
Pune News: शेतीपासून उद्योगापर्यंत सर्व क्षेत्रांत विकासासाठी देशात पैसा आणि तंत्रज्ञानदेखील भरपूर आहे. मात्र कमतरता इमानदारीने काम करणाऱ्यांची आहे, अशी खंत केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
टिळक नाट्य मंदिरात शुक्रवारी (ता. १) झालेल्या विशेष सोहळ्यात ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार-२०२५’ स्वीकारताना ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री. गडकरी यांना पुणेरी पगडी, मानपत्र, स्मृतिचिन्ह प्रदान करीत गौरविण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणिती टिळक तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक व्यासपीठावर होत्या.
अंबानींची निविदा नाकारली होती
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट बोलणारा सर्वगुणसंपन्न, द्रष्टा नेता अशी स्तुती गडकरींची केली. ते म्हणाले, ‘‘पुणे-मुंबई महामार्गाचे काम मिळण्यासाठी रिलायन्स कंपनीने ३६०० कोटींची निविदा भरली होती. ती गडकरींनी नाकारली आणि १६०० कोटी रुपयांमध्ये प्रकल्प पूर्ण केला. राजकारणात सत्य बोलू नये असे म्हणतात. कारण त्यामुळे राजकारणात नुकसान होते. पण गडकरी त्यांच्या नुकसानीची चिंता न करता चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची सर्वांसमक्ष खरडपट्टी काढतात. कोणतेही काम गुणवत्तापूर्ण व्हावे, असा त्यांचा आग्रह असतो.’’
गडकरी म्हणजे ‘हायवे मॅन ऑफ इंडिया’
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘‘आधुनिक भारत घडविणाऱ्या शिल्पकारांपैकी गडकरी हे एक आहेत. ते ‘हायवे मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जातात. धर्म, जात, पंथ, भाषा भेद न करता विकासकामे करणारा हा पुरोगामी नेता आहे. महायुती सरकारचे ते फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड आहेत.’’
ते प्रयोगशील शेतकरीदेखील...
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनीही गडकरींचे तोंडभरून कौतुक केले. ‘‘महाराष्ट्राच्या मातीतील हा नेता केवळ यशस्वी राजकारणीच नसून प्रयोगशील शेतकरी देखील आहे. ते यशस्वी उद्योगपतीसुद्धा आहेत. त्यांचे निर्णय ठाम असतात व ते कृतीत देखील उतरवतात. त्यामुळे देशात आता ‘गडकरी’ हे ‘रोडकरी’ म्हणून ओळखले जातात. अहंकार न बाळगता राजकारणापेक्षा समाजकारणाला त्यांनी प्राधान्य दिले,’’ असे गौरवोद्गार श्री. पवार यांनी काढले.
जीव देईल; पण काँग्रेसमध्ये जाणार नाही
नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सर्वपक्षीय नेत्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख केला. ‘‘काँग्रेसचे नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांनी मला भाजपमधून काँग्रेसमध्ये येण्यास सुचविले होते. त्यावर मी विहिरीत जीव देईल; पण काँग्रेसमध्ये येणार नाही, असे सांगितले होते,’’ असा किस्सा श्री. गडकरी यांनी सांगितला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.