नगर : दुधाला हमी भाव देण्यासह तातडीने उपाययोजना करण्याबाबत दुग्धविकासमंत्र्यासोबत शेतकरी संघटनांचे नेते, दूध संघाचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. मंत्र्यांनी आठ दिवसांत तोडगा काढून दरवाढ करण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन महिने होत आले तरी दर वाढले नाहीत. सध्या दुधाला २२ ते २३ रुपये दर मिळत आहे. पशुखाद्याचे दर वाढलेले असताना दुधाचा भाव वाढत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. एक लिटर दूध उत्पादनासाठी सध्या २८ ते ३० रुपये खर्च येत असल्याने नफा नव्हे तर सध्याच्या दरानुसार पाच रुपयांचा तोटा सोसावा लागत असल्याचे दूध उत्पादक सांगत आहेत.
राज्यात साधारण एक कोटी ४० लाख लिटरच्या जवळपास गाईच्या दुधाचे संकलन होते. कोरोना संसर्गाच्या काळात गेल्या दीड वर्षापासून दुधाचे दर अस्थिर आहेत. मागणी नसल्याचे सांगत दूध संघांनी दर घटविले. वर्षभरात दोन महिने चांगले दर मिळाल्यानंतर पुन्हा चार महिन्यापासून दर कपात करत ३२ रुपयांचा दर २० रुपयांवर आणला. दुधाला दर दिला जात नसल्याने दूध उत्पादक शेतकरी संषर्घ समिती व विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारल्यानंतर दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्यासह माजीमंत्री सदाभाऊ खोत, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, महानंदचे अध्यक्ष उदयसिंह देशमुख, शरद जोशी विचारमंचचे विठ्ठल पवार, शेतकरी नेते धनंजय धोरडे यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी आणि दूध संघाचे चालक यांची बैठक झाली.
त्यात आठ दिवसांत दूध वाढीचा तोडगा काढू व दुधाला एफआरपी देण्याबाबत तातडीने विचार करु, असे आश्वासन दिले. मात्र दोन महिने होत आले तरी दूध दरात फारसा बदल झाला नाही. लॉकडऊन उघडले, राज्यात सर्व व्यवहार सुरळीत सुरु होऊन महिना झाला, तरीही दुधाचे दर वाढवले जात नाहीत. उलट पशुखाद्याचे दर वरचेवर वाढत आहेत. त्यामुळे सध्या मिळणारा दराचा विचार करता नफा नव्हे तर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना कष्ट करुनही सात ते आठ कोटी रुपये दररोज फटका सोसावा लागत आहे. पशुखाद्याचे दर (रुपयांत) १७०० (५० किलो) सरकी पेंड १४५० (५० किलो) कांडी २५०० (शेकडा) वैरण ३५०० (टन) ऊस १४०० (गुंठा) मका प्रतिक्रिया दुधाला किमान आधारभूत किंमत (एफआरपी) दर मिळावा. दीड महिन्यानंतरही शासनाने काहीही केले नाही. मुळात हे लोक बैठका घेतात, पण त्यांच्या हातात काहीही नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेले दूध ग्राहकांना तिप्पट दराने विकले जात असेल तर दूध संघाचे मालक एकत्रीतपणे शेतकऱ्यांना लुटत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र सरकारमधील लोक हे निमूटपणे पाहत आहेत. आता प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याने रस्त्यावर लढा उभारला पाहिजे. - डॉ. अजित नवले, नेते, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती.
दुधाला आता मिळणारा दर असाच राहिला तर दूध व्यवसाय मोडीत निघेल. सरकारने केवळ कळवळा न दाखवता शेतकऱ्यांचे हित जोपासत प्रामाणिकपणे दर दिला तरच हा व्यवसाय टिकेल. सध्या मिळणाऱ्या दरातून नफा सोडा उलट पाच रुपये तोटाच सोसावा लागत आहे. जनावरे जगवायची म्हणून हे चालू आहे. पण किती दिवस हा तोटा सोसणार? कोरोना कारण आहे, मात्र शेतकऱ्यांना लुटायचेच हे संघाने ठरविल्याचे दिसतेय.
- संतोष धसाळ, दूध उत्पादक शेतकरी, राहुरी, जि. नगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.