Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीनचा दर पोहोचला चार हजार रुपयांच्या आत

 गोपाल हागे

Buldana News : महिनाभरावर सोयाबीनचा नवीन हंगाम तोंडावर आला आहे. सध्या बाजारात दरवाढीचे कुठलेही संकेत नाहीत. अशातच साठवलेले सोयाबीनही मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असल्याने बाजारांमध्ये सोयाबीनचे दर चार हजार रुपयांच्या आत आले आहेत. याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादकांना बसत आहे. शासनाने तातडीने दरवाढीच्या दृष्टीने हस्तक्षेपाची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

यावर्षी राज्यात सोयाबीनची लागवड सरासरी ४१ लाख हेक्टरच्या तुलनेत ५० लाख हेक्टरवर पोहोचली आहे. खरिपात मागील काही वर्षांत सोयाबीनला इतर पिकांचा पर्याय मिळालेला नाही. त्यामुळे लागवड कमी न होता वाढतच आहे. सोयाबीन काढून रब्बीत दुसरे पीक घेता येते. शिवाय तणनाशकाचा वापर करता येऊ शकतो.

कपाशीच्या तुलनेत खर्च कमी राहतो. यामुळे सोयाबीन पिकाची पसंती टिकून आहे. दुसरीकडे बाजारात सोयाबीनचे दर मागील दोन वर्षांत फारसे वाढलेले नाहीत. सातत्याने चार ते साडेचार हजारांपर्यंत हे दर राहत आलेले आहेत. यंदाचा नवा हंगाम तोंडावर आलेला असून नवे सोयाबीन बाजारात येण्याआधीच दरांबाबत नकारात्मक स्थिती बनली आहे. बाजारात सोयाबीनचा कमाल आणि किमान, हे दोन्ही दर खाली आहेत. चार हजारांच्या आत दर पोहोचला आहे.

सोयाबीन दर घसरणीची कारणे

सरकारने जुलैत जे तेल आयात केले ते एक कारण असू या दर घटण्यामागे आहे. शिवाय डीओसीला मागणी नाही. यंदा उत्पादनाची अपेक्षा जास्त गृहीत धरली जात असल्यानेही दरांवर परिणाम झाला. दरवर्षी ऑगस्टमध्ये सोयाबीनची आवक खूप कमी राहते. यावर्षी शेतकऱ्यांनी साठवणूक जास्त प्रमाणात केली होती. दरवाढीच्या शक्यतेने ठेवलेला हा माल बाजारात तेजीचे संकेत नसल्याने बाहेर येऊ लागला.

महिनाभरात नवीन सोयाबीन विक्रीला येणार आहे. यामुळे दरांवर दबाव वाढला. परिणामी ऑगस्ट महिन्यात सुद्धा यंदा खामगाव बाजारात चार ते पाच हजार क्विंटल सोयाबीनची दररोज आवक होत आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये एवढा माल कधी आलेला आम्ही पाहिला नाही, असे खरेदीदार सांगत आहेत. शिवाय शासनाने आयात केलेल्या तेलाचाही परिणाम निश्‍चितच झालेला आहे, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

आकडेवारी दृष्टिक्षेपात...

- सरासरी क्षेत्र- ४१ लाख ४९९१२ हेक्टर

- राज्यात लागवड- ५० लाख २६ हजार ४९७ हेक्टर

- टक्केवारी - १२१

- बुलडाणा जिल्ह्यात -४ लाख ४० हजार ५१२ हेक्टर

- टक्केवारी-११२ टक्के

सोयाबीन चांगल्या दर्जाची असूनही शेतकऱ्यांचा माल अवघा ३८५० रुपयांनी विकल्या गेला. या भावात कुठल्याही शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करायला परवडणार नाही. राज्य व केंद्र सरकारने वेळीच नियोजन करून भाववाढीसाठी प्रयत्न करावेत. अन्यथा शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये नैराश्य आल्याशिवाय राहणार नाही. याला पूर्णपणे केंद्र सरकारचे शेतकऱ्यांप्रति उदासीन धोरण जबाबदार म्हणता येईल.
- प्रभाकर खुरद, शेतकरी, भोसा, जि. बुलडाणा
या सरकार सगळ्यांसाठी मोफत योजना आणत आहे. सरकारने शेतकऱ्यांना तो नियमित कर्ज भरणारा असो अनियमित असो, किंवा करदाता असो अथवा नोकरदