Aminal Feed Management
Aminal Feed Management Agrowon
संपादकीय

Animal Feed Management : चारा नियोजनाचा ‘दुष्काळ’

Team Agrowon

Feed Management : पशुखाद्याच्या वाढत्या दराने पशुपालक मेटाकुटीस आलेला असताना आता राज्यात ओल्या आणि सुक्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे वैरण म्हणून वापरल्या जाणाऱ्या ज्वारीच्या कडब्याचे दर शेकडा साडेतीन ते पाच हजारांवर गेले आहेत.

शेतकऱ्यांच्या कडब्याला (Kadaba) अधिक दर मिळत असला तरी तो घेणाराही पशुपालक शेतकरीच आहे. मुळात हंगाम कोणताही असो, राज्यात चारा पिकांची तसेच कडबा म्हणून उपयोगात येणाऱ्या मका, ज्वारी, बाजरीची लागवड कमी झाली.

उसाचा हंगाम संपत आल्याने वाढे कमी झाले आहेत. या सर्वांच्या परिणामस्वरूप चाराटंचाई जाणवत आहे. त्यामुळे आधीच प्रतिलिटर दुधाच्या वाढत्या खर्चाने हैराण असलेल्या शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत येऊ शकतो.

दुधाचे दर वाढले की सर्वसामान्य ग्राहकांपासून ते सर्वच ओरड करतात. मात्र त्याच वेळी चारा असो की पशुखाद्य यांच्या वाढत्या दराने दुग्ध व्यवसाय परवडत नसला, तरी त्याची दखल कोणीच घेताना दिसत नाही. उन्हाळा अजून दोन महिने बाकी आहे.

त्याही पुढे दीड-दोन महिने चारा उपलब्ध व्हायला लागतात. त्यामुळे चाराटंचाई अधिक तीव्र होऊन दरात वाढच होत राहणार! त्यातच आगामी मॉन्सूनचा पाऊस देशात कमी असेल, असे भाकित एका विदेशी संस्थेने वर्तविले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचा मॉन्सूनबाबतचा अधिकृत हवामान अंदाज अजून आलेला नाही. परंतु राज्यात मागील चार वर्षे चांगला पाऊस झाला.

सलग तीन-चार वर्षे चांगल्या पावसानंतर कमी पाऊसमान झाल्याचे अनेक दाखले मिळतात. त्यामुळे पुढील वर्षभरासाठीच्या चाऱ्याचे योग्य नियोजन आतापासूनच झाले पाहिजे.

राज्यात दुष्काळाची दाहकता वाढू लागली, की शासन चारा छावण्या सुरू करते. चारा छावण्यांत जनावरांचे काय हाल होतात, हे पशुपालकांना वेगळे सांगायची गरज नाही.

चारा छावण्यांत जनावरे केवळ जिवंत ठेवण्याचे काम होते, तेथून परत आलेले जनावर दूध देऊ शकत नाही, शेतीतील कामही करू शकत नाही. भीषण दुष्काळात मनुष्यासाठी पाणी-धान्य कुठूनही आणून पुरविता येईल, परंतु पशुधनाच्या चाऱ्याचे काय? या प्रश्‍नांचे उत्तर अजूनही मिळत नाही.

चारा आधी उत्पादित करावा लागतो म्हणून चाऱ्याचे वार्षिक नियोजन आवश्यक आहे. दुग्धोत्पादनात एकूण खर्चाच्या ७० टक्क्यांहून अधिक खर्च हा चारा व पशुखाद्यावर होतो. त्यामुळे चाऱ्याचे नियोजन कोसळले, की राज्यातील दुग्ध व्यवसाय कोसळू शकतो.

वर्षभर चारा नियोजन हे कृषी तसेच पशुसंवर्धन विभागांचे काम आहे. परंतु या दोन्ही विभागांत चारा नियोजनाचा कायम दुष्काळ आढळून येतो.

आगामी संभाव्य चाराटंचाई पाहता हे दोन्ही विभाग चारा नियोजन गांभीर्याने घेतील, अशी आशा करूया. त्याच वेळी शेतकरी- पशुपालक यांनी दुग्ध व्यवसायाबरोबर इतर पशुधन टिकविण्यासाठी चारा नियोजन आपल्या हाती घ्यायला हवे.

ज्वारी, बाजरी, मका, ओट, चवळी, लसूणघास, बरसीम, संकरित नेपिअर, स्टायलो, मारवेल आदी चारा पिकांपैकी आपल्या गरजेनुसार निवड करून त्यांची हंगामनिहाय लागवड करायला हवी. हिरवा चारा विशिष्ट पद्धतीने मुरवून त्यापासून मुरघास करता येते. असा मुरघास हिरवा चारा उपलब्ध नसताना जनावरे आवडीने खातात.

त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी मुरघास करण्यावर भर द्यायला हवा. चाराटंचाईच्या काळात गव्हाचे काड किंवा भाताचे तूस अशा निकृष्ट चाऱ्यावर युरिया, मीठ व गूळ यांची प्रक्रिया करून तो अधिक रुचकर व पौष्टिक करता येतो.

पशुखाद्याचे दर वाढत असताना धान्य, डाळी, पेंड, गूळ, क्षार मिश्रण, मीठ यांचा वापर करून कमी खर्चात घरगुती पद्धतीने पशुखाद्य तयार करता येते.

या पद्धती पशुपालकांनी आता आत्मसात करण्याची गरज आहे. दुष्काळात पशुधनच तारतं, असे म्हटले जाते. मात्र त्यासाठी पशुधन आधी जगलं पाहिजे, एवढे लक्षात घ्यायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT