Indian Agriculture Agrowon
संपादकीय

Indian Agriculture : शेतीत जगन्नाथाचे हात यापुढेही दिसतील?

Team Agrowon


सुरेश कोडीतकर

Farming in India : शेती कसणारी ही बहुधा आता शेवटचीच पिढी असावी. या पिढीच्या पोटी जन्म घेतलेल्या मातीपुत्रांचे काळ्या आईशी, तसेच ऋणानुबंध कायम राहतील याची शाश्वती नाही. यापुढे आता शेती कसणारे बळीराजाचे परंपरागत वारसदार दिसणार नाहीत. भले शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान येईल. संगणकीकरण आणि उपकरणशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा बोलबाला होईल.

पण शेतीत राबणारे ते जगन्नाथाचे हात यापुढे दिसतील का, हा खरा प्रश्‍न आहे. शेतीतील मनुष्यबळ कमी होत आहे. मुळात शेतीक्षेत्र तुकड्यातुकड्यांत विभागले जाऊन घटत आहे. पशुधन तर कमी झाले आहेच. शहर आता गाव खेड्यात पोहोचून दोन दशके झाली आहेत. त्या काळी शहरातील सेवासुविधा उभारण्याची गावी जणू एक ईर्षा होती. आता एकमेकांना पातळी दाखवणे घडत आहे. एकोपा नाहीसा होऊन तुटकता आली आहे. हे विकासाचे दुष्परिणाम म्हणायचे का?

सच्चा भूमिपुत्र आणि व्हाइट कॉलर
लागवडीखालील जमीन कसायला माणसं नाहीत. आहे ती जमीन विकणे किंवा पेट्रोल पंप, ढाबा/ हॉटेल, रोपवाटिका/वीट भट्टी, गुऱ्हाळ यासाठी भाड्याने देणे पण कसणे नाही, हे मातीपासून तुटणे नव्हे काय? आज जमीन पडीक ठेवून कमिशन एजंट, मध्यस्थ म्हणून पैसा काढणे मोठेपणा समजला जातोय. गावोगावी उद्योगपती, समाज सेवक, युवा बागायतदार यांचे पेव फुटले आहे.

पण सच्चा भूमिपुत्र नावाला दिसून येत नाही. तरुण शेतकरी नोकरी शोधतोय. व्यवसायात स्थिर होण्याचा प्रयत्न करतोय. चालक, विक्रेता, विक्री प्रतिनिधी, कारकून, शिक्षक, मदतनीस म्हणून आपले नशीब अजमावतोय. शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे बहुसंख्य मुलेमुली हे शेतकरी कुटुंबातील आहेत. शेतीच्या बळावरच ते गाव शेती सोडणार आहेत काय?

त्यांना नोकरीची स्वप्ने खुणावत आहेत. पण प्रशासकीय सेवेतच देशसेवा आहे का? त्यांच्या प्लॅन बी मध्ये शेती करणे का नाही? शेतीत भूमीसेवा नाही का? खरी भूमीसेवा किसान आणि जवान करत असतात हा विसर आपल्याला का पडला आहे? खेड्यातील नव्या पिढीला जर नोकरी अन् चाकरी हे शेतसेवेपेक्षा श्रेष्ठ वाटत असेल तर तो आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे.

आपली शिक्षणपद्धती कारकून, व्हाइट कॉलर नोकर जमात तयार करणारी आहे. त्यात श्रमाला प्रतिष्ठा शिकवली जात नाही अन् शेतीत श्रमाला पर्याय नाही. शेतात कष्टण्यासाठी यापुढे जगन्नाथाचे हात आणायचे कुठून?

दुर्मीळ आता बांधाचे सेवेकरी
नव्या पिढीचा खेड्याशी संपर्क तुटणे धोकादायक आहे, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी मागे दिला होता. तो त्या वेळी अर्धा खरा होता आणि आता यापुढे संपूर्ण खरा होईल. शेतीशी लोकांचा याच वेगाने संपर्क नाहीसा होऊ लागला, तर मग कसदार जमिनी पडीक होतील. तिथे बाभळीचे काटवन व्हायला वेळ लागणार नाही.

आज गाव खेड्यात राहणारी पण शेताकडे ढुंकून न पाहणारी पिढी शेतीतील शेवटच्या पाशातून स्वतःला मोकळे करून घेत आहे. आणि जी पिढी साधारण ४० ते ५० वर्षांपूर्वी शहराकडे आली ती वाटणीतून उरलेले अवशेष जोपासत आपली नाळ कशीबशी टिकवून आहेत.

त्यांच्या पुढील पिढीकडे शेतीचा वारसा नाही पण आत्मीयता आहे. आणि जे गावखुद्द ग्रामस्थ आहेत त्यांचा शेती हा चरितार्थ आहे. गावाचे गावपण उजाडल्यावर, जमिनींचे तुकडे झाल्यावर, बहिणींकडून हक्कसोड पत्र घेतल्यावर आता गाव नातीही गर्दी गोळा करण्यापुरती उरली आहेत. या जंजाळात बांधाचे सेवेकरी होण्यात रस कोणाला आहे?

जगन्नाथाचे हात आणि परप्रांतीय
जो गाव सोडून गेला तो कायमचा दुरावला. माणूस परदेशी जावो वा इतर कुठे. तो शेतीपासून दूर गेला की तो त्या वातावरणात परतत नाही. आजच्या परिस्थितीत वय वर्षे १५ ते २५ या वयोगटातील तरुण जर शेतीत काम करत असतील तर ते अभिनंदनीय आहे. भले शेती करो वा शेतीपूरक उद्योग व्यवसाय करो पण शेती आणि गावाशी जोडून राहणे महत्त्वाचे आहे.

पी. साईनाथ यांच्या म्हणण्याचा तोच मथितार्थ आहे. शेती आहे म्हणून आज आपण अन्नधान्य, भाजीपाला, फळे, भरडधान्य, डाळी, तेल, दूधदुभते, मांस आणि अंडी हे सर्व प्राप्त करू शकतो. प्रत्यक्ष शेती आणि शेतीजन्य उद्योगात लाखो लोक काम करतात. स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. परंतु यात स्वतः भूमिपुत्र असलेले शेतीसेवक किती आणि रोजावर घेतलेले किती, हा प्रश्‍न आहे.

ज्याप्रमाणे राज्यातील अनेक कामकाज क्षेत्रे ही परप्रांतीयांच्या ताब्यात गेली आहेत, त्याचप्रमाणे मराठी शेतीही यापुढे रक्त आणि नाळ संबंध नसलेल्या लोकांच्या हाती गेली तर काय? मराठी मातीत या काळ्या आईसाठी राबणारे मूळ मालक असलेल्या जगन्नाथाचे हात नाहीसे होत आहेत. ही खंत खोलवर आहे.

देखावा, गावपुत्र, शहराचे आकर्षण
नवी पिढी शेतात काम करायला फारशी उत्सुक नाही, त्याची नकारात्मक कारणे भूतकाळात दडलेली आहेत. तथापि, जी मुले-मुली हौसेने शेती करत आहेत त्यांना विचारणारे कोणी नाही. शेतीत राबणाऱ्या उपवर मुलांना वधू मिळत नाही. त्याला सर्वत्र नकारघंटा ऐकावी लागत आहे.

आजच्या जमान्यात शेती करणे हे कमीपणाचे का समजले जात आहे? शेतीश्रमांना आपल्या इथे प्रतिष्ठा कधी लाभणार? आज शहराकडे आसरा घेणारा शेतमाणूस दहा हजार रुपये वेतनाच्या नोकरीसाठी जीवघेणा धावत आहे.

शेतकरी होतकरू वराला गावी दोन किंवा तीन एकर शेती असली तरी त्याला वधू नकार देतात. पण शहरात सुरक्षारक्षक असलेला मुलगा त्यांना नवरा म्हणून पसंत असतो. हा विरोधाभास शिक्षण, संस्कार आणि वधूपक्षाची समज दाखविणारा आहे.

जगन्नाथापुढील आव्हाने आणि संधी
शेती कसणारे जगन्नाथाचे हात यापुढे दिसतील का? हा केवळ प्रश्‍न नव्हे तर हे पुढे येऊ घातलेले कटू सत्य आहे. शेतीपुढील समस्या वाढत आहेत. हवामान आणि पर्यावरण बदल खूप आव्हानात्मक ठरणार आहेत. त्याला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञान, पारंपरिक आणि कृत्रिम रसायने, अवजारे आणि यंत्रे यासोबत मनुष्यबळाची नितांत आवश्यकता भासणार आहे.

म्हणून शेतीत कसणारे जगन्नाथाचे हात कायम असावेत असे प्रतिपादन आहे. शेती कसेल तो जगेल आणि शेती विकेल तो फसेल. आपल्याच शेतात धनदांडग्याने बांधलेल्या फार्म हाउसवर वॉचमन होण्याची वेळ कोणा मातीपुत्रावर येऊ नये. शेती आणि पारंपरिक विपणन व्यवस्थेला आता स्थळ काळाची बंधने नाहीत. आता डाळिंब थेट अमेरिकेत जात आहेत.

नाशिकचा कांदा थेट आसाम, मणिपूरला जात आहे. केळी दिल्ली, हरियानाच्या बाजारात पोहोचत आहेत. शेतकरी कंपन्या स्थापन करीत आहेत. नवी तरुण पिढी वेगळ्या वाटा चोखाळत आहे. नवे जगन्नाथ, भगीरथ, बळीराजाचे वारस पुढे येत आहेत. त्यांची संख्या निरंतर वाढत राहो हीच सदिच्छा!
(लेखक ग्राम अभ्यासक असून, मुक्त पत्रकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT