
स्वयंपाक घरात असलेल्या डाळीबद्दल बोलायचं झालंच तर सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती तूर डाळ (Tur Dal). महाराष्ट्रात तर ही डाळ प्रत्येकाच्या घरी बनवली जातेच. फक्त चवीला छान आहे म्हणून नाही तर ही डाळ आरोग्यासाठीही खूपच उपयुक्त आहे. तूर डाळीत कॅल्शियम आणि मोठ्या प्रमाणावर प्रथिनं (Calcium And Protein In Tur) आढळतात.
तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण दुधाच्या सहापट कॅल्शियम या तूर डाळीच्या टरफलात असतं. आणि हा शोध लावलाय हैदराबाद येथील इक्रिसॅट (ICRISAT) मधील कृषी शास्त्रज्ञांनी. उदाहरण म्हणून बघायचं झालंच तर १०० मिली दुधात साधारण १२० मिलिग्रॅम एवढं कॅल्शियम असतं. तर १०० ग्रॅम टरफल असलेल्या तूर डाळीत ६५२ मिलीग्रॅम कॅल्शियम असतं.
पण या डाळीवर प्रक्रिया करताना त्याच्या वरची टरफलं काढली जातात. जेव्हा डाळीवर प्रक्रिया केली जाते तेव्हा ती डाळ दोन भागात विभागली जाते, त्याच्यावरची टरफलं काढली जातात. या टरफलांचा वापर एक तर पशुखाद्यासाठी केला जातो नाही तर ती कचऱ्यात जातात. सस्टेनेबिलिटी नावाच्या जर्नलमध्ये यासंबंधीचा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे.
लहान मुलांच्या आहारात या टरफल असलेल्या डाळीचा समावेश केला तर त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रथिनं उपलब्ध होतात. लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या ऑस्टिओपोरोसिस आणि मुडदूस या रोगांवर हा प्रभावी उपाय ठरू शकतो असं कृषी शास्त्रज्ञांना वाटतं. लहान मुलांच्या खाद्यपदार्थ आणि औषधांमध्ये याचा वापर करता येऊ शकतो. ICRISAT मधील शास्त्रज्ञ आता तुरीच्या टरफलांमधील पोषक गुणांवर पुढील संशोधन करीत आहेत. मानवी शरीराला दररोज ८०० ते १००० मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. पण भारतीय आहारामधून ही गरज पूर्ण होत नसल्याचं ही या जर्नलमध्ये म्हटलंय.
भारतात शाकाहारी लोकांचं प्रमाण खूप मोठं आहे. बदलती जीवनशैली आणि खानपानाच्या सवयीत झालेले बदल यामुळे नियमित आहारातून कॅल्शिअम आणि प्रथिनांची गरज भागत नाही. त्यामुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर इक्रिसॅटच्या या संशोधनाला विशेष महत्व आहे. तुरीच्या टरफलांचे पोषणमूल्य अधिक असल्याने ते शरीराला उपलब्ध करून देण्यासाठी काय-काय करता येईल, यावर शास्त्रज्ञ संशोधन करतील, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
या डाळीचं उत्पादन कोणत्या भागात होतं?
तूर हे उष्ण प्रदेशातील पीक असून दक्षिण आशिया, मध्य अमेरिका, आफ्रिका आणि उष्ण कटिबंधातील बहुतेक सर्व देशांत तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. भारतात जगात तुरीचे सर्वाधिक उत्पादन आणि सेवन होते. भारतात ते हरभऱ्याच्या खालोखाल महत्त्वाचे कडधान्याचे पीक असून ते मुख्यतः उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र व तमिळनाडू या राज्यांत सर्वसाधारणपणे मिश्रपीक म्हणून घेतले जाते.
भारतात दरवर्षी सुमारे १७ लाख हेक्टरवर तुरीचं पीक घेतलं जातं. जगातील एकूण तुरीपैकी ८२ टक्के लागवड भारतात होते, तर एकूण उत्पादनात भारताचा वाटा ७७ टक्के आहे. भारतातील तूर उत्पादन सुमारे ३७.५० लाख टनाच्या आसपास आहे. जागतिक स्तरावर भारत हा तुरीचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. त्यापाठोपाठ म्यानमार (६.७६ लाख टन) आणि मलावी (४.३० लाख टन) यांचा क्रमांक लागतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.