Turmeric
Turmeric Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric : हळदीची झळाळी वाढणार की मंदावणार?

श्रीकांत कुवळेकर

मागील सप्ताहामधील लेखात आपण कडधान्यांमधील (Pulses) तेजी कितपत टिकाऊ याची चर्चा केली होती. तूर आणि इतर कडधान्यांची बाजारात काय स्थिती आहे याचा आढावा घेऊन त्यांच्या तेजीच्या मार्गातील अडथळ्यांची जाणीव करून दिली होती. केंद्र सरकारने कडधान्यांवर साठे नियंत्रण (Stock Limit) (स्टॉक लिमिट) आणण्याचा कोणताही विचार नसल्याचे लोकसभेत सांगितले होते. परंतु सरकार आपला विचार किती झटक्यात बदलू शकते याचे प्रत्यंतर आपल्याला गहू (wheat) आणि खाद्यतेल (Edible Oil) क्षेत्रामध्ये अनुभवाला आल्याचे लेखात म्हटले होते. त्यातून सूचित केलेला धोका आपल्याला लगेचच अनुभवायला मिळाला आहे.

कालच्या शुक्रवारी केंद्र सरकारने आपला विचार बदलला असून तुरीवर थेट स्टॉक लिमिट आणली नसली तरी त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पावलं उचलली आहेत. त्यानुसार व्यापाऱ्यांना आपल्याकडील साठे सरकारी संकेतस्थळावर घोषित करण्यास सांगितले आहे. तसेच स्थानिक आणि परकीय कडधान्य बाजारावर सरकारची बारीक नजर असून गरज पडल्यास बाजारात हस्तक्षेप करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याचे परिणाम लवकरच दिसून येतील. एकंदरीत पाहता महागाई आटोक्यात येईपर्यंत अत्यावश्यक शेतीमालाच्या बाबतीत सरकारी हस्तक्षेप वाढत जाणार, याचे हे लक्षण आहे.

आज आपण पुढील अल्प आणि मध्यम कालावधीमध्ये हळद बाजारामधील परिस्थिती कशी राहील, याचा वेध घेण्याचा प्रयत्न करूया. एनसीडीईएक्सच्या वायदेमंचावर जुलैच्या सुरवातीला ८,२०० रुपये प्रति क्विंटलने विकली जाणारी हळद आता ६,८०० रुपयांवर आलेली आपण पाहिली. मागील आठवड्यामध्ये हळदीचे वायदे ८ टक्के नरम झाले तर मागील महिन्यातील मंदी १५ टक्के एवढी होती. पुढील काळात हळदीचा पुरवठा कमी होत जाणार आहे. त्यामुळे किंमतीमधील अशा प्रकारच्या पडझडीमुळे स्टॉकिस्ट हवालदिल होणे साहजिकच आहे. तशी या मंदीला अनेक कारणे आहेत. एक म्हणजे पावसाळ्यामध्ये पेरण्या पूर्ण झाल्यावर किंमती हळूहळू खाली येणे नित्याचे आहे. दुसरे म्हणजे वायद्यामधील हळद हजर बाजारापेक्षा प्रतिक्विंटल १६००-१८०० रुपये अधिक्याने (प्रिमियम) विकली जात होती. मंदीच्या या कालावधीमध्ये किंमतीमधील हा फरक जवळपास ९० टक्क्यांहून कमी झाला आहे. त्यामानाने हजर बाजारात किंमती बऱ्यापैकी स्थिर आहेत.

बाजारातील भाषेमध्ये बोलायचे तर हजर आणि वायदे बाजारातील फरक एवढा कमी झाल्यामुळे मंदीचा तळ जवळजवळ गाठला असेही म्हटले जाते. परंतु बाजार नेहमी विश्लेषणात्मक पातळीपेक्षा अधिक चढताना किंवा पडताना अनुभवायला मिळते. या नियमाने किंमतीने तळ गाठला असे म्हणणे योग्य होणार नाही. खरिपात पेरलेल्या पिकाच्या वाढीच्या अनुषंगाने बाजारात चढ-उतार होत राहतील. पेरणीची आणि उत्पादनाची आकडेवारी सहज उपलब्ध होत नसली तरी देशामध्ये १० लाख टन एवढे सरासरी हळदीचे पीक अलीकडील काही वर्षात दिसून आले आहे. प्रामुख्याने तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्रामध्ये हळदीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पण इतर राज्यांतही हळदीचे उत्पादन वाढताना दिसत आहे. मागील काही वर्षांत निर्यातीत सातत्याने झालेली वाढ हे याचे कारण असू शकेल.

हळद निर्यात चित्र

मसाला बोर्डाच्या (स्पाइसेस बोर्ड) आकडेवारीनुसार २०१७-१८ या वर्षात सुमारे एक लाख टन हळद निर्यात झाली होती. २०२०-२१ मध्ये निर्यात १ लाख ८४ हजार टनापर्यंत गेली. अर्थात कोविड काळात औषधी गुणांमुळे हळदीला मागणी वाढल्याने २०२०-२१ मधील निर्यातवाढ थोडी जास्तच दिसून आली. मात्र मागील वर्षात हळदीची निर्यात घटून ती १ लाख ५३ हजार टनांपर्यंत गेल्यामुळे देशांतर्गत साठ्यामध्ये वाढ झाली. त्यामुळेदेखील सध्याच्या मंदीला मदत झाली असावी. यात बांगलादेशमधून घटलेली मागणी हा घटक महत्त्वाचा ठरला आहे. भारतातून बांगलादेशला २०१७-१८ मध्ये ४२७५ टन हळद निर्यात झाली होती. २०२०-२१ मध्ये ती थेट ५१ हजार ३०० टनांवर गेली होती. ती मागील वर्षात निम्म्यावर येऊन २५ हजार २५० टन झाली. म्हणजे आकडेवारी असे दर्शवते की निर्यातीमधील घट ही बहुतेक बांगलादेशामधूनच होती. हा देश सध्या श्रीलंकेप्रमाणे आर्थिक अरिष्टाच्या वाटेवर असल्यामुळे भारतातून तेथे होणाऱ्या सर्वच कृषीमाल निर्यातीच्या दृष्टीने ती धोक्याची घंटा म्हणावी लागेल. या परिस्थितीमध्ये हळद निर्यात या वर्षात देखील घटू शकेल. आणि याचा परिणाम म्हणून मंदी अजूनही वाढू शकेल.

देशांतर्गत बाजारपेठ

यावर्षी सर्वच प्रमुख हळद उत्पादक राज्यांमध्ये अतिपावसामुळे नुकसान होताना दिसतंय. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील काही भाग येथे पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तामिळनाडूसह दक्षिणेतील इतर राज्यांमध्येदेखील अति पाऊस होऊन पिकाचे नुकसान वाढताना दिसत आहे. यातून उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन उत्पादन १०-२० टक्के घटेल असे म्हटले जात आहे. परंतु याबद्दलचे चित्र स्पष्ट होण्यास अजून चार-सहा आठवडे जावे लागतील. तसेच ऑगस्टप्रमाणे सप्टेंबरमध्येदेखील अधिक पाऊस होण्याचा अंदाज असल्यामुळे त्याचा एकूण हंगामावर काय परिणाम होतोय, हे पाहणे इष्ट ठरेल. मागणीचा विचार करता मागील तीन महिन्यांमध्ये सुस्त असलेली मागणी पुढील सणासुदीच्या काळात बरी राहते असा अनुभव आहे.

हळद हे सुमारे आठ महिन्यांचे पीक असल्यामुळे जुलैमध्ये लागवड झालेले पीक मार्च-एप्रिलमध्ये काढणीला येईल. तर सिंचन व्यवस्था असलेल्या भागात मेमध्ये लागवड झालेले पीक जानेवारी-फेब्रुवारीमध्येच काढणीला येईल. या पार्श्वभूमीवर अजून पाच महिने नवीन पुरवठा येणार नाही, हे निश्चित. या काळात कमी होत जाणारे साठे आणि वाढीव मागणी याचा परिणाम म्हणून किंमतीमध्ये निदान १०-२० टक्के उठाव येणे अशक्य नाही, असे कमोडिटी विश्लेषक आणि व्यापार विश्वातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या काळात हळदीच्या घाऊक किंमती प्रति क्विंटल ६,५०० ते ७,८०० रूपयांच्या कक्षेत राहतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT