। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।। 
मुख्य बातम्या

। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।

मुकुंद परंडवाल

देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि टाळमृदंगाच्या गजरात शुक्रवारी (ता. २२) अवघी देहूनगरी दुमदुमली. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३७१ बीजसोहळा मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार इंद्रायणी नदीच्या तीरावर पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दोन लाख भाविक या सोहळ्याला उपस्थित होते. सकळिकांचे समाधान। नव्हे देखिल्यावांचून ।। रूप दाखवी रे आता । सहस्रभुजांच्या मंडिता ।। शंखचक्रपद्यगदा । गरुडासहित ये गोविंदा ।। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।। या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओव्यांप्रमाणे भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी हा वैकुंठगमन सोहळा "याचि देही याचि डोळा' अनुभवला. सदेह वैकुंठगमनाची वेळ जशी जवळ येत होती, तशी टाळमृदंग आणि तुकाराम तुकाराम नामघोषात देहूनगरी न्हाऊन निघत होती. लाखोंच्या संख्येने जमलेल्या भाविकांनी वैकुंठगमन सोहळ्याची वेळ जवळ येताच दुपारी साडेबारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीजसोहळ्यासाठी लाखो भाविक गेल्या दोन दिवसांपासून देहूत दाखल झाले होते. बीज सोहळ्याच्या दिवशी पहाटेपासूनच मुख्य देऊळवाड्यात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे इंद्रायणी नदीत स्नान करून भाविक दर्शनासाठी मंदिरात येत होते. मुख्य देऊळवाड्यात पहाटे तीन वाजता काकडा आरती झाली. पहाटे चार वाजता संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्वस्त अशोक मोरे, सुनील दिं. मोरे, अभिजित मोरे, विठ्ठल मोरे, जालिंदर मोरे, सुनील दा. मोरे यांच्या हस्ते श्रींची महापूजा झाली. संस्थानचे विश्वस्त जालिंदर मोरे, सुनील दा. मोरे, विश्‍वजित मोरे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापूजा झाली. पहाटे साडेपाच वाजता वैकुंठस्थान मंदिरात विश्वस्त सुनील दा.मोरे, अभिजित मोरे, विठ्ठल मोरे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांची महापूजा झाली. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पादुका असलेल्या पालखीने वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान ठेवले. पालखीच्या पुढे सनई चौघडे, ताशे, नगारे, अब्दागिरी आणि टाळकरी होते. पालखीपुढे मानाची कल्याणकरांची दिंडी होती. वैकुंठस्थान मंदिरासमोर संस्थानचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ कीर्तनकार बापूसाहेब मोरे यांचे संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यावरील "घोटविन लाळ ब्रह्मज्ञानी हाती, मुक्त आत्मस्थिती सांडविण, ब्रह्मभुतकाया होतसे कीर्तनी, भाग्यतरी ऋणी देव ऐसा' या अभंगावर कीर्तन झाले. दुपारी बारा वाजण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तशी तुकाराम तुकाराम.. नामाचा जयघोष सुरू झाला. भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. वैकुंठस्थान मंदिरात संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्वस्त अभिजित मोरे, खासदार श्रीरंग बारणे, सभापती हेमलता काळोखे, पार्थ पवार यांच्या हस्ते आरती झाली. या वेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, अप्पर तहसीलदार गीता गायकवाड व अन्य मान्यवर उपस्थित होते. आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखीचे मुख्य देऊळवाड्याकडे आगमन झाले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: ‘हळदीच्या वायद्यां’साठी ‘सेबी’वर धडक

Residue Free Farming: अवशेषमुक्त शेतीपद्धतीच मानवी आरोग्याला तारणार

Aaple Sarkar: विद्यापीठाच्या ५६ अधिसूचित सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर

Kharif Crop Disease: पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भाव

Crop Cutting Experiment: पीककापणी प्रयोगात मोईश्‍चर मीटरचा वापर बंधनकारक करावा

SCROLL FOR NEXT