Banana Export Agrowon
संपादकीय

Banana Export : सामुदायिक प्रयत्नांतून वाढेल केळी निर्यात

विजय सुकळकर

Indian Agriculture : मागील वर्षभरातील अत्यंत प्रतिकूल असे हवामान, त्यातच केळी पिकांवर करपा तसेच सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) रोगांचा वाढता प्रादुर्भाव, अशा परिस्थितीत राज्यातील केळी उत्पादकांनी दर्जेदार अशा निर्यातक्षम केळीचे अधिक उत्पादन घेतले. शिवाय रशिया-युक्रेन, इस्राईल-हमास यांच्यामधील युद्धामुळे जगभर तणावाचे वातावरण आहे.

निर्यातीसाठी सुएझ कालवाही बंद आहे. त्यामुळे आफ्रिकेला वळसा घालून जहाजांना जावे लागत असल्याने अंतर आणि निर्यातीसाठीचा खर्चही वाढला आहे. अशा अनेक अडचणींवर मात करीत निर्यातदारांनी केळीची निर्यात वाढविली. त्यामुळे एप्रिल २०२३ ते जून २०२४ या काळात देशातून २४ हजार कंटेनर केळीची निर्यात झाली आहे.

२०२२-२३ च्या तुलनेत ही निर्यात सात हजार कंटेनरने अधिक आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे देशातून होणाऱ्या एकूण केळी निर्यातीत एकट्या महाराष्ट्राचा वाटा ६२ टक्क्यांपर्यंत राहिला आहे. सोलापूर, जळगावसह राज्याच्या इतरही केळी उत्पादक पट्ट्यांतून निर्यातक्षम केळीचे उत्पादन आणि निर्यातही वाढत असल्यानेच हे शक्य झाले आहे.

मागच्या वर्षी निर्यातीसाठीच्या केळीला ३००० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. त्या तुलनेत या वर्षी मात्र निर्यातक्षम केळीचे दर निम्म्याने (प्रतिक्विंटल १४०० ते १५०० रुपये) घसरले आहेत. त्यामुळे केळी उत्पादकांच्या पदरी निर्यातीचे अपेक्षित लाभ मात्र पडले नाहीत. देशातून, राज्यातून केळीची निर्यात वाढत असली, तरी जागतिक बाजारात आपला निर्यातीचा टक्का अजूनही खूप कमी असून तो वाढविण्याची संधी आहे.

अलीकडच्या काळात केळीची कांदे आणि मृग अशा दोन्ही बागांसाठी शेतकरी ‘फ्रूट केअर’अंतर्गत रोपांच्या निवडीपासून ते घड काढणीपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. असे असले तरी दर्जेदार केळी उत्पादनाच्या अनुषंगाने पीक पोषण आणि कीड-रोगांचे नियंत्रण यावर खूप काम करावे लागणार आहे. केळीवरील बुरशीजन्य तसेच विषाणूजन्य रोगांचे प्रभावी नियंत्रण अजूनही होत नाही.

त्यामुळे उत्पादनासह केळीचा दर्जाही घसरतो. नव्या वाणांची निर्मिती तसेच रोगमुक्त दर्जेदार उति संवर्धित केळी रोपांच्या माध्यमातून यावर उपाय शोधावा लागणार आहे. राज्यात निर्यातक्षम केळीचे उत्पादन वाढत असताना पायाभूत सुविधांच्या अभावी निर्यात वाढताना दिसत नाही. सोलापूर, जळगावसह वसमत- हिंगोली, अर्धापूर-नांदेड, शहादा-ब्राह्मणपूर-नंदूरबार, धुळे असे केळी उत्पादनांचे क्लस्टर निर्माण होत असताना ते निर्यातीचे क्लस्टर म्हणून विकसित होताना दिसत नाहीत.

राज्यातील केळी क्लस्टरमध्ये निर्यातीच्या अनुषंगाने सर्व पायाभूत सुविधा जसे की रायपनिंग चेंबर, प्री-कूलिंग, पॅक हाउस, कंटेनर-रेफर व्हॅन उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. केळीची निर्यात प्रामुख्याने निर्यातदार, निर्यात कंपन्या करतात. अशा प्रकारच्या निर्यातीला मर्यादा असून, निर्यातीतील अधिक दराचा लाभ उत्पादकांपर्यंत पोहोचत देखील नाही.

त्यामुळे वैयक्तिक केळी उत्पादकांसह शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, समूह यांच्या सामुदायिक प्रयत्नांतून निर्यात वाढवायला पाहिजेत. आपली केळीची निर्यात प्रामुख्याने आखाती देशांत होते. फार थोडी केळी रशिया, युरोपमध्ये जाते. अशावेळी युरोपसह जगभरातील बाजारपेठांचा शोध घेऊन निर्यात वाढविण्याचे प्रयत्न उत्पादकांपासून ते केंद्र सरकारपर्यंत असे सर्वांनाच करावे लागतील.

आपल्या येथील केळीला पाकिस्तानमधून चांगली मागणी असते. परंतु मागील चार-पाच वर्षांपासून दोन देशांतील बिघडलेल्या संबंधामुळे पाकिस्तानला होणारी केळीची निर्यात बंद आहे. सध्या आपली केळी इराणमधून इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांना जाते. अशावेळी पाकिस्तान सोबतचा व्यापार सुरळीत करण्यावरही भर द्यायला हवा. याकरिता अपेडासह केंद्र सरकारच्या वाणिज्य, उद्योग मंत्रालयाने प्रयत्न केले पाहिजेत. केळी निर्यातवृद्धीसाठी असे सर्वांगांनी प्रयत्न झाले पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

Weather Update : नक्षत्र बदलले; वातावरणात वाढला उन्हाचा चटका

SCROLL FOR NEXT