‘मिशन मोड’वर हवंय सूक्ष्म सिंचन धोरण 
मुख्य बातम्या

‘मिशन मोड’वर हवंय सूक्ष्म सिंचन धोरण

मनोज कापडे

केंद्र आणि राज्य शासनाकडून अलीकडच्या काळात सूक्ष्म सिंचनासाठी भरपूर निधी दिला जात आहे. मात्र, अंमलबजावणीत यंत्रणा कमी पडते आहे. त्यामुळे निधी असूनही शेतकरी वर्ग सूक्ष्म सिंचनापासून दूर आहे. ड्रीप उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते या समस्येवर पर्याय म्हणजे सूक्ष्म सिंचनातील धोरणाचा आढावा घ्यावा तातडीने लागणार आहे. आढावा, त्रुटींचा शोध आणि निराकरण व त्यानंतर मिशन मोडवर कामे करणे अशी त्रिसूत्री राज्य शासनाला राबवावी लागेल.  पा ण्याशिवाय शेती नाही आणि शेती समृध्द झाल्याशिवाय शेतकरी वर्गाची दैना किंवा आत्महत्या थांबणार नाहीत हे स्पष्टपणे दिसत असूनही राज्याच्या ठिबक धोरणाकडे राज्यकर्ते आणि प्रशासकीय व्यवस्थेने वेळोवेळी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सूक्ष्म सिंचन असा उल्लेख होताच घोटाळा हा शब्ददेखील आपोआप जोडला जातो. परिणामी गेल्या तीन दशकात सूक्ष्म सिंचनावर हजारो कोटीचे अनुदान खर्च होऊन देखील महाराष्ट्राची कमालीची पीछेहाट झाली. जागतिक हवामानबदलाचा अंदाज घेता राज्याला या पुढे पूर आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याचा वापर जपून करावा लागेल. ते केवळ सूक्ष्म सिंचनातून शक्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक कृतिगट स्थापन करून मिशन मोडवर सूक्ष्म सिंचनाची कामे सुरू करावीत, त्याचा आढावा दर पंधरवड्याला घ्यावा, असेही उद्योगाला वाटते. गेल्या पाच वर्षांत एक लाख हेक्टरच्या आसपास क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आले आहे. मात्र, राज्याचे केवळ खरीप क्षेत्रच १४० लाख हेक्टर आहे. त्यामुळे दरवर्षी किमान तीन लाख हेक्टर क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आलेच पाहिजे, अशी भूमिका घेत मिशन मोडला सुरवात करावी लागेल. पाच वर्षांचा आराखडा तयार केल्यास १५ लाख हेक्टर क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट राज्य शासन जाहीर करू शकते. सध्या केंद्राकडून येणाऱ्या निधीनुसार परिस्थिती पाहून सूक्ष्म सिंचनाचे धोरण वेडेवाकडे राबविले जात आहे. सुक्ष्म सिंचनासाठी कधी नव्हे इतका निधी केंद्र शासनाने गेल्या खरिपात उपलब्ध करून दिला. मात्र, निधीच्या प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत लाभ गेले नाहीत. त्यासाठी मागेल त्याला सूक्ष्म सिंचन अनुदान ही योजना वर्षभर सुरू ठेवण्याची गरज आहे. शेतकऱ्याने ठिबक किंवा तुषार संच बसवताच एका महिन्याच्या आत बॅंकेत अनुदान जमा करणारी यंत्रणा शासनाला राबवावी लागेल. सुक्ष्म सिंचनाची अंमलबजावणी भूगर्भातील पाण्याबाबत जास्त होते आहे. मात्र, कालवा, नद्या किंवा राज्यातील उपसा जलसिंचन योजनामधून उपलब्ध होत असलेल्या पाण्याला हळूहळू सक्तीने सूक्ष्म सिंचनाखाली आणायला हवे. राज्यात एकाच वेळी २०० ते २५० तालुके दुष्काळाला सामोरे जातात. त्यामुळे सूक्ष्म सिंचनाची गरज किती प्रकर्षाने भासते आहे हे स्पष्ट होते. मात्र, सूक्ष्म सिंचनाच्या प्रसार प्रचारासाठी स्वतंत्र मनुष्यबळ देखील राज्यात उपलब्ध नाही. राज्याच्या मृद व जलसंधारण आयुक्तालायचे कंगाल स्वरूप घावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि तांत्रिक यंत्रणा दिल्यास आयुक्तालयाकडून सुक्ष्म सिंचनावर जागृती करता येईल, असे ड्रीप कंपन्यांना वाटते. राज्यातील ऊस शेतीला सूक्ष्म सिंचनाखाली नेण्याचे आव्हान कायम आहे. याबाबत जाहीर केलेल्या धोरणाची अंमलजबजावणी व्यवस्थित झालेली नाही. मुळात धोरण चांगले पण नियोजनाची दिशा चुकलेली आहे. त्यामुळे दहा लाख हेक्टर ऊस शेती अजूनही सूक्ष्म सिंचनाची वाट पाहत आहे. ऊस हे जादा पाणी घेणारे पीक असून या पिकावर बंदी आणा, असा उरफाटा प्रचार त्यामुळे होतो आहे. उलट सूक्ष्म सिंचन आणल्यास कमी पाण्यात जास्त ऊत्पादन, असा मूलमंत्र उसात आणून शेतकरी वर्गाला समृध्द करण्याचा पर्याय सरकारसमोर खुला आहे. ऑनलाइनचे कामकाजाचे केवळ नाव.. सूक्ष्म सिंचनासाठी ऑनलाइन कामकाज केले जात असल्याचे शासन सांगते. मात्र, शेतकऱ्यांना सध्या सूक्ष्म सिंचनासाठी अर्ज करण्यापासून ते अनुदान मिळेपर्यंत मानवी हस्तक्षेप झाल्याशिवाय काम होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे पारदर्शकता आणि जलद कामकाज असे दोन आव्हानात्मक मुद्दे सरकारसमोर आहेत. त्याची सोडवणूक नव्या राजवटीत नवे सरकार करेल, अशी देखील अपेक्षा सूक्ष्म सिंचन व्यवसायातील उद्योजक व कंपन्यांना वाटते. सूक्ष्म सिंचनाला चालना देत असल्याचे सरकारी यंत्रणा असल्याचे सांगते. पण, कंपन्यांची नोंदणी, ऑनलाइन अर्ज आणि अनुदानवाटपात सतत दिरंगाई का होते याचा शोध घ्यावा लागणार आहे.  प्रतिक्रिया... राज्याच्या शेतीला समृद्ध करणारी गुरुकिल्ली ही सूक्ष्म सिंचनातच आहे. शेतकरी, शासन, प्रशासन, कंपन्या यांच्या एकत्रित प्रयत्नातून सूक्ष्म सिंचनाखालील शेती क्षेत्रात भरीव वाढ करता येईल. अर्थात, त्यासाठी सध्याच्या धोरणातील चुका शोधून मिशन मोडवर कामे करावी लागतील. - कृष्णांत महामुलकर, उपाध्यक्ष, इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडिया (वेस्ट झोन)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करा

Labor Migration : रोजगाराअभावी पुसद तालुक्‍यात मजुरांचे स्थलांतर

Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी २८.५३ कोटींचा निधी मंजूर

E-Peek Pahani : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई-पीक पाहणीकडे पाठ

Flood Crop Damage : संकटाच्या काळातही शेतजमिनी घेण्यासाठी चाचपणी

SCROLL FOR NEXT