Indian Cow
Indian Cow Agrowon

Gorakshak Terror: गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?

Qureshi Society Boycott: कथित गोरक्षकांच्या दहशती विरोधात राज्यभरातील कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी मागील तीन आठवड्यांपासून टप्प्याटप्प्याने जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार घातला आहे.
Published on

Pune News: कथित गोरक्षकांच्या दहशती विरोधात राज्यभरातील कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी मागील तीन आठवड्यांपासून टप्प्याटप्प्याने जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार घातला आहे. त्याचा लाखो शेतकऱ्यांसह, व्यापारी, चमडा कामगार, हाडांच्या उद्योगातील कारागिरांना आर्थिक फटका बसू लागला आहे. जनावरांच्या बाजारातील उलाढाल ठप्प झाल्यामुळे सुमारे एक हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचे नांदेड येथील जनावरांचे व्यापारी अजीज कुरेशी यांनी सांगितले.

राज्यातील ३०५ बाजार समित्यांपेकी २२३ बाजारांमध्ये जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. आठवडी बाजाराच्या दिवशी लहान बाजारांत २० लाख, तर काही मोठ्या बाजारांत १५ कोटी रुपयांची उलाढाल होते.

Indian Cow
Cow Protection Chaos: गोरक्षकांचा धुडगूस शेतकऱ्यांच्या मुळावर

जनावरांच्या खरेदी-विक्रीवर कुरेशी, खाटीक समाजासह पशुपालक शेतकरी, व्यापारी, चामडा, हाडांचे कारागीर, शिंग साळणारे, नाळ ठोकणारे, कासरे विणणारे कारागीर यांची रोजीरोटी अवलंबून आहे. परंतु जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडवून मारहाण करणे, जनावरे जप्त करणे, गोशाळांना देणगीच्या नावाखाली पैसे उकळणे, पोलिसांना चुकीची माहिती देऊन खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार गोरक्षकांकडून सुरु आहेत. त्याला कंटाळून कुरेशी व्यापाऱ्यांनी जनावरांच्या खरेदी-विक्रीसह कत्तलीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे जनावरांच्या बाजारात शुकशुकाट आहे.

भारतीय जमियतुल कुरेश संघटनेचे उपाध्यक्ष अफजल कुरेशी म्हणाले, की गोरक्षक जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट करत आहेत. त्यातून मॉब लिंचिंगचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. कुरेशीसह हिंदू खाटीक व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कथित गोरक्षकांना आवर घालावा. गोरक्षकांच्या अरेरावीविरोधात राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Indian Cow
Cow Based Farming: देशात गौ आधारित कृषी पद्धतीला मिळावी चालना

पणन संचालक विकास रसाळ यांनी मात्र जनावरांची खरेदी-विक्री बंद नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘पणन विभागाकडे कोणतेही निवेदन अद्याप आलेले नाही. परंतु शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अडवून लूट करण्यात आल्याची तक्रार आली तर पणन विभाग नक्कीच दखल घेईल. शेतकरी, व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्रीसाठी जाताना बाजार समितीची पावती सोबत ठेवावी. तसेच कोणी अडवणूक केली तर पोलिसांकडे तक्रार करावी. यावर विविध जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने दिल्याचा दावा कुरेश संघटनेने केला आहे.

‘‘शेतकरी जनावरांच्या अदलाबदलीसाठी बाजारात गोवंश, म्हशी आणि संकरित गायी घेऊन जातात. शेतकऱ्यांकडे त्याच्या खरेदी-विक्रीचे कागदपत्रे असतात. परंतु तरीही कथित गोरक्षक शेतकऱ्यांना अडवून पैसे घेत आहेत,’’ असे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अशोक पवार म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गोरक्षक आणि पोलिस यांच्यात संगनमत असल्याचा आरोप केला. तर शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांची राज्य सरकारनेच योग्य किंमत देऊन खरेदी करावी, अशी मागणी माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली.

आमचा पिढीजात म्हशींचा व्यापार आहे. पण मागच्या दहा वर्षांपासून कथित गोरक्षक गोवंश कायद्याच्या आडून म्हशीच्या वाहतुकीला अटकाव करत आहेत. वाहन पकडून ५०० ते १००० हजाराची मागणी करतात. पैसे दिले नाही तर मारहाण करतात. आम्हाला एका म्हशीच्या व्यवहारामागे पाचशे-हजार रुपये सुटतात. त्यातही गोरक्षकांना वाटा द्यावा लागतो. त्यामुळे महिन्याभरापासून बाजारात जात नाही. व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आहे.
मेहमूद मुल्ला, व्यापारी, उमरगा, जि. धाराशिव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com