Food Security Agrowon
संपादकीय

Food and Nutrition Security : कृषी परिवर्तनातून साधूया अन्न अन् पोषण सुरक्षा

Food Security : हैदराबाद येथे जून-२०२३ मध्ये आयोजित जी-२० कृषी मंत्र्यांची बैठक म्हणजे अन्नसुरक्षा आणि पोषण या विषयावरील जागतिक चर्चेतील मैलाचा दगड ठरली आहे.

Team Agrowon

नरेंद्रसिंह तोमर

Food and Nutrition : हैदराबाद येथे जून-२०२३ मध्ये आयोजित जी-२० कृषी मंत्र्यांची बैठक म्हणजे अन्नसुरक्षा आणि पोषण या विषयावरील जागतिक चर्चेतील मैलाचा दगड ठरली आहे. या मेळाव्याने सर्वसमावेशक, लवचीक आणि शाश्‍वत कृषी प्रणाली स्थापन करण्याच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेची पुष्टी केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनात, भारताच्या अध्यक्षतेखालील जी-२० ने संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. ‘अमृत काल’च्या युगात प्रवेश करून, भारताने विकासाच्या दिशेने विशेषतः कृषी क्षेत्रात परिवर्तनाचा प्रवास सुरू केला आहे. भरणपोषण, उपजीविका आणि आर्थिक स्थैर्य प्रदान करणारे कृषी क्षेत्र हे नेहमीच मानवी प्रगतीमध्ये अग्रेसर राहिले आहे. डिजिटलायझेशन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे कृषी क्षेत्र परिवर्तनाच्या नवीन लाटेचे साक्षीदार बनले आहे. अन्न सुरक्षा, पर्यावरण आणि सामाजिक-आर्थिक विकासाशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार आणि भागधारकांना मदत करताना कृषी क्षेत्राला पुढील स्तरावर नेण्याची क्षमता डिजिटल क्रांतीमध्ये आहे.


कृषी क्षेत्रात केल्या जाणाऱ्या तत्सम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या वापरामुळे शेतीपद्धतींमध्ये क्रांती घडवून आणण्याचे तसेच शाश्‍वत पद्धतींद्वारे शेतीची उत्पादकता वाढवण्याचे सुनिश्‍चित होते. रिअल-टाइम ॲडव्हायझरी, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रिमोट सेन्सिंग यांसारख्या सेवा देशातील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करतील. वित्तपुरवठा आणि इतर संसाधनांच्या सुलभ उपलब्धतेमुळे विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना समपातळीवर येण्यास मदत झाली आहे. त्यांना प्रभावीपणे स्पर्धा करण्यास, त्यांच्या कार्याचा विस्तार करण्यास तसेच अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यास सक्षम केले आहे. कृषी क्षेत्रातील डिजिटलायझेशनच्या संभाव्यतेचा पूर्ण उपयोग करण्यासाठी, तपशील सामायिक करणाऱ्या आणि खुलेपणाला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

जी-२० सदस्य राष्ट्रे सर्व भागधारकांसोबत सहकार्य करण्यासाठी आणि डिजिटल साधने आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी वचनबद्ध आहेत; विशेषतः अल्पभूधारक, लहान शेतकरी, महिला, तरुण, वृद्ध शेतकरी आणि इतर कमी प्रतिनिधित्व असलेले गट यांना त्याचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासह क्षमता-निर्मिती प्रयत्नांना बळकट करणे आवश्यक आहे. सीमापार आणि आंतरराष्ट्रीय अनुभवांची देवाणघेवाण यामुळे कृषी तंत्रज्ञानाचा वापर आणि अन्न प्रणालींची सुधारणा करण्यासाठी अंतर्दृष्टी मिळेल. विज्ञान, तंत्रज्ञान तसेच नवनवीन उपक्रम यांच्या माध्यमातून सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांचा सहभाग तांत्रिक आणि डिजिटली सक्षम कृषी-अन्न प्रणालीला चालना देऊ शकतो. कृषी-तंत्रज्ञान स्टार्ट-अप हे संपूर्ण कृषिमूल्य साखळीतील आव्हानांचा सामना करण्यासाठी खुल्या डिजिटल नेटवर्कच्या वापराने अभिनव आणि परवडणारे उपाय उपलब्ध करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. अत्याधुनिक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या साह्याने खुल्या डिजिटल नेटवर्कची क्षमता आम्हाला खुणावत आहे, निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन करीत आहे. यासाठी बहुआयामी, बहुभागधारक आणि सहयोगी दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. अशा सामूहिक प्रयत्नांद्वारेच आपण कृषी क्षेत्रातील डिजिटलायझेशनची परिवर्तनीय संभाव्यता अजमावू शकतो, शेतकऱ्यांसाठी शाश्‍वत आणि समृद्ध भविष्य तसेच व्यापक कृषी परिसंस्था सुनिश्‍चित करू शकतो. आता कृती करण्याची वेळ आली आहे आणि कृषी तसेच जागतिक अन्न सुरक्षेच्या सुधारणेकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

भारत केवळ डिजिटल क्रांतीद्वारे कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्यावर लक्ष केंद्रित करत नाही तर जागतिक स्तरावर अन्नसुरक्षा आणि पोषण या दोन्हीकडे लक्ष देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे. जी-२० मधील एक महत्त्वाचा गट शेतीशी संबंधित आहे, ज्याने गेल्या काही महिन्यांत भारतातील विविध शहरांमध्ये बैठका घेतल्या आहेत, ज्यामध्ये शाश्‍वत शेतीद्वारे अन्नसुरक्षा आणि हवामानातील लवचिकतेला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. संपूर्ण जगाला चिंतित करणारा हा विषय बैठकीत प्रामुख्याने होता. या मेगा कार्यक्रमादरम्यान झालेल्या जी-२० कृषी कार्य गटाच्या बैठका ऐतिहासिक होत्या. कृषी कार्यगटाचे यश २०० हून अधिक शिष्टमंडळांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करते, ज्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातील सर्वांत स्वच्छ शहर इंदूर, सुनियोजित शहर चंडीगड, पवित्र शहर वाराणशी असा प्रवास करून‌ शेवटी मोत्यांचे शहर हैदराबाद गाठले. १६-१७ जून २०२३ रोजी हैदराबाद येथे आयोजित जी-२० कृषी मंत्र्यांची बैठक म्हणजे अन्नसुरक्षा आणि पोषण या विषयावरील जागतिक चर्चेतील मैलाचा दगड ठरली आहे. बैठकीच्या फलनिष्पत्ती दस्ताऐवजामध्ये‌ अन्न आणि खतांच्या किमतीतील अस्थिरता, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि भू-राजकीय तणाव याविषयीच्या जागतिक समुदायाच्या चिंता व्यक्त करण्यात आल्या. लवचीक आणि विश्‍वासार्ह पुरवठा साखळी जागतिक अन्नसुरक्षेसाठी विशेषतः मानवतावादी संकटाच्या काळात महिला आणि मुली यांच्यासारख्या उपेक्षित गटांसाठी‌ आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अन्न संसाधनांमध्ये विविधता आणणे
बैठकीच्या लक्षणीय विभागांपैकी एक विभाग वैविध्यपूर्ण आणि शाश्‍वतपणे उत्पादित पौष्टिक अन्नाच्या महत्त्वावर भर देतो. पीक विकासात नवनवीन उपक्रमांना प्रोत्साहन देत, मंत्र्यांनी हवामानाशी सुसंगत, स्थानिक पातळीवर अनुकूल आणि कमी वापर असलेल्या धान्यांच्या गरजेकडे लक्ष वेधले. कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधन आणि विकासाच्या भूमिकेवर भर देण्यात आला आहे.

पोषण आणि बायोफोर्टिफिकेशन
जी-२० देशांच्या मंत्र्यांनी पौष्टिकतेच्या पुराव्यावर आधारित दृष्टिकोनाचे समर्थन केले, पौष्टिक पर्याप्तता ही प्रामुख्याने विविध खाद्यपदार्थातून आली पाहिजे यावर भर दिला. त्यांनी पिकांमधील पोषण मूल्य सुधारण्यासाठी जैव फोर्टिफिकेशनची क्षमतादेखील मान्य केली.

शाश्‍वत विकासाच्या उद्दिष्टांवर भर
जी-२० देशांच्या मंत्र्यांनी शाश्‍वत शेती, अन्न उत्पादन, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शाश्‍वत विकासाची उद्दिष्टे, विशेषतः शून्य-उपासमारीचे उद्दिष्ट यांच्यातील परस्परसंबंध नमूद केले. अलीकडील अंदाजानुसार, २०३०पर्यंत सुमारे ६०० दशलक्ष माणसे दीर्घकाळ कुपोषित असतील. हा अंदाज भूक निर्मूलनाचे मोठे आव्हान अधोरेखित करतो. त्यांनी शाश्‍वत अन्न उत्पादन, साठवणूक, विपणन आणि तोटा कमी करण्यासाठी विकसनशील देशांमध्ये क्षमता वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

तपशिलांवर आधारित पारदर्शक निर्णय घेणे
कृषी बाजार माहिती प्रणाली (एएमआयएस) आणि ग्रुप ऑन अर्थ ऑब्झर्व्हेशन ग्लोबल ॲग्रिकल्चरल मॉनिटरिंग (जिओग्लॅम) हे कृषी बाजाराची पारदर्शकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम आहेत. अन्न असुरक्षितता ही केवळ उपलब्धतेचीच नाही तर संपर्काचीही बाब आहे

परिणाम आणि भविष्यातील क्रिया
या जी-२० बैठकीमध्ये भारताच्या नेतृत्वाखालील चर्चांनी एक चौकट तयार केली आहे, ज्याआधारे आंतरराष्ट्रीय उपक्रम तयार केले जाऊ शकतात किंवा त्यांचा विस्तार केला जाऊ शकतो. यामुळे वाढत्या तीव्र अन्न असुरक्षिततेला आणि जागतिक स्तरावरील सततच्या उच्च पातळीवरील उपासमारीला योग्य वेळी प्रतिसाद मिळाला आहे.
जी-२० देशांच्या मंत्र्यांच्या बैठकीत एक पथदर्शी उपक्रम तयार झाला आहे; आता आव्हान आहे त्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे. विविध देशांनी तत्त्वांवर आधारित सर्वोत्तम पद्धती सामायिक केल्यानंतर मजबूत अन्नसुरक्षा आणि अधिक चांगले पोषण यासाठीचे जगाचे वचन प्रत्यक्षात येत आहे. मैलाचा दगड असलेली ही बैठक एक महत्त्वपूर्ण उत्प्रेरक म्हणून काम करत आहे, जिच्यात पुढील पिढ्यांसाठी अन्नसुरक्षा आणि पोषण बदलण्याची क्षमता आहे.
(लेखक केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT