Washim News : गेल्या दहा महिन्यांपासून सोयाबीनचे भाव स्थिरावले आहेत. हमीभावापेक्षाही सातशे ते आठशे रुपयांनी सोयाबीनचे भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तर येत्या एक ते दीड महिन्यात नवीन सोयाबीन बाजारात दाखल होणार असतानाही दरांमध्ये काहीही बदल दिसून येत नसल्याने चिंतासुद्धा वाढलेली आहे.
शासनाकडून २०२४-२५ या खरीप हंगामासाठी ४८९२ रुपये सोयाबीनचा हमीभाव जाहीर केला आहे. येथील बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. सात) चार ते ४२५५ दरम्यान सोयाबीन विक्री झाले. सोयाबीनची आवक दोन हजार क्विंटलपर्यंत झाली होती. हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.किमान हमीभाव तरी मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त केल्या जात आहे.
मागील हंगामात सोयाबीन हाती आल्यानंतर थोडे दिवस पाच हजारांच्या दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला होता. त्यानंतर आता जवळपास दहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी भावामध्ये अपेक्षित वाढ झाली नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. मागील दोन-तीन दशकांपासून सोयाबीन शेतकऱ्यांचे मुख्य पीक झाले असून सोयाबीनवरच शेतकऱ्याचे अर्थकारण अवलंबून आहे.
आज ना उद्या भाव वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनवर तारण कर्ज घेतले आहे. तारण कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे तर पार कंबरडे मोडले आहे. तब्बल दहा महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अजूनही सोयाबीनचे भाव ४००० ते ४३०० दरम्यानच असल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. नवीन सोयाबीन एक ते दीड महिन्यात घरात येणार असल्यामुळे आता मात्र शेतकरी सोयाबीन भाव वाढीची आशा सोडून विक्री करीत आहे.
दर आणि वजन कमी झाल्याचा फटका
भाव कमी तसेच सोयाबीनचे वजनही घटल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी मार बसला आहे. भाववाढ होत नसल्यामुळे नाइलाजाने मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करीत आहेत. परिणामी बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढल्याचेही चित्र आहे. सोयाबीनचा हमीभाव ४८९२ असला तरी हमीभावापेक्षा तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी सोयाबीन कमी दराने विकल्या जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.