Turmeric Crop  Agrowon
नगदी पिके

Turmeric Crop : हळद पिकातील रोगनियंत्रण

Turmeric Disease control : हळद पिकामध्ये प्रामुख्याने कंदकुज (गड्डाकुज), करपा आणि पानांवरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकावर अनिष्ट परिणाम होऊन गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर विपरीत परिणाम होतो.

Team Agrowon

Turmeric Disease Management : हळद पिकामध्ये प्रामुख्याने कंदकुज (गड्डाकुज), करपा आणि पानांवरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकावर अनिष्ट परिणाम होऊन गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पिकाचे निरीक्षण करून रोगांचा प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून योग्य उपाययोजनांचा त्वरित अवलंब करणे गरजेचे आहे. जेणेकरून उत्पादनात निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळद उत्पादन मिळविणे शक्य होईल.

कंदकुज (गड्डाकुज) ः

- हा बुरशीजन्य रोग असून, त्याला रायझोम रॉट असेही म्हणतात.

- रोगाची लक्षणे कंदाच्या कोवळ्या फुटव्यावर त्वरित दिसून येतात.

- सुरळीतील पानांचे शेंडे वरून व कडेने पिवळे पडून १ ते १.५ सेंमी खालपर्यंत वाळत जातात. पुढे पान संपूर्णपणे वाळते.

- खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो.

- प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो पचपचीत व मऊ लागतो. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडत असते.

अनुकूल घटक ः

- भरपूर पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन.

- जास्त आर्द्रता तसेच ढगाळ उबदार हवामान.

प्रतिबंधात्मक उपाय ः

- जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस प्रतिएकरी २ ते २.५ किलो पावडर २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी.

- अतिपावसामुळे प्रादुर्भावित झालेले कंद उपटून नष्ट करावेत.

- शेतामध्ये उताराला आडवे चर घेवून पाण्याचा निचरा करावा. पाणी साठू देऊ नये.

- पिकांची फेरपालट करावी.

- आंतरमशागतीची कामे करताना गड्ड्यांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

- हळद पिकाची काढणी केल्यानंतर पुढील वर्षाच्या लागवडीसाठी चांगले कंदकुज मुक्त मातृकंद निवडावेत. त्यांची योग्य पद्धतीने साठवण करावी. कारण, ठरावीक कालावधीनंतर साठविलेल्या कंदांना कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव झाला की नाही ते तपासावे.

- कुजलेले गड्डे बांधावर न टाकता जाळून नष्ट करावेत.

- हळद काढणीनंतर शेताची खोल नांगरट करावी. जेणेकरून सुप्तावस्थेतील किडीचे कोष नष्ट होतील.

- पीक पक्व होण्याअगोदर म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लागवड क्षेत्र पूर्णत: कंदकुज रोगविरहित असल्याची खात्री करावी.

रासायनिक नियंत्रण ः (आळवणी प्रमाण ः प्रतिलिटर पाणी)

- कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यू.पी.) १ ग्रॅम किंवा

मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू.पी.) २ ग्रॅम किंवा

कॉपर ऑक्झिक्लोराइड (५० डब्ल्यू.पी.) ५ ग्रॅम

याप्रमाणे रोपांच्या बुडाजवळ आळवणी करावी.

- रोगाची तीव्रता जास्त असल्यास,

मेटॅलॅक्सिल (एम ४ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के डब्ल्यू.पी.) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम किंवा

हेक्झाकोनॅझोल (५ ई. सी.) ०.५ ते १ मिलि

(टीप ः आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरीलप्रमाणे आळवणी करावी.)

२) पानांवरील ठिपके (करपा/लिफ स्पॉट) ः

- हा बुरशीजन्य रोग झाडावरील कोणत्याही पानावर येऊ शकतो.

- पानांवर अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. हे ठिपके वैशिष्ट्यपूर्ण असतात.

- पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात.

- रोगाची तीव्रता वाढल्यास, ठिपके वाढून एकत्र येऊन संपूर्ण पान करपते.

- पान तांबूस राखाडी, तपकिरी रंगाचे दिसते. पान वाळून गळून पडते. संपूर्ण पीक वाळलेले दिसते.

अनुकूल घटक ः

- जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये रोगाची तीव्रता जास्त असते.

- साधारणपणे २१ ते २३ अंश सेल्सिअस तापमान आणि ८० टक्के आर्दता.

- अत्यंत ढगाळ वातावरण आणि भरपूर पाऊस.

- पाण्याचा कमी निचरा होणारी जमीन.

- वातावरणात सकाळी पडणारे धुके व दव असताना या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

नियंत्रण ः

- रोगट पाने कापून जाळून नष्ट करावीत.

रासायनिक नियंत्रण ः (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

- मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू.पी.) २ ते २.५ ग्रॅम किंवा

कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) १ ते २ ग्रॅम किंवा

कॉपर ऑक्झिक्लोरार्इड (५० डब्ल्यू.पी.) २.५ ते ३ ग्रॅम

- रोगाची तीव्रता जास्त झाल्यास,

प्रोपीकोनॅझोल (२५ ई. सी.) ०.५ ते १ मिलि किंवा

क्लोरोथॅलोनील (७५ डब्ल्यू.पी.) २ ते २.५ ग्रॅम

(टीप ः जास्त दिवस धुके राहिल्यास १५ दिवसांच्या अंतराने पीक सात महिन्यांचे होईपर्यंत वरीलप्रमाणे आलटून पालटून फवारणी करावी.)

३) पानांवरील ठिपके (लिफ ब्लॉच) ः

- या बुरशीजन्य रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या पानांवर होऊन नंतर सर्व पानांवर दिसून येते.

- पानांवर तीन प्रकारचे ठिपके तयार होतात. पहिल्या प्रकारात रोगाच्या प्राथमिक अवस्थेत पानांच्या वरच्या पृष्ठभागावर असंख्य लहान गोलाकार दाण्यासारखे ठिपके तयार होतात. ठिपक्याच्या मध्यभागी बुरशीची काळी फळे रचलेली असतात. सुरुवातीला ठिपक्यांच्या सभोवती पिवळी कडा नसते. परंतु कालांतराने ठिपक्यांच्या सभोवती पिवळी कडा तयार होते. पान तांबूस रंगाचे होऊन वाळून जाते.

- दुसऱ्या प्रकारात पानाच्या वरच्या पृष्ठभागावर अंडाकृती किंवा गोलाकार काळ्या रंगाचे खोलगट ठिपके तयार होतात.

- तिसऱ्या प्रकारात २ ते ४ मिमी आकाराचे पांढरे ठिपके पडतात. ठिपक्याच्या पांढऱ्या भागावर बुरशीची काळी फळे इतस्तत: पसरलेली असतात. कालांतराने पानांच्या वरच्या पृष्ठभागावर हिऱ्याच्या खड्यांच्या आकाराचे तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. पानाच्या खालील भागांवर मुख्य शिरेच्या बाजून लालसर करड्या रंगाचे १ मे २ सेंमी व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात.

- पाने शेंड्याकडून पिवळी दिसू लागतात. हे ठिपके फुलांवरसुद्धा आढळतात.

अनुकूल घटक ः

- ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत वातावरणातील आर्द्रता ८० टक्के आणि तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस असताना रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागतो.

- जुलै ते नोव्हेंबर या काळात रोगाची तीव्रता अधिक असते.

- अत्यंत ढगाळ वातावरण आणि भरपूर पाऊस.

- पाण्याचा कमी निचरा होणारी जमीन.

नियंत्रण ः

- रोगग्रस्त पाने, फुले याद्वारे रोगाचा प्राथमिक प्रसार होतो. त्यामुळे रोगग्रस्त पाने व फुले गोळा करून नष्ट करावीत. शेतात स्वच्छता ठेवावी.

- रोगाचा दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो. व्यवस्थापनाकरिता,

(फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू.पी.) २ ते २.५ ग्रॅम किंवा

कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यू.पी.) १ ते २ ग्रॅम किंवा

कॉपर ऑक्झिक्लोरार्ईड (५० डब्ल्यू.पी.) २.५ ते ३ ग्रॅम

- रोगाची तीव्रता जास्त झाल्यास,

प्रोपीकोनॅझोल (२५ ई.सी.) ०.५ ते १ मिलि किंवा

क्लोरोथॅलोनील (७५ डब्ल्यू.पी.) २ ते २.५ ग्रॅम

(ॲग्रेस्को शिफारस आहे.)

- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली येथे कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT