Monsoon Agrowon
संपादकीय

Monsoon 2024 : मॉन्सूनचा सांगावा

Monsoon Update : यंदा चांगल्या पाऊसमानाच्या अंदाजामुळे सरकार शेतीमालाच्या आयात-निर्यात धोरणात बदल करणार का?

रमेश जाधव

Import-Export Policy of Agricultural Products : महाराष्ट्र सध्या दुष्काळात होरपळत असताना यंदाच्या मॉन्सूनबद्दल आशा पल्लवित करणारा अंदाज आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा देशात दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज दिला आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. सध्या दुष्काळाची तीव्रता जास्त असलेल्या मराठवाडा आणि लगतच्या भागांत पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘एल-निनो’ आणि ‘ला-निना’. प्रशांत महासागरावर एल-निनो उद्‌भवला की भारतासाठी ती धोक्याची घंटा असते आणि ला-निना असला की आनंदाची वार्ता असते. कारण ढोबळमानाने ‘ला-निना'मुळे आशिया खंडात विशेषतः भारतात जोरदार पाऊस होतो, असा आजवरचा अनुभव आहे.

ला निना वर्षात एकदाही भारतात दुष्काळ पडलेला नाही. तर एल-निनो म्हणजे दुष्काळ असे समीकरण रूढ झाले आहे. भारतात मोठा दुष्काळ पडला अशा २४ वर्षांपैकी १३ वर्षे ही एल-निनो वर्षे होती. यंदाच्या वर्षीही एल-निनो आहे आणि दुष्काळ पडलेला आहे. परंतु मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीला एल-निनो स्थिती सामान्य होणार असून, जुलै महिन्याच्या अखेरीस ला- निना स्थिती तयार होण्याचे संकेत मिळाले आहेत.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने सरासरी पावसाचे प्रमाण किती यापेक्षाही पावसाचे वितरण कसे होते, हा मुद्दा जास्त महत्त्वाचा असतो. कारण मॉन्सूनच्या संपूर्ण कालावधीची म्हणजे जून ते सप्टेंबरची सरासरी चांगली असेल, परंतु जूनमध्ये पाऊस उशिरा आला आणि सप्टेंबरमध्ये ऐन काढणीच्या वेळी पावसाने धुमाकूळ घातला तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे नुकसान होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ला-निना स्थिती मॉन्सूनचा अर्धा हंगाम संपल्यावर तयार होणार आहे. त्यामुळे जुलैनंतर पाऊस चांगला राहील, असा त्याचा ढोबळ अर्थ.

परंतु हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यातही देशात सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आता जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कसे राहते, सप्टेंबरच्या अखेरीस किती पाऊस पडतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण किती राहते हे मुद्दे निर्णायक ठरणार आहेत. गेल्या वर्षी सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला. मॉन्सून उशिरा आला. जूनमध्येही उष्णतेच्या लाटांचे प्रमाण जास्त होते. खरीप पेरण्या रखडल्या. तसेच कमी कालावधीत जास्त पावसाचे प्रमाण आधीच्या वर्षीच्या तुलनेत जास्त राहिले. राज्यात अनेक ठिकाणी पीक काढणीच्या वेळी पावसाने झोडपून काढले होते.

मॉन्सून आणि शेतीमालाची आयात-निर्यात यांचा थेट संबंध आहे. भारत हा गहू, भात आणि साखर उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे; तर पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलाचा सगळ्यांत मोठा आयातदार आहे. त्यामुळे भारतात पाऊस कसा राहील, याकडे जगाच्या बाजारपेठेचे लक्ष लागलेले असते. गेल्या वर्षी पाऊसमान कमी राहिल्यामुळे देशातील अन्नधान्य व इतर प्रमुख पिकांच्या उत्पादनाला मोठा फटका बसला होता.

त्यामुळे केंद्र सरकारने साखर, भात, कांदा आणि गव्हाच्या निर्यातीचा लगाम आवळला. कडधान्य आणि खाद्यतेलाची प्रचंड आयात केली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महागाई वाढू नये म्हणून सर्वच प्रमुख शेतीमालाचे दर पाडण्यासाठी सरकारने कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. यंदा मात्र चांगल्या पाऊसमानाची आशा आहे. मध्य भारतात सोयाबीन, कापूस, कडधान्य, ऊस ही मुख्य पिके आहेत. तर दक्षिणेकडील भागात भात आणि रबर ही प्रमुख पिके आहेत. यंदा या दोन्ही भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकार शेतीमालाच्या आयात-निर्यात धोरणात बदल करते का, हा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT