Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीन उत्पादकांनी सावध राहणे गरजेचे

श्रीकांत कुवळेकर

Soybean Market Update : मागील आठवड्यात या स्तंभातून नवीन सोयाबीन हंगामाबद्दल चर्चा करण्यात आली होती. त्यामध्ये काढणीपूर्व परिस्थिती, जागतिक बाजारातील गणिते आणि त्याचा येथील हंगामावर होणारा प्राथमिक परिणाम याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. एकंदर परिस्थितीत आजही काही बदल झालेला नाही. तरीही परत एकदा सोयाबीनवरच लेख लिहावा लागत आहे. त्याला दोन कारणे आहेत.

एक म्हणजे अलीकडेच व्हॉट्सॲपवर एक पोस्ट वाचनात आली. त्यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन न विकता राखून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्याची कारणमीमांसा करताना असे म्हटले आहे, की सोयाबीन पिकविणाऱ्या सर्व देशांमध्ये उत्पादनात घट येणार असून, त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात पुढील काळात जोरदार तेजी असेल, असे म्हटले आहे.

दुसरी घटना म्हणजे नुकतीच मुंबईत पार पडलेली ग्लोबऑइल ही आंतरराष्ट्रीय तेलबिया परिषद. यामध्ये विविध राज्यांतील आणि देशांतील तज्ज्ञांनी तेलबिया उद्योगाचा लेखाजोखा मांडला आणि त्यातून भारतातील बाजाराचा अंदाज बांधला. या गोष्टींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

पहिल्यांदा व्हॉट्सॲप पोस्टबद्दल. खरं तर ही पोस्ट सामान्यपणे दुर्लक्ष करण्यासारखी असली, तरी त्याची दखल घेणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांना आलेले वाईट अनुभव. दोन वर्षांपूर्वी सोयाबीन आणि कापसात विक्रमी तेजी आल्यामुळे शेतकऱ्यांना सल्ले देणाऱ्यांचे पेव फुटले आहे.

ज्यांना कमोडिटी मार्केटमधले ओ की ठो कळत नाही, असे स्वयंघोषित तज्ज्ञ शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस १० हजार रुपयांच्या वर गेला तरी न विकता साठवून ठेवण्याचे सल्ले देत होते. या स्वयंघोषित तज्ज्ञांच्या व्हिडियो क्लिप्स आणि व्हॉट्सॲप पोस्ट्‍सनी धुमाकूळ घातला होता.

यथोचित कारणमीमांसा न करता हवेत इमले बांधण्याचे ते उद्योग होते. त्याच वेळी ‘ॲग्रोवन’मधील या स्तंभातून मात्र त्या त्या वेळी उपलब्ध माहिती, घटना-घडामोडी यांचे विश्‍लेषण करून सोयाबीन आणि कापूस यांची टप्प्याटप्प्याने का होईना विक्री करणे कसे महत्त्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले जात होते.

दुर्दैवाने सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ व पोस्ट्‍सना बळी पडून अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन, कापसाचे मोठ्या प्रमाणात साठे करून ठेवले गेले. त्यानंतर दोन्ही कमोडिटीजच्या किमतीमध्ये झालेली घसरण आणि साठे करण्यासाठी वाढत जाणारा खर्च यामुळे अनेकांना ऐन मंदीत कापूस व सोयाबीन विकावे लागले. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर लगेच कापूस एक हजार रुपयांनी वधारला.

हा अनुभव ताजा असल्यामुळे नुकत्याच वाचनात आलेल्या व्हॉट्सॲप पोस्टची दखल घ्यावी लागली. काही शेतकऱ्यांकडे अजूनही दोन हंगामांतील सोयाबीन किंवा कापसाचे साठे आहेत. त्यांनी यातून काही बोध घ्यावा हा हेतू आहे. या स्तंभातून तेजी-मंदी याबद्दल सल्ला देण्याचा उद्देश नसला, तरी पुढे दिलेल्या ग्लोबऑइल परिषदेतील चर्चेच्या माहितीवरून या पोस्टचे महत्त्व कितपत आहे, याचा अंदाज येईलच.

ग्लोबऑइल-२०२३

या परिषदेत जागतिक कृषिमाल बाजारपेठेमध्ये कोणत्या घडामोडी सुरू आहेत आणि पुढील वर्षभर त्याचे काय परिणाम होतील याविषयी अनेक चर्चासत्रे होती. एल-निनो व हवामानातील इतर बदलांमुळे उत्तर गोलार्ध, दक्षिण आशियायी देश आणि पूर्व व अतिपूर्वेकडील देशांमधील तेलबिया व खाद्यतेल उत्पादनावर होणारा परिणाम, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक व्यापारात बदलत असलेली समीकरणे, देशोदेशीच्या धोरणबदलांमुळे निर्माण झालेली आव्हाने आणि ऊर्जाक्षेत्रात होणाऱ्या बदलांचा तेलबिया क्षेत्रावर होणारा परिणाम इत्यादी गोष्टींची व्यापक चर्चा करण्यात आली.

मोसमी पावसाचा कालावधी आता अधिकृतपणे समाप्त झाला असला, तरी पुढील दोन आठवडे पावसाची हजेरी कमी-अधिक प्रमाणात राहीलच. संपूर्ण खरीप हंगामात पावसाने दाखविलेल्या लहरीपणाबाबत आपण यापूर्वी भरपूर चर्चा केली आहे. लहरी मॉन्सूनचा खरीप तेलबिया उत्पादनावर काय परिणाम झाला, यावर परिषदेत चांगली चर्चा झाली.

