Extension of Tur imports
Extension of Tur imports 
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Import : भारताने आफ्रिकेतून तूर आयात का वाढवली?

टीम ॲग्रोवन

पुणेः भारत सरकार देशात तुरीचे दर (Tur Rate) कमी असो वा जास्त आयात (Tur Import) करत असते. भारताला मुख्य पुरवठार (Tur Exporter) हा म्यानमार देश होता. मात्र मागील पाच वर्षांमध्ये म्यानमारमधील तूर उत्पादन (Tur Production) आणि निर्यात कमी होत गेली. तर आफ्रिकेतील टंझानिया, मोझांबिक आणि मालावी देशातील उत्पादन आणि भारताला निर्यात (Tur export To India) वाढली आहे.

भारत आजही कडधान्यासाठी आयातीवर काही प्रमाणात अवलंबून आहे. त्यात तुरीच्या आयातीचं प्रमाण जास्त आहे. भारताला आजही तूर उत्पादनात आत्मनिर्भर होता आलं नाही. त्यासाठी सरकारचं धोरणही तितकचं जबाबदार आहे. देशात दरवर्षी जवळपास ४४ ते ४५ लाख टन तुरीचा वापर होत असतो. तर २०२१-२२ च्या हंगामात देशात ४३ लाख ४० हजार टन तूर उत्पादन झालं. मात्र तरीही सरकारनं विक्रमी तूर आयात केली.

विशेष म्हणजे केंद्रानं या वर्षात तुरीला ६ हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला होता. मात्र शेतकऱ्यांकडे तूर आहे तोपर्यंत बाजार हमीभाव गाठणार नाही, याची काळजी सरकारनं घेतली. विक्रमी ८ लाख ६० हजार टन तूर आयात केली. हा अनुभव फक्त याच वर्षात आला नाही तर यापुर्वीही असचं झालं. देशात उत्पादन वाढल्यानंतर सरकार खरेदी करत नाही. बाजारात दर पडतात. त्यामुळं शेतकरी लागवड कमी करतात. हे चक्र मागील अनेक वर्षापासून सुरुच आहे. परिणामी तूर उत्पादनही कमी जास्त होत राहतं.

देशात साधारपणे चार ते साडेचार लाख टन तूर आयात होते. मात्र चालू हंगामात विक्रमी आयात झाली. यात आफ्रिकेतील टंझानिया, मोझांबिक आणि मालावी देशातून आयात मालाचा वाटा सर्वाधिक होता. २०१७ पर्यंत म्यानमार या देशातून तूर आयात जास्त होत होती. मात्र २०१८ नंतर आफ्रिकेतील या देशांचा भारताच्या आयातीतला वाटा वाढला. त्यातही मोझांबिकमधील तूर उत्पादन आणि निर्यात वाढत आहे.

केंद्र सरकारने मोझांबिककडून दोन लाख टन तर मालाकडून ५० हजार टन तूर आयातीचे करार केले आहेत. या देशांमध्ये सप्टेंबरपासून तुरीचं उत्पादन हाती येतं. नेमकं याच काळात भारतात सणसमारंभामुळं मागणी वाढलेली असते. तर म्यानमारची तूर भारतातील नवी तूर बाजारात येण्याच्या काळातच थोडी उशीरा येते. त्यामुळं आफ्रिकेतून आयातीला पसंती दिली जाते.

आफ्रिकेतील या देशांमध्ये जवळपास ६ ते ७ लाख टन तूर उत्पादन होतं. तर म्यानमारमध्ये दीड ते अडीच लाख टन उत्पादन होतं. मात्र या देशांमध्ये तूर खाल्ली जात नाही. भारताला निर्यात करण्यासाठीच येथे कराराप्रमाणं उत्पादन घेतलं जातं. मात्र याचा थेट फटका देशातील शेतकऱ्यांना बसतो. मात्र यंदा तुरीची लागवडच कमी झाली. त्यातच पिकाला पाऊस आणि इतर कारणांनी फटका बसतोय. त्यामुळं तुरीचे दर वाढलेले आहेत. सध्या तुरीला ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. पुढील काळात तुरीचे दर आणखी वाढ होऊ शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

भारत सरकारने करार केल्यानंतरच आफ्रिकेत तुरीची लागवड वाढली. आफ्रिकन तुरीचे दर हे म्यानमारच्या तुलनेत किमान १० टक्क्यांनी कमी असतात. मक्याला चांगला दर मिळत असल्यानं म्यानमारमध्ये यंदा तुरीऐवजी मक्याला पसंती मिळत आहे. त्यामुळं यंदाही आफ्रिकेतूनच तूर आयात वाढण्याची शक्यता आहे.
राहूल चौहान, कार्यकारी संचालक, आयग्रेन इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT