Rashtrasant Tukdoji Maharaj Shetkari Bhawan : 'राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्याच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेस नुकतीच मान्यता दिली आहे. शेतकरी भवन उभारण्याच्या या योजनेसाठी उपमुख्यमंत्री यांनी पाठपुरावा केला होता. पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने या संबंधित अध्यादेश लागू केला आहे.
त्यामुळे राज्यातील बाजार समित्यांना शेतकरी भवन बांधण्यास त्यांच्या वर्गवारी नुसार ५० ते ७० टक्के अनुदान मिळणार आहे. राज्यात एकूण ३०६ बाजार समित्यांपैकी १९० बाजार समित्यांच्या मुख्य आवारात शेतकरी भवन आहेत, तर ११६ बाजार समित्या किंवा त्यांच्या उपबाजारात शेतकरी भवन नाहीत.
आता त्यासाठी एकूण १३२ कोटी ४८ लाख रुपयांची तरतूद करून उर्वरित सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उभारण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी शेतकरी भवन दुरुस्तीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येणार आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या शेतकरी भवनाला ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामध्ये तळमजल्यावर बहुउद्देशीय हॉल, तीन दुकाने, वीस बेड क्षमतेच्या सहा खोल्या उभारण्यात येणार असून, प्रत्येकी अंदाजित खर्च एक ते दीड कोटी रुपये असणार आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी ‘कसे लिहावे’ हे सांगितले, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘काय वाचावे आणि कशासाठी वाचावे’ हे सांगितले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य लोकांच्या प्रबोधनात घालवले. ‘ग्रामगीता’ लिहून कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना मार्गदर्शन केले.
येथे हा उल्लेख करायचे कारण म्हणजे अशा राष्ट्रसंतांच्या नावावर उभारली जाणारी ही सर्व शेतकरी भवने राजकारण्यांचे अड्डे न बनता त्याचा विधायक वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. असे झाले तरच या शेतकरी भवनांना देण्यात आलेले नाव सर्वार्थाने सार्थ ठरेल. आज राज्य सरकारचे अनेक विभाग आपापल्या विभागाशी संबंधित नवयुवक, सुशिक्षित बेरोजगार, पशुपालक / शेतकरी यांच्यासाठी छोटे-मोठे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करीत असतात.
महाराष्ट्र राज्याने राज्य प्रशिक्षण धोरण आखून राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना नियमित प्रशिक्षण देण्यासाठी अनेक उपाययोजना देखील सुचविलेल्या आहेत. त्याद्वारे प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. कौशल्य विकास आधारित कार्यक्रम देखील आता येऊ लागले आहेत. अनेक वेळा जिल्ह्यांत प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आयोजित करताना सर्व सोयीने युक्त असे सभागृह मिळण्यात अनेक अडचणी येतात.
प्रत्येक विभाग स्वतःचा असा प्रशिक्षण हॉल किंवा सभागृह बांधू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उपलब्ध सुविधा वापरून त्यांना प्रशिक्षण उरकावे लागते. बाजार समित्यांना पणन विभागाच्या वतीने अनुदान देताना ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनांचा’ वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
त्यात शेतकरी भवनांचा वापर शेतकरी पशुपालकांच्या प्रबोधन-प्रशिक्षण शिबिरासाठी प्राधान्याने व्हावा व सोबत त्याला आवश्यक सेवा सुविधा देखील पुरवाव्यात असे स्पष्ट केले आहे. शेतकरी भवनाच्या पायाभूत सुविधांमध्ये प्रोजेक्टर, बैठकीसाठी खुर्च्या, लिहिण्यासाठी आधुनिक फळा असे साहित्यही पुरविण्यात यायला हवे.
शेतकरी भवनचा उपयोग हा राज्यातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार, पशुपालक व शेतकऱ्यांसह नवनिर्वाचित ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी नाममात्र सेवा शुल्क आकारून उपलब्ध करून देण्याविषयी सूचित केले, तर याचा सर्वांचा निश्चितच फायदा होईल. शेतकऱ्यांच्या निवासाबरोबर त्यांच्या प्रशिक्षणासाठी देखील शेतकरी भवनात सोय होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.