संपादकीय

Fodder : 'पिवळी' ला आणा पीक पद्धतीत

कृषी विद्यापीठांत जेथे जनावरांच्या चाऱ्यावर संशोधन होते तेथे पिवळीच्या कडब्यावरही संशोधन होणे गरजेचे आहे.

डॉ. नागेश टेकाळे

जनावरांना नियमित पिवळीची वैरण आणि आठवड्यात एक दिवस तरी आपल्या ताटात पिवळीची भाकरी असणे हे निरोगी आहार (Balanced Diet) शैलीचे लक्षण आहे. कृषी विद्यापीठांत (Agricultural Colleges) जेथे जनावरांच्या चाऱ्यावर संशोधन होते तेथे पिवळीच्या कडब्यावरही संशोधन होणे गरजेचे आहे.

सणानिमित्त गावाकडे आल्यावर माझ्या उच्च शिक्षित बालमित्राच्या पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीच्या शेतीस भेट देणे हा माझा नित्याचाच कार्यक्रम असतो. ५० वर्षांपूर्वीची अभियांत्रिकीमध्ये उच्च पदवी असूनही मुंबई येथून उच्च पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर त्याने केवळ आवड आणि शेती अभ्यासामधून त्याच्या जन्मगावी कृषीमध्ये आणि फळबाग लागवडीतून नावीन्यपूर्ण प्रयोगांचा छंद जोपासला. माझी त्याच्या शेताला भेट, मित्राने नवे काय काय केले आहे ते पाहण्यासाठीच असते. या वर्षी त्याची सलग तीन एकरमधील पिवळी म्हणजे शेन्द्रीची शेती ही माझ्यासाठी निश्‍चितच नावीन्यपूर्ण होती.

पिवळी हा ज्वारीचाच एक प्रकार, फक्त दाणे लहान आणि पिवळसर. हा पिवळसर रंग त्यामधील एका विशिष्ट औषधी अल्कलॉइडमुळे असतो म्हणूनच या ज्वारीची भाकरी चवीला थोडी कडूसर लागते. पूर्वी म्हणजे पाच, सहा दशकांपूर्वी दुष्काळी मराठवाड्यात गरिबांच्या ताटामधील ही भाकरी म्हणजे त्यांचे पंचपक्वान होते. अजूनही मला आठवतं, मी शाळेत असताना आठवड्यात एक दिवस आमच्या वर्गाचे वनभोजन असे.

आमचे भूगोलाचे गुरुजी सांगावयाचे, तुम्ही घरी जो आहार घेता तोच येथे आणावयाचा. त्या दिवशी अर्थात माझ्या डब्यात म्हणजे स्वच्छ पांढऱ्या कपड्यात पिवळीची भाकरी आणि त्यावर जवसाची चटणी होती. आम्हा वीस मुलांच्या प्रत्येकाच्या डब्यातील एक एक घास गुरुजी घेत माझ्याजवळ आले. त्या वेळी माझी पिवळीची शिळी भाकरी पाहून आनंदी झाले. तो गुरुजींचा आनंदी चेहरा आजही माझ्या नजरेसमोर आहे. कारण लहानपणी त्यांचाही तोच आहार होता.

मित्राने लावलेल्या पिवळीच्या फडाचे रहस्य मला त्याच्या शेतात गेल्यावरच समजले. पिवळीची पेंढी ही त्यांच्या जनावरांचे मिष्टान्न होते. १०० रुपये एक पेंढी असा तिचा विक्रीचा भाव आहे. मात्र त्याच्यासाठी घरच्या गाई-बैलाच्या खाद्याची ती वर्षभराची पुरवणूक होती. पिवळीचे ताट ज्वारीपेक्षा उंच आणि पेराला लहान असते. म्हणून जनावरास ते उत्कृष्ट खाद्य पुरविते. या चाऱ्यामधील औषधी गुणधर्मामुळे जनावरांना आजारपण तर येतच नाही. मित्र सांगत होता, त्याने मागील तीन वर्षांत त्याच्या गाई-बैलांना कसलीही लस दिली नव्हती.

ताट खाण्यास हलके आणि पोषक असल्यामुळे जनावरांना चटकन मानवते. यापासून मिळालेली ऊर्जा एक वेगळीच स्फूर्ती निर्माण करते. मित्र न थांबता सांगत होता. तो पिवळीचे उत्पादनही घेतो आणि तिचे बियाणे जो शेतकरी मागेल त्याला स्वखर्चाने पाठवतो. पिवळी हे पारंपरिक पीक आहे. मात्र दुर्दैवाने आजच्या गहू, तांदूळ, मका, ज्वारी आणि सोयाबीन समोर पिवळी तुच्छ समजली जाते. परंतु फार कमी लोकांना माहीत आहे, की तिची भाकरी तीही शिळी असेल तर ताज्या धारोष्ण दुधाबरोबर गोड आणि औषधी असते. पिवळीची कडबा पेंढी गाईसमोर टाकताच दुभती गाय आवडीने पूर्ण संपवून टाकते, अशा गाईचे काढलेले दूध किती औषधी असू शकेल, याची कल्पनाच आपल्याला यायला हवी.

काही वर्षांपूर्वी मी एका डेअरीकडून मिळालेल्या शतावरी या औषधी वनस्पती घातलेल्या गाईच्या अतिशय चवदार दुधाचा प्रयोग ठाणे जिल्ह्यामधील जव्हारच्या आदिवासी भागात पाच वर्षांखालील मुलांचे कुपोषण दूर करण्यासाठी केला होता. प्रतिदिनी २०० मिलि दुधाने त्या शेकडो मुलांचे कुपोषण दोनच महिन्यांत पूर्णपणे दूर झाले होते आणि त्यांच्या बुद्ध्यांकामध्येही वाढ झाली होती. या वेळी दूध उत्पादकाने शतावरी त्यात बाहेरून मिसळलेली होती. हे दूध मला तेथील गरोदर स्त्रिया, स्तनदा मातांना सुद्धा अतिशय पोषक आढळले. मनात विचार आला असाच प्रयोग दुभत्या गाईंना पिवळीचा कडबा खाऊ घालून का करू नये? मिळणारे दूध औषधी तर असणारच पण शरीराची प्रतिकारशक्ती कितीतरी पटीने वाढवेल. दूध १०० टक्के पूर्ण अन्न आहे.

ज्या बाळांना दुधाची गरज आहे त्यांना हे दूध मिळावयास हवे. आपणामध्ये जशी शारीरिक प्रतिकारशक्ती असते तशीच पशूमध्ये सुद्धा असते. गायरानात जी जनावरे मोकळ्या हवेत चरत असतात त्यांची प्रतिकार शक्ती नेहमीच दावणीला बांधलेल्या जनावरापेक्षा जास्त असते. ॲमेझॉनच्या घनदाट जंगलामधील सर्व पशू, पक्षी, प्राणी ब्राझील नट या वृक्षाची फळे आवडीने खातात, ते त्यामधील सेलेनियम या औषधी घटकामुळेच! कारण हा घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो.

विषाणूजन्य आजारामुळे आपल्याकडे हजारो जनावरांचे मृत्यू झाले ते केवळ त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होती म्हणूनच! मराठवाड्यात काही लोक पिवळीची शेती करतात, पण कणसे येण्यापूर्वीच ते ताट उपटून पेंढ्या बांधून जनावरांना देतात. प्रयत्न निश्‍चितच स्तुत्य आहे, पण या पिकाला ज्वारीप्रमाणे कणसे येऊन, त्याचे दाणे गोळा करून नंतर वैरण तयार करणे जास्त फायदेशीर आहे. कारण जेव्हा ताटाला कणसे धरतात तेव्हाच त्या चाऱ्यामध्ये जास्त औषधी गुणधर्म येतात.

जनावरांना नियमित पिवळीची वैरण आणि आठवड्यात एक दिवस तरी आपल्या ताटात पिवळीची भाकरी असणे हे निरोगी आहार शैलीचे लक्षण आहे. अनेक कृषी विद्यापीठांत जेथे जनावरांच्या चाऱ्यावर संशोधन होते तेथे पिवळीच्या कडब्यावरही संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधन झाले असल्यास ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या चाऱ्यापासून तयार होणारा मुरघास कितीतरी उत्कृष्ट दर्जाचा असणार आहे.

पिवळीचे खरीपमधील पीक पूर्वी दुष्काळी भागात घेत असत. या पिकामधील औषधी गुणधर्म याचमुळे आले आहेत. वातावरण बदल आणि ताणतणाव सहन करणारे हे उत्कृष्ट पीक आहे. भविष्यामध्ये वातावरण बदलास सामोरे जाण्यासाठी, तसेच जनावरांना चारानिर्मितीसाठी आपणास नवीन वाणांच्या शोधात राहावे लागणार आहे.

संशोधन जरूर करावे पण आपल्याकडे शेकडो वर्षापासून कडब्याच्या गंजीत दुष्काळात सामोरे जाणाऱ्या पिवळी सारख्या पिकास दुर्लक्षित करून चालणार नाही. आपल्या दुभत्या गाईसाठी हा उत्कृष्ट आहार आहे. आज दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, दूध उत्पादनापेक्षा चाऱ्यावरच खर्च जास्त होतो, त्या व्यतिरिक्त पेंड, खुराक वेगळाच!

अशा शेतकऱ्यांनी पिवळीचा कडबा मोठ्या प्रमाणावर उत्पादित करावा. ही वैरण जनावरांना निरोगी तर ठेवतेच आणि औषध पाण्याचा वेगळा होणारा खर्चही वाचवते. अशा दुधाचा भाव शेतकऱ्यांना इतर दुधाच्या तुलनेत चार पैसे जास्त सुद्धा देऊ शकतो. शेवटी ‘आयुर्वेद हे शास्त्र म्हणते आहार हेच औषध’ हे जसे आपणास लागू पडते तसेच आपल्या पशुधनासही!

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

...........

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT