फ्यूचर्स किमती ः सप्ताह १२ ते १८ एप्रिल २००५
गेल्या महिन्यात मका, हरभरा, तूर, कांदा व टोमॅटो यांच्या किमती घसरत होत्या. सोयाबीनच्या गेल्या वर्षभर घसरत होत्या; १४ मार्चपासून त्यात काहीशी वाढ होताना दिसत आहे. कापसाच्या किमतीसुद्धा वाढीचा कल दाखवत आहेत. गेल्या सप्ताहात कापसाच्या अमेरिकेतील किमती स्थिर राहिल्या; सोयाबीनच्या ०.८ टक्क्याने घसरल्या.
या वर्षी (२०२४-२५) भात पिकाचे भारतातील उत्पादन उच्चांकी असेल, असा अंदाज आहे. गेली नऊ वर्षे ते सतत वाढत आहे. जागतिक भात उत्पादनात चीनच्या खालोखाल भारताचा क्रमांक असतो. या वर्षी प्रथमच भारताने चीनला मागे टाकून पहिला क्रमांक पटकाविला आहे. भारतातील गव्हाच्या उत्पादनातसुद्धा गेल्या दोन वर्षांपेक्षा या वर्षी वाढ अपेक्षित आहे.
या सप्ताहात हरभरा, सोयाबीन, कांदा व टोमॅटो यांचे भाव घसरले. इतर शेतीमालाचे भाव वाढले. कांद्याचे भाव रु. १२०० वर आले आहेत, तर टोमॅटो रु. ६०० पर्यंत घसरला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाची तीव्रता वाढली आहे. त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने चीन वगळता इतर देशांवर लादलेल्या वाढीव आयात शुल्काला स्थगिती दिली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या देशांबरोबरील व्यापार वाटाघाटींचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वाटाघाटींचा शेतीमाल बाजारावर परिणाम होणार आहे. विशेषतः कापूस, दूध, पोल्ट्री, इथेनॉल यासंदर्भात काय निर्णय होतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
१८ एप्रिल २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव या सप्ताहात पुन्हा ०.५ टक्क्याने वाढून रु. ५४,२८० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव १ टक्क्याने वाढून रु. ५५,०३० वर आले आहेत. जुलै भाव रु. ५६,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.२ टक्क्यांनी अधिक आहेत.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) गेल्या सप्ताहात ०.३ टक्क्याने वाढून रु. १,४६१ वर आले होते. या सप्ताहात ते ०.५ टक्क्याने वाढून रु. १,४६८ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२६ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात ०.७ टक्क्याने वाढून रु. २,२४० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने वाढून रु. २,२५० वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. २,४१८ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स रु. २,४४५ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव ८.७ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्याने घसरून १४,५०२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.६ टक्क्याने वाढून १४,७४० वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. १४,७४० वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १४,७५८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या फक्त ०.१ टक्क्याने अधिक आहेत. सांगलीमधील (राजापुरी) स्पॉट भाव रु. १६,००० आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात ५.३ टक्क्यांनी वाढून रु. ६,२०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.४ टक्क्यांनी घसरून रु. ५,९२५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० जाहीर झाला आहे. आवक वाढती आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७,८५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ जाहीर आहे; मुगाचा हंगाम आता संपला आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ४ टक्क्यांनी वाढून रु. ४,६२१ वर आली होती. या सप्ताहात ती ०.५ टक्क्याने घसरून रु. ४,५९६ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे.
तूर
गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ७,०६० वर आली होती. या सप्ताहात ती रु. ७,३०८ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक कमी होऊ लागली आहे.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत या सप्ताहात रु. १,१९६ वर आली आहे. कांद्याची आवक टिकून आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ६८८ वर आली होती; या सप्ताहात ती रु. ६०२ वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.