डॉ. दिनेश भोसले, डॉ. विठ्ठल मुंडे
Milk Management : दुग्धोत्पादनवाढीसाठी योग्य व्यवस्थापनासोबत समतोल आहार महत्त्वाचा आहे. गाई (Cow), म्हशींच्या पचनसंस्थेवर गुणवत्तापूर्ण दुग्धोत्पादन अवलंबून आहे. गाई, म्हशींची शारीरिक वाढ, प्रजोत्पादन, गर्भाची वाढ, कासेतील ग्रंथीच्या योग्य वाढीसाठी तसेच व्याल्यानंतर दूध निर्मितीसाठी (Milk) प्रथिने, ऊर्जा, खनिजे, जीवनसत्त्वे या सर्व अन्नघटकांचे योग्य प्रमाणात गरज असते.
दुग्धोत्पादनामध्ये जादा खर्च हा पशुआहारावर होतो. खुराकामध्ये मका, ज्वारी, बाजरी, डाळींच्या चुणी तसेच सरकी पेंड, सोयाबीन पेंड, भुईमूग पेंड, गहू, तांदळाचा कोंडा यांचा योग्य प्रमाणात वापर करून खुराक तयार करतात.
दुधामध्ये जे अन्नघटक असतात ते दुधाळ जनावरांच्या शरीरातूनच पुरविले जातात, म्हणूनच दूध निर्मितीसाठी गाई, म्हशींच्या आचळामार्फत साधारणतः ४०० ते ४५० लिटर रक्ताचे अभिसरण होते. म्हणजेच रक्तातूनच दुधातील अन्नघटक तयार होतात.
बायपास प्रथिने
दुग्धजन्य जनावरांच्या पोटात चार कप्पे असतात. पहिले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘रुमेन’ जेथे बहुतेक खाद्य पदार्थ विघटित होतात. सुमारे ६० ते ७० टक्के आहारातील प्रथिनयुक्त पदार्थ रुमेनमधील अमोनियामध्ये परावर्तित होतात.
या अमोनियाचा एक महत्त्वपूर्ण भाग युरियाच्या स्वरूपात मूत्राद्वारे उत्सर्जित केला जातो. अशा प्रकारे पेंड, खाद्यघटकातील प्रथिनांचा मोठा भाग वाया जातो.
आहारातील प्रथिनयुक्त खाद्यघटकांवर योग्य प्रक्रिया केली तर यामधील ऱ्हास कमी करता येतो. रुमेनमधील ऱ्हासापासून आहारातील प्रथिनांचे संरक्षण करण्यासाठी ही प्रक्रिया बायपास प्रथिने तंत्रज्ञान म्हणून ओळखली जाते.
हे संरक्षित प्रथिनयुक्त खाद्यघटक लहान आतड्यात अधिक कार्यक्षमतेने पचतात. परिणामी, दूध उत्पादनासाठी अतिरिक्त प्रथिने उपलब्ध होतात. हे जनावरांना अधिक दूध आणि चांगल्या दर्जाचे उत्पादन करण्यास मदत करते.
प्रथिनयुक्त खाद्यघटकांना विशेषत: तयार केलेल्या हवाबंद परिस्थितीमध्ये ६० ते ७० टक्क्यांवरून २५ ते ३० टक्क्यांपर्यंत रुमेनमधील त्यांची विघटनशीलता कमी करण्यासाठी योग्य प्रक्रिया केले जातात. हे खाद्यघटक थेट जनावरांना वरचे खाद्य म्हणून दिले जाऊ शकते.
एक किलो प्रति पशू प्रतिदिन किंवा २५ टक्के दराने पशुखाद्यात समाविष्ट केले जाऊ शकते. दूध उत्पादनाच्या पातळीवर हे पशुखाद्य दररोज ४ ते ५ किलो प्रति जनावरांना दिले जाऊ शकते.
युरिया मोलॅसेस मिनरल ब्लॉक
रवंथ करणाऱ्या जनावरांच्या रुमेनमध्ये मोठ्या प्रमाणात फायदेशीर सूक्ष्मजीव असतात, जे खाद्याच्या तंतुमय घटकांचे पचन करण्यास मदत करतात.
हिरव्या चाऱ्याच्या टंचाईच्या काळात, युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक रुमेन सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यास मदत करते. कोरड्या चाऱ्याची पचनक्षमता सुधारते. ‘एनडीडीबी‘ने युरिया मोलॅसेस मिनरल ब्लॉक तयार करण्याची ‘कोल्ड प्रोसेस’ विकसित केली आहे.
संतुलित रेशन आहार
‘एनडीडीबी‘द्वारे विकसित केलेले सॉफ्टवेअर जनावरांच्या आहारामध्ये संतुलन राखण्यासाठी विकसित केले आहे. याचा वापर स्थानिक क्षेत्रासाठी नेमल्या गेलेल्या प्रशिक्षित व्यक्तीद्वारे केला जाऊ शकतो.
फायदे
अधिक स्निग्धांश आणि एकूण घन पदार्थांसह दूध उत्पादनात वाढ.
पुनरुत्पादन कार्यक्षमता सुधारते.
जनावरांच्या उत्पादक जीवनात वाढ.
मिथेन उत्सर्जनात घट.
एकूण मिश्र रेशन
यामध्ये चारा, धान्य, प्रथिन खाद्य, खनिजे, जीवनसत्त्वे आणि विशिष्ट पोषक घटकांच्या जास्त प्रमाणासाठी तयार केलेले खाद्य पदार्थ एकाच खाद्य मिश्रणात एकत्र करते.
पिकांच्या अवशेषांवर प्रक्रिया
आहारातील पिकांच्या अवशेषांचा वापर सुधारण्यासाठी भौतिक (कणांच्या आकारमानात घट), जैविक (प्री-फीडिंग किण्वन, फायब्रोलाइटिक एन्झाईम्सची भर) आणि रासायनिक प्रक्रिया केली जाते.
न्यूट्रल डिटर्जंट फायबर, ॲसिड डिटर्जंट फायबर आणि ॲसिड डिटर्जंट लिग्निन समाविष्ट घटक अमोनिएटेड स्ट्रॉमध्ये आढळली आहे. कॉर्न स्टीप लिकर हे कार्बोहायड्रेट्स, अमिनो ॲसिड्स, पेप्टाइड्स, सेंद्रिय संयुगे, अजैविक आयन आणि ओल्या कॉर्न मिलिंगमधून मिळविलेले मायो-इनोसिटॉल फॉस्फेट यांचे मिश्रण आहे.
कॉर्न स्टीप लिकरमध्ये कमी सामू आहे, कारण त्याच्या उच्च लॅक्टिक ॲसिड समाविष्ट घटकांमुळे त्याचे थेट आहार रुमिनंट्सपर्यंत मर्यादित होते.
चयापचय आणि किण्वन सुधारक
पोषक तत्त्वांचा वापर, खाद्य कार्यक्षमता, वाढीचा दर, दुधाचे उत्पन्न आणि त्याची रासायनिक संरचना सुधारण्यासाठी जनावरांना खायला दिले जाते, इंजेक्शन दिले जाते.
किण्वन सुधारक खाद्यामध्ये रुमेन किण्वन हाताळण्यासाठी वापरली जातात. दोन्ही चयापचय आणि किण्वन मॉडिफायर्स (मिथेन इनहिबिटरस, प्रोटोजेनिक, डी आणि ई) एजंट्स, मायक्रोबियल एन्झाइम्स, बफर एजंट्स, आयनोफोर्स, प्रोबायोटिक्स, यीस्ट कल्चर्स, मोल्ड किण्वन अर्क आणि नॉन-आयोनिक सर्फेक्टंट खाद्याचा वापर आणि उत्पादक प्रतिसाद सुधारण्यासाठी वापरले जातात.
अपारंपरिक खाद्य संसाधनांचा वापर
वनस्पती प्रथिने स्रोत, प्राणी प्रथिने स्रोत, ऊर्जा स्रोत आणि इतर विविध अपारंपरिक खाद्य म्हणून वर्गीकृत करतात. या खाद्य घटकांची तपासणी आवश्यक आहे.
अपारंपरिक खाद्यांचा समावेश केल्याने जनावरांच्या आहारातील खुराकाचे प्रमाण कमी होते.
तृणधान्ये आणि हरभरा उप उत्पादने: तांदळाचा कोंडा, तांदळाचा भुसा, गव्हाचा कोंडा, मक्याचा भुसा.
साखर उद्योगाचे उप-उत्पादन : मळी
फळे, भाजीपाला कारखाना उप-उत्पादने - आंबा बाठा, टोमॅटो सालीचा लगदा, लिंबाची साल लगदा.
एक्सोजेनस एन्झाइम
एक्सोजेनस एन्झाइम्सचा वापर पिकांच्या अवशेषांच्या चांगल्या वापरासाठी आहे. हे एन्झाइम्स प्रामुख्याने सेल्युलोज, हेमिसेल्युलोज किंवा बुरशीजन्य उत्पत्तीचे असतात.
एन्झाइम पावडर, दाणेदार किंवा द्रव स्वरूपात असू शकतात. ते खाण्याआधी चाऱ्यावर फवारणी केल्यास प्रभावीपणे काम करतात. एन्झाइम्स आहारात मिसळल्यामुळे रुमेनची हायड्रोलाइटिक क्षमता वाढते. वाढीसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते.
खाद्याचे नियोजन
सर्केडियन म्हणजे जवळ जवळ २४ तास खाद्य घेण्याच्या नमुन्यांचे निरीक्षण केल्याने कोरड्या पदार्थांच्या सेवनाची मूलभूत यंत्रणा स्पष्ट करण्यात मदत होऊ शकते.
एक ते दोनदा किंवा दिवसातून दोनदा ते चार वेळा खाद्य देण्याचे प्रमाण वाढल्याने, समूहाने दूध देणाऱ्या गायींमध्ये प्रति गाईची सरासरी खाण्याची वेळ वाढली आहे. २४ तासांच्या कालावधीत गायींमध्ये खाण्याचे प्रमाण अधिक होते. अधिक वारंवार आहार दिल्याने कमी होणारी तंतुमय घटकांची पचनक्षमता सुधारते.
चयापचय आजारांचा प्रतिबंध
आहारात ऊर्जेच्या कमतरतेमुळे होणारा किटन बाधा (किटोसिस), कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होणारा दुग्धज्वर (मिल्क फीवर) आणि स्फुरद कमतरतेमुळे होणारा लाल मूत्र आजार (पोस्ट-पार्च्युरियंट हिमोग्लोबिन युरिया) दिसून येतो.
आजारांमुळे बाधित जनावरांचे दुग्ध उत्पादन घटते, औषधोपचारावर मोठा खर्च होतो. गाभण काळातील शेवटचा टप्पा व व्यायल्यानंतर जास्त दूध उत्पादनाचा काळ यामध्ये दुधाळ जनावरांची निगा, आरोग्य, आहार व व्यवस्थापन योग्यप्रकारे करून उत्पादकतेशी निगडित आजार टाळता येतात.
प्रतिबंध
दुग्धज्वर हा कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या ७२ तासांपर्यंत हा जास्त प्रमाणात आढळून येतो. विण्यापूर्वी २४ तास आणि व्यायल्यानंतर ४८ तासांपर्यंत ३०० ग्रॅम कॅल्शिअम जेल दररोज पाजल्यास दुधाळ जनावरांत दुग्धज्वर आजार टाळता येतो.
जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींना असमतोल आहार मिळाल्यास किटोसिस होतो. प्राथमिक स्वरूपाची कारणे, जसे की आहारात जास्त प्रथिनयुक्त घटकांचा वापर उदा. शेंगदाणा / सरकी पेंड, जनावर वितेवेळी अति लठ्ठ असणे.
दूध देण्याच्या सुरुवातीच्या काळात जनावरांच्या आहारात खुराकाचा वापर हळूहळू वाढवावा. अचानक जास्त प्रमाणात खुराक देऊ नये. जनावर विण्याच्या अगोदरपासून खुराकाचा वापर सुरू करावा.
जेणेकरून कोठीपोटातील उपयुक्त जिवाणूंना त्यांची सवय होईल. दूध देणाऱ्या सुरुवातीच्या काळात जास्त आम्लयुक्त चारा जनावरांना देऊ नये. जनावरांच्या आहारात क्षार मिश्रणाचा (५० ते १०० ग्रॅम) योग्य प्रमाणात वापर करावा.
डॉ. दिनेश भोसले, ९८६०३१५५५८ (डॉ. भोसले हे एबी विस्टा कंपनीचे विभागीय विक्री संचालक आहेत, डॉ. विठ्ठल मुंडे हे पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे पशुपोषणशास्त्र विभागामध्ये सहायक प्राध्यापक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.