Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीनच्या किमती हमीभावापेक्षा किंचित जास्त

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह- ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२३

Maharashtra Agriculture News : १ जून ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत देशातील मॉन्सून पाऊस सरासरीपेक्षा ६ टक्क्यांनी कमी झाला आहे. थोडक्यात, या वर्षी खरीप हंगामातील पाऊस सरासरीच्या ९४ टक्के झाला. एकूण देशासाठी ही टक्केवारी तशी फार कमी दिसत नाही.

मात्र देशातील जिल्हावार परिस्थिती बघितली तर या वर्षी खरीप पावसाचे पर्जन्यमान फार विषम होते, हे लक्षात येईल. देशातील एकूण ७१८ जिल्ह्यांपैकी ४७ टक्के जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा १० टक्के किंवा त्याहून कमी पाऊस पडला व ३१ टक्के जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्के किंवा त्याहून कमी पाऊस पडला.

झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, बिहार, आसाम, बंगाल व मराठवाडा या विभागांत ५० टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांत २० टक्के किंवा त्याहून कमी पाऊस पडला. खरिपाच्या चार महिन्यांतसुद्धा विषम पावसाचे प्रमाण या वर्षी अधिक होते.

या सर्वांचा परिणाम कडधान्य, तेलबिया व कापूस यांचे क्षेत्र कमी होण्यावर झाला आहे. उत्पादनावर किती परिणाम झाला आहे ते पुढील काही दिवसांत कळेल. खरीप व लेट खरीप कांदा उत्पादन किती राहते, यावर कांद्याच्या भावाचे गणित अवलंबून आहे.

मॉन्सूनने देशातून माघार घेतली असून ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे काही दिवसांत खरीप पिकांची वाढती आवक सुरू होईल. कापूस, मूग व सोयाबीन यांच्या आवकेत गेल्या सप्ताहात वाढीचा कल दिसून आला.

या सप्ताहात कांदा वगळता सर्व वस्तूंच्या किमती घसरल्या. सोयाबीनच्या किमती हमीभावाजवळ आल्या आहेत. ६ ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव या सप्ताहात २ टक्क्यांनी घसरून रु. ५९,७६० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव १.५ टक्क्याने घसरून रु. ५९,८४० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. ६०,९४० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा १.९ टक्क्याने अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५१६ वर आले होते. या सप्ताहात ते २.१ टक्क्यांनी घसरून रु. १,४८४ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५५२ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.५ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात रु. २,१२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,०७५ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (नोव्हेंबर डिलिव्हरी) किमती रु. २,०९४ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. २,१०६ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.१ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १३,३२७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. १४,०५९ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती ५.८ टक्क्यांनी वाढून रु. १५,५८४ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. १७,१३२ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या २१.९ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात १.२ टक्क्याने घसरून रु. ६,१५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.१ टक्क्यांनी घसरून रु. ५,९०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. जून ते ऑगस्ट या काळात हरभऱ्याचे भाव सातत्याने वाढत होते; मात्र १ सप्टेंबरपासून ते घसरत आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) गेल्या सप्ताहात २.२ टक्क्यांनी घसरून रु. ८,८०० वर आली होती. या सप्ताहात सुद्धा ती १.१ टक्क्याने घसरून रु. ८,७०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ४,८९९ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ५.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,६४६ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.४ टक्क्याने घसरून रु. १०,२५९ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ५.९ टक्क्यांनी घसरून रु. ९,६५९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT