयंपाकाचे गुत्ते घेऊन अर्थ प्राप्ती करत आहेत. स्वशिक्षण आणि आत्मनिर्भरता त्यांच्या ठिकाणी दिसत आहे. विद्येचे माहेर पुणे आता प्रत्येक पोरीसोबतच्या पदरगाठीला बांधलेले आहे. खऱ्या अर्थाने कुटुंब शिक्षित आणि शिक्षणामुळे सक्षम होत आहे. मुलामुलींचे शिक्षण समान आहे, याची जागृती शिक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. यामुळेच गावातील सर्वच घरातील मुली शिकत आहेत. बाया गमतीने म्हणतात, ‘‘सोयाबीन कापण्यापेक्षा माझी लेक साहेबीन व्हायली,’’ ही वस्तुस्थिती आहे. सार्वत्रिक शिक्षणाची महती घरोघरी कळलेली आहे. खऱ्या अर्थाने शाहू महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्यांची प्रेरणा घेऊन बहुजनांचे शिक्षण समृद्ध होत आहे. गाडगेबाबांसारखी जिल्हा परिषदेचे शिक्षक स्वतः शौचालयाची स्वच्छता करतात. समाज आणि जीवन समृद्ध करणाऱ्या गुरुजनांना वंदन!
(लेखक रानमेवा शेती-साहित्य संघाचे अध्यक्ष आहेत.)


- अरुण चव्हाळ
७७७५८४१४२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT