Agriculture Department Agrowon
संपादकीय

Agriculture Department: दुभत्या गायीला कृषिमंत्र्यांचा नकार

Transfer Corruption: बदल्यांमधून होणारे लक्ष्मीदर्शन नाकारण्याचे सूतोवाच एखादा कृषिमंत्री करतो ही दुर्मीळ बाब ठरावी.

Ramesh Jadhav

Agriculture Department Transfer Scam: सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच पुणे येथे कृषी विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत आपल्या नेहमीच्या धडाकेबाज शैलीत भाषण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांची कानउघडणी केल्याच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रिपद औटघटकेचे असते, साधा कार्यकर्ता ते मंत्री असा आपला प्रवास आहे, बोलताना थोडे इकडे-तिकडे होत असेल, पण आपला हेतू प्रामाणिक असतो असे खुलासेवजा ते बोलले.

पण कृषी खात्याच्या कार्यपद्धतीतील बदलांबद्दल भाष्य करताना आपण स्वतःहून बदल्यांच्या अधिकाराचा त्याग करत असल्याचे विधान त्यांनी या वेळी केले. हे विधान धाडसी आणि महत्त्वपूर्ण आहे. कृषी खात्यातील क आणि ड वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार क्षेत्रीय स्तरावर, काही बदल्यांचे अधिकार कृषी राज्यमंत्र्यांना आणि केवळ वरिष्ठ पातळीवरच्या एक ते दोन टक्के अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आपल्याकडे राहतील, असे कोकाटे यांनी या वेळी स्पष्ट केले.

कृषी विभाग हा १८८३ मध्ये स्थापना झालेला राज्यातील सर्वांत जुन्या विभागांपैकी एक आहे. राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासात या विभागाचे एकेकाळी राहिलेले योगदान दुर्लक्षित करण्याजोगे नाही. परंतु या खात्याच्या १४२ वर्षांच्या इतिहासातील अल्प कालावधीचा अपवादात्मक सुवर्णकाळ वगळता हे खाते कायम टीकेचे धनी ठरले आहे. वास्तविक शरद पवार, वसंतदादा पाटील, पी. के. सावंत, नानाभाऊ एंबडवार, रोहिदास पाटील, रणजित देशमुख, गोविंदराव आदिक, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गजांनी या खात्याची धुरा सांभाळली.

परंतु नंतर अपवाद वगळता सुमार लोकांकडे या खात्याची जबाबदारी सोपवल्यामुळे घसरगुंडी सुरू झाली. शशिकांत सुतार, एकनाथ खडसे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, धनंजय मुंडे हे कृषिमंत्री वादग्रस्त ठरले. त्यांच्यातील समान धागा म्हणजे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी पैसे खाल्ल्याचे झालेले आरोप. गलेलठ्ठ रक्कम मोजून मलईदार पदे पदरात पाडून घ्यायची आणि ही रक्कम काही पटींनी वसूल करण्यासाठी गैरव्यवहार करायचे, असा शिरस्ताच पडला. त्यात भरडला जातो तो सामान्य शेतकरी. बदल्यांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने बदल्यांचा कायदा केला.

पण त्याला पद्धतशीरपणे धाब्यावर बसवत कार्यभाग साधला जातो. अलीकडच्या काळातील सलग तीन-चार कृषिमंत्र्याचे (बदल्यांच्या प्रकरणात पैसे गोळा करणारे) ‘कलेक्टर’ म्हणून जबाबदारी आयुक्तालयातील एकच उद्योगी अधिकारी सांभाळत होता. हे महाशय सुपर कमिशनरच्या तोऱ्यात खात्याची सूत्रे हलवत असत आणि या खात्यासाठी नवखे असलेल्या मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या वाटा-चोरवाटांची मौल्यवान माहिती पुरवत असत. बदल्यांसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची पिळवणूक करताना नेसूचे सोडून डोक्याला बांधण्यातही ‘ना भयं ना लज्जा’ वाटेनाशी झाली.

या पार्श्‍वभूमीवर विद्यमान कृषिमंत्री जर बदल्यांची ही दुभती गाय स्वतःहून नाकारत असतील, तर तो निश्‍चितच चर्चेचा विषय ठरतो. पण ते हा शब्द खरेच पाळतील की आजवरच्या अनेक कृषिमंत्र्यांप्रमाणे यांचेही दाखवायचे आणि खायचे दात वेगळे निघतात, याचा प्रत्यय भविष्यकाळात येईलच. विद्यमान कृषिमंत्री वाचाळवीर असले, त्यांना बोलताना जिभेला लगाम लावता येत नसला, तरी ते आपल्या मुरब्बी पूर्वसुरींप्रमाणे लक्ष्मीदर्शनासाठी हपापलेले नाहीत, हा संदेश मात्र या सगळ्यातून गेला आहे. त्याची नैतिक बूज राखण्यासाठी कृषिमंत्र्यांना आपली वृत्ती आणि कृती त्याला साजेशी ठेवावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT