
Pune News : ‘‘कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची मोठी क्षमता असून शासनाकडून सेवासुविधा दिल्या जातील. यापुढे अन्यायकारक बदल्या होणार नाहीत. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची तयारीही सरकारची आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही स्वच्छ हेतू ठेवून पारदर्शकपणे काम करा,’’ असे खडेबोल कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सुनावले.
कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या संकल्पनेतून राज्यात प्रथमच आयोजिलेल्या ‘कृषी अधिकारी-कर्मचारी कार्यशाळा २०२५’चे उद्घाटन करताना कृषिमंत्री कोकाटे बोलत होते. व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जैस्वाल, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंग, ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व वनौषधी मंडळाचे अभियान सुनील महिंद्रकर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ होते.
शेतकरी, ग्राहक संभ्रमात : कोकाटे
राज्यातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याची घोषणा करीत कृषिमंत्री अॅड. कोकाटे म्हणाले, ‘‘हवामान बदलातील संकटामुळे शेती चेष्टेचा विषय बनला आहे. सतत नुकसान होत असल्यामुळे शेती करावी की नाही, या संभ्रमात शेतकरी आहेत. दुसऱ्या बाजूला विषयुक्त अन्नघटकांमुळे काय खावे आणि खाऊ नये, अशा संभ्रमात ग्राहक आहेत. अशा स्थितीत उत्पादनात गुणवत्तेसह वाढ, चांगली बाजार व्यवस्था, योग्य भाव अशी मूल्यसाखळी राज्यात तयार करावी लागेल. त्यासाठी अनुकूल धोरणासाठी सरकार तयार आहे. शेतकरीही बदलासाठी सज्ज आहेत. त्यामुळे कृषी कर्मचाऱ्यांनी आता जबाबदारीने पुढे यावे. ही कृषिक्रांती एका रात्रीत होणार नाही. मात्र बदल घडवायाचाच आहे, असा संकल्प ठेवून कृषी अधिकाऱ्यांनी सामूहिक जबाबदारीने स्वच्छ हेतू ठेवत पारदर्शकपणे काम करावे.’’
अधिकारासाठी भांडण नको : जैस्वाल
कृषी राज्यमंत्री श्री. जैस्वाल म्हणाले, ‘‘कृषी कर्मचारी किती जिद्दीने, तळमळीने काम करतो यावर राज्याच्या कृषी विकासाचे भवितव्य अवलंबून आहे. आता अधिकारासाठी भांडण नको. अधिकारासाठी भांडत असताना कर्तव्येदेखील पार पाडायला हवीत. कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक केल्यास शेतकरी दीर्घकाळ उभा राहील. त्यामुळे ती तयारी आम्ही ठेवली असून कृषी हिताचे निर्णय आम्ही घेणार आहोत. तुम्हीदेखील या कार्यशाळेत ठरलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करावी.’’
बदल घडविण्याचे आव्हान : मांढरे
कृषी आयुक्त श्री. मांढरे प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘कृषी क्षेत्रात नवनवे तंत्रज्ञान वावटळीसारखे येते आहे. त्यामुळे पुढील काळात नवी आव्हाने येतील. त्याला सामोरे जाण्यासाठी क्षमतावाढीचा कार्यक्रम या कार्यशाळेतून मिळणार आहे. रिक्त पदे वगैरे या समस्या नेहमीच्याच आहेत. मात्र उपलब्ध साधनसामग्रीतून बदल घडविण्याचे आव्हान आपल्यासमोर असून, या कार्यशाळेमुळे कृषी विस्ताराला गती मिळणार आहे.’’
या कार्यशाळेच्या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्तेसह शेतकरी कंपन्यांच्या उत्पादनाचा समावेश असलेले एक प्रदर्शन भरविण्यात आले होते. राज्याच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रापासून ते राज्याच्या बागायती, कोरडवाहू शेतीबाबत दिवसभर चर्चा कार्यशाळेत झाली. या वेळी कृषी संचालक रफिक नाईकवाडी (विस्तार व प्रशिक्षण), डॉ. कैलास मोते (फलोत्पादन), विनयकुमार आवटे (प्रक्रिया व नियोजन), अशोक किरनळ्ळी (आत्मा) तसेच राज्यातील सर्व कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, निवडक क्षेत्रिय कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
मंत्रिपद औट घटकेचे...
‘‘मंत्रिपद औट घटकेचे आहे. मला त्याचे काहीही वाटत नाही. मात्र पक्षाने, नेत्यांनी दिलेली जबाबदारी मी कर्तव्यभावनेतून पार पाडणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील राज्यातील शेतकरी धडपडतो आहे आणि काम करतो आहे. त्यामुळे शेतकरी राजाला सुखी करण्यासाठी तुम्हीदेखील मनापासून काम करा, असे आवाहन कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी या वेळी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.