इंदूरस्थित जीजीएन रिसर्च ही कंपनी पीकपाहणी अहवाल आणि बाजारकल या क्षेत्रात काम करते. तिने असे म्हटले आहे, की खरीप तेलबिया उत्पादन घटणार असले, तरी ही घट पूर्वानुमानापेक्षा कमी राहील.

विशेष करून सोयाबीन उत्पादनात येणारी घट ही साधारण पाच लाख टन एवढीच राहील, असे कंपनीचे म्हणणे आहे. पुढील १५ दिवसांत काढणीच्या वेळी हवामान कोरडे राहिले, तर सोयाबीन उत्पादन १०० लाख टन- म्हणजे मागील वर्षीपेक्षा पाच टक्के कमी- राहील.

सर्वांत जास्त घट भुईमूग उत्पादनात राहील, असा कंपनीचा अंदाज आहे. खरीप हंगामातील भुईमूग उत्पादन ५८ लाख टनांवरून ५१ लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज ‘जीजीएन रिसर्च'च्या नीरव देसाई यांनी व्यक्त केला आहे. ऑक्टोबरमधील हवामानामुळे यात थोडा बदल होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या व्यतिरिक्त पीक अहवाल देणाऱ्या इतर संस्थांशी चर्चा केल्यावर असे दिसून आले, की सोयाबीन पिकाचा सरासरी अंदाज ९५ ते ११० लाख टन या कक्षेबाहेर नाही.

मात्र इंदूरस्थित सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा) या संस्थेची पुढील आठवड्यात वार्षिक परिषद भरणार आहे. त्यामध्ये केल्या जाणाऱ्या सादरीकरणात सोयाबीन पिकाचे उत्पादन अनुमान ११५ ते १२० लाख टन राहील, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. परंतु या हंगामातील उत्पादनापेक्षा महत्त्वाची आकडेवारी राहील ती मागील हंगामातील शिल्लक साठ्याची.

बाजारावर पुढील काही दिवस या आकडेवारीचा दबाव राहील. सरत्या हंगामात सोयापेंड निर्यात मागणीत मोठी वाढ झाल्यामुळे येथील क्रशिंग ११० लाख टन झाल्याचे अनेकांनी बोलून दाखवले असले, तरी मागील शिल्लक साठे १५-२० लाख टन राहतील असेही दिसून येत आहे.

त्याचबरोबर येत्या हंगामात सोयापेंड निर्यातीत सातत्य राखणे कठीण राहील, असेही म्हटले जात आहे. याचे कारण म्हणजे ब्राझील, अर्जेंटिना या देशांमध्ये सोयाबीन उत्पादनात होऊ घातलेली वाढ आणि बायोडिझेलसाठी सोयातेल निर्मितीत होणारी वाढ यामुळे पेंड-उत्पादन वाढण्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे जागतिक बाजारात सोयापेंडच्या किमतींवर दबाव राहील, असे आजचे चित्र आहे. त्यामुळे भारताचे नॉन-जीएमओ सोयापेंड उत्पादन स्पर्धेत मागे पडून दुसऱ्या तिमाहीत निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तिसरा घटक म्हणजे खाद्यतेल आयात. याबद्दल आपण मागील लेखात सविस्तर लिहिले आहे. भारतात ऑक्टोबर अखेर संपणाऱ्या वर्षात विक्रमी १६५ लाख टन खाद्यतेल आयात झाल्यामुळे सोयाबीन आणि मोहरीवर सतत दडपण राहील हे उघड आहे. एकंदरीत बाजारात निर्माण झालेली परिस्थिती सोयाबीन उत्पादकांसाठी नजीकच्या काळात तरी उत्साहवर्धक नाही.

ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी सारखा घटक सोडता सध्याच्या परिस्थितीत सोयाबीन बाजारात मागील वर्षीप्रमाणे आठवडाभरासाठी ३०० ते ४०० रुपयांची मंदी येऊ शकते, असे मत अहमदाबादस्थित पॅराडाइम कमोडिटी सल्लागार संस्थेच्या बिरेन वकील यांनी म्हटले आहे. सुरुवातीचे सहा-आठ आठवडे सोयाबीन वर दिलेल्या घटकांच्या प्रभावाखाली नरम राहील असा सूर ग्लोबऑइल परिषदेत उमटला.

‘सोपा'च्या परिषदेत देखील नेहमीप्रमाणे याचीच री ओढली जाण्याची शक्यता आहे. अर्थात, या परिषदांमधील अंदाज म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ नसते. अनेक वेळा हे अंदाज चुकलेले आहेत. अनेक वेळा आकडे दुरुस्त करून सुधारित अंदाज जाहीर केले जातात. त्यामुळे या आकड्यांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही; पण त्याच वेळी ‘ना शेंडा ना बुडखा़’ असलेल्या व्हॉट्सॲप पोस्ट, क्लिपच्या आहारी जाणे देखील अयोग्यच राहील.

शेवटी कमोडिटी बाजार हा कायम अनिश्‍चिततेने भरलेला असतो. यामध्ये एक ‘अनामिक आणि अनोळखी’ घटक बाजारात सतत सक्रिय असतो; जो कधीही दिसत नसतो. कधी तो युद्धरूपाने किंवा भू-राजकीय स्वरूपात पुढे येतो तर कधी कच्चे तेल अचानक मोठी उसळी घेते. नाहीतर कधी सुएझ किंवा पनामा कालव्यातील समस्या जागतिक वाहतुकीत बाधा आणते. अशा घटना-घडामोडींवरही लक्ष ठेवून राहणे गरजेचे असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT