संपादकीय

Agriculture : शेतकऱ्यांचे ‘थ्री-जी’

टीम ॲग्रोवन

भारताच्या दूरसंचार क्षेत्रामध्ये (Indian Telecom Sector) फाइव्ह - जी तंत्रज्ञानाचे (5G Technology) युग अवतरले आहे. फाइव्ह - जी नव्या पर्वाची सुरुवात असून त्यामुळे संधीचा महासागर उपलब्ध होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या सेवेचा देशात प्रारंभ करताना व्यक्त केला. डाटा (विदा) आणि स्पीड (गती) या दोन घटकांना सायबर युगात फारच महत्त्व आले आहे.

देशात येऊ घातलेल्या फाइव्ह - जी तंत्रज्ञानाच्या ठायी तर हे दोन्ही अमोघ अस्त्रे दडलेली असल्यामुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती घडेल, असेच म्हटले पाहिजे. आज आपण पाहतोय ४ - जी तंत्रज्ञानाने माहितीची देवाणघेवाण लक्षणीय वेगाने होऊ लागल्यामुळे बॅंकींग, मनोरंजन, वाहन उद्योगात आमूलाग्र बदल झाले. फाइव्ह - जी तर त्याच्याही पुढचा टप्पा आहे. ४ - जी पेक्षा वीसपट वेगाने फाइव्ह - जी काम करणार असल्याने याच्या वापरामुळे होणाऱ्या बदलांचा अंदाज आपल्याला यायला हवा.

देशातील निवडक शहरांमध्ये फाइव्ह - जी सेवा सुरू करण्यात आली असली तरी पुढील दोन वर्षांमध्ये ही सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला असताना त्याची गती आणि विदा वाढविणाऱ्या फाइव्ह - जी चे स्वागतच आहे. शिवाय हे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान असल्याने ही देशासाठी अभिमानास्पद बाब देखील आहे.

बॅंकींग, मनोरंजन, वाहन उद्योगाबरोबर शिक्षण, वैद्यकीय तसेच शेती क्षेत्रात देखीव फाइव्ह जी तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असल्याचे बोलले जातेय. शेतीकामासाठी मजूर भेटत नसल्याने फाइव्ह - जी तंत्राद्वारे चालकविरहित ट्रॅक्टरने शेतीची मशागत आणि यंत्रमानवाने कापूस वेचणी, सोयाबीन काढणी अशी कामे झाली तर ते शेतकऱ्यांना दिलासादायकच ठरेल. परंतु पाचव्या पिढीच्या या तंत्रज्ञानाचा शेतीत शक्य तेवढ्या लवकर आणि शिताफीने वापर झाला पाहिजेत.

शिवाय याचा वापर शेतकऱ्यांच्या आवाक्यामध्ये असायला हवा. नाहीतर आपण पाहतोय ड्रोन तंत्रज्ञान शेतीत येऊन चार-पाच वर्षांचा काळ उलटला तरी अजूनही ड्रोनद्वारे पिकावर फवारणी प्रायोगिक तत्त्वावर आहे. काही ठिकाणी ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी होत असली तरी बहुतांश शेतकऱ्यांना ती परवडण्याजोगी नसल्यामुळे हे तंत्र ते वापरू शकत नाहीत.

नव्या तंत्रज्ञानाचा वापर आपण वेळ, श्रम, पैसा बचतीसाठी करतो. बहुतांश शेतकऱ्यांची सध्याची नाजूक आर्थिक परिस्थिती पाहता ते पैसा बचतीला प्राधान्य देतील. अशावेळी प्रगत तंत्रज्ञान आर्थिकदृष्ट्या त्यांच्या आवाक्यात नसेल तर ते वापरणार नाहीत, हे सत्यही नाकारता येणार नाही.

दूरसंचार क्षेत्रात भलेही आपण फाइव्ह - जी पर्यंत जाऊन पोहोचलो असलो तरी या देशातील शेतकरी अजूनही ‘थ्री - जी’ (अर्थात त्यांच्या तीन मूळ गरजा) मध्येच अडकलेला आहे. शेतीला अजूनही व्यवसायाचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे त्याला प्रगती करता येत नाही. घटनेने दिलेले मूलभूत व्यवसाय स्वातंत्र्य शेतकऱ्यांकडून हिरावून घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्यही हवे आहे.

शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पिकविलेला माल कुठे, कधी, कसा, कुणाला विकावा, घरी किती साठवून ठेवावा याचेही स्वातंत्र्य पाहिजे. सध्या बाजार स्वातंत्र्य आहे, असे भासविले जात असले तरी सरकारच्या बाजारातील वाढत्या हस्तक्षेपाने हे स्वातंत्र्य राहत नाही. शेतकऱ्यांसाठीची तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य देखील पाहिजे.

देशात फाइव्ह - जी चा मोठा बोलबोला सुरू असताना शेतीसाठीच्या जीएम (जनुकीय सुधारीत) तंत्रज्ञानावर बंदी आहे. हवामान बदलाच्या या शेतीला जीएम तंत्रज्ञानच वाचवू शकते, असे असताना ते वापराचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना नाही. शेतीकडील सरकारच्या दुर्लक्षामुळे इंडिया आणि भारतातील दरी वाढत आहे, हे खरे तर सरकारने लक्षात घेतले पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT