Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीन मागे शुक्लकाष्ठ; पण मका चमकणार

Soybean Rate : सध्या भारतातच नव्हे तर अमेरिकन बाजारात देखील सोयाबीनचा पुरवठा शिखरावर असल्यामुळे किमतीत येणाऱ्या प्रत्येक छोट्या तेजीला मोठ्या पुरवठ्याचा लगाम बसताना दिसत आहे.

श्रीकांत कुवळेकर

Soybean Market Update : या स्तंभातील मागील लेखात आपण कापूस, तेलबिया, पशुखाद्य आणि खाद्यतेल या कमोडिटीजमध्ये किंमत आणि पुरवठा जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्ध साधनांची माहिती दिली होती. अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या वायदे बाजारात प्रत्यक्ष व्यवहार करीत आहेत तर अनेक एफपीओंना असे व्यवहार करण्याची उत्सुकता आहे.

त्यासाठी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या (स्मार्ट) माध्यमातून संपूर्ण प्रशिक्षण दिले जात आहे. जे एफपीओ स्मार्ट प्रकल्पांतर्गत येत नाहीत त्यांच्यासाठी देखील असे प्रशिक्षण अनेक माध्यमातून उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी आणि एफपीओंनी फायदा घेण्याची गरज आहे.

सोयाबीनबाबत अनिश्‍चितता

सध्या भारतातच नव्हे तर अमेरिकन बाजारात देखील सोयाबीनचा पुरवठा शिखरावर असल्यामुळे किमतीत येणाऱ्या प्रत्येक छोट्या तेजीला मोठ्या पुरवठ्याचा लगाम बसताना दिसत आहे. पुढील काळात ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांमध्ये ला-निना या हवामानविषयक घटनेमुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आजपर्यंत व्यक्त केली जात होती. त्यामुळे पुढील तीन-चार महिन्यांत सोयाबीनच्या किमतीसाठी तो मोठा तेजीदर्शक घटक ठरण्याची आशा व्यक्त केली जात होती. मात्र सोयाबीनसाठी सध्या कुठलीच मात्रा चालताना दिसत नाही.

कारण ऑस्ट्रेलियामधील हवामान खात्याच्या चार मॉडेल्सनुसार ला-निना सक्रिया होण्याची शक्यता पूर्वीपेक्षा खूपच कमी झाली असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. तसेच तो सक्रिय झालाच तर त्याचा कालावधी आणि त्याची परिणामकारकता खूपच अल्पजीवी राहील असेही म्हटले आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये हवामान सर्वसाधारण राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तसे झाल्यास ब्राझीलमधील सोयाबीन पीक चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीबॉट या अमेरिकन वायदे बाजारात मागील आठवड्यात सोयाबीन परत एकदा १० डॉलरच्या वर बंद होण्यात यशस्वी ठरले असले तरी पुढील काळात परत मंदी येण्याची शक्यता वाढली आहे.

इथेनॉल धोरण

जागतिक बाजारातील वरील घटकांपेक्षा सध्या अधिक चिंतेची बाब म्हणजे देशांतर्गत इथेनॉल धोरण. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २०२६ अखेर २० टक्क्यांपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी मक्याचा वाढता वापर सोयाबीनची डोकेदुखी वाढवत आहे. या आठवड्यात साखर आणि इथेनॉल किमती वाढविण्याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या मक्यापासून निर्मित इथेनॉल प्रति लिटर ७२ रुपयांना, तर उसापासून बनवलेले इथेनॉल ६०-६५ रुपयांना खरेदी केले जात आहे.

साखर उद्योगाच्या मागण्या विचारात घेता उसापासून बनवलेले इथेनॉल महाग केले जाऊ शकेल. तसेच जर साखरेची किमान विक्री किंमत वाढली आणि साखर निर्यातीला परवानगी दिली, तर साखर उद्योग इथेनॉलऐवजी साखर उत्पादनावर अधिक भर देईल. या परिस्थितीत इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढेल.

त्याचा सोयाबीनला फटका बसेल. दुष्काळात तेरावा महिना त्याप्रमाणे राईसब्रान ऑइलकेक (भाताच्या तुसापासून तयार केलेले पशुखाद्य) निर्यातीवर सरकारने एक-दीड वर्षापासून टाकलेली बंदीदेखील सोयापेंडीच्या किमती पाडण्यास काही प्रमाणात मदत करीत आहे. राइसब्रानचे उत्पादन आता खूप वाढत आहे. त्यामुळे केंद्राला त्याच्या ऑइलकेकच्या निर्यातीवरील बंदी त्वरित उठवण्याची गरज आहे.

खाद्य तेल उद्योग संघटनांनी ती मागणी वारंवार लावून धरली आहे. अर्थात, ही निर्यातबंदी उठवल्यास सोयाबीनमध्ये खूप सुधारणा होईल असे नसले तरी खराब बाजार- सेंटिमेंट थोडे सुधारेल इतकेच. एकंदर कृषिमाल बाजारपेठेत नजीकच्या काळात सोयाबीन, मका, इथेनॉल, ऊस, साखर यांच्या आपसांतील समीकरणे वेगाने बदलत राहतील.

त्यावर बारीक लक्ष ठेवून वाट पाहणे एवढेच सध्या सोयाबीन उत्पादकांच्या हाती आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हमीभाव खरेदीत सोयाबीन देऊन टाकणे योग्य राहील. ज्यांची थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे त्यांनी आधी सरकारी खरेदीत सोयाबीन विकून टाकावे आणि नंतर खुल्या बाजारात ४१००-४२०० रुपये भावात खरेदी करून सहा महिने साठवणूक करून नशीब आजमावण्याची ‘ट्रेडिंग स्ट्रॅटेजी’ वापरावी.

मका लकाकणारच

मागील हंगामात मक्याने विक्रमी ३०-३१ रुपये प्रति किलो भाव खाल्ल्याने मका उत्पादक आणि साठवणूकदार व्यापाऱ्यांची दिवाळी झाली होती. त्यामुळे साहजिकच खरीप हंगामात मका लागवड वाढली. खरीप उत्पादन वाढीबाबत शंका-कुशंका व्यक्त केल्या गेल्या होत्या. परंतु अलीकडील काळात मक्यात हंगामी घसरण आलीच आहे.

क्वचित मका हमीभावाखाली गेल्याचे वाचनात येत असले तरी बारा पैकी आठ उत्पादक राज्यांत मका हमीभावापेक्षा १० टक्के तरी अधिक आहे. तसेच सुरुवातीची आवक जास्त आर्द्रतेच्या मक्याची असल्यामुळे किमती त्या प्रमाणात कमी असणे साहजिकच आहे. मात्र आयातीला परवानगी दिली असल्यामुळे येणाऱ्या काळात मका परत एकदा चमकेल का अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत. आता मका उत्पादन १० टक्के वाढल्याचे अधिकृत अनुमान केंद्र सरकारने प्रसारित केले आहे.

खरीप मक्याचे उत्पादन जरी १० टक्के वाढले असले, तरी काही काळाने मक्याच्या किमती वाढण्यास चांगला वाव आहे. कारण तेल-कंपन्यांना पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी नुकत्याच सुरू झालेल्या या वर्षात १००० कोटी लिटर्सपेक्षा अधिक इथेनॉलची गरज भासणार आहे. यापैकी ८३७ कोटी लिटर्स च्या ऑर्डर्स दिल्या गेल्या आहेत. यामध्ये मक्याच्या वाट्याला सर्वाधिक म्हणजे सुमारे ५२ टक्के ऑर्डर्स आलेल्या आहेत.

तांदूळ आणि ऊस यांचा वापर विचारात घेऊनसुद्धा वर्षभरातील इथेनॉल उद्दिष्टाचा विचार केल्यास या वर्षात सुमारे ८०-८५ लाख टन मक्याची गरज लागू शकेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. आयात मका अंदाजे पाच लाख टन राहिला तरी मक्याची एकूण मागणी लक्षात घेता मका खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात २६-२७ रुपये होण्यास अनुकूल परिस्थिती आहे.

कडधान्य मंदीची शक्यता मावळली

खरीप पेरण्यांची आकडेवारी आणि कडधान्य आयातीचे मोठे आकडे पाहिल्यावर कडधान्य बाजारात बऱ्यापैकी मंदी येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र खरीप हंगामातील पीक उत्पादनाचे पहिले अनुमान प्रसारित झाल्यावर ती शक्यता धूसर झाली आहे. कारण तुरीचे उत्पादन ३५ लाख टन म्हणजे मागील वर्षापेक्षा केवळ १ लाख टन अधिक राहील असे दिसत आहे.

मागील तीन वर्षातील सरासरी तूर उत्पादन ३३ लाख टन असून त्यापूर्वीच्या तीन वर्षात ते सरासरी ४१ लाख टन राहिले होते. त्यामुळे तूर परत एकदा दहा हजारी झाली आहे. उडदाचे उत्पादन तर २५ टक्के कमी म्हणजे १२ लाख टन राहणार आहे. मूग उत्पादनात वाढ, पिवळ्या वाटाण्याची मोठी आयात याबरोबरच अर्जेंटिना-ब्राझीलमधून किती कडधान्य आयात होणार यांचा बाजारकलावर प्रभाव राहणार असला तरी पुढील चार-सहा महिने तरी कडधान्यात मोठी मंदी येण्याची शक्यता मावळली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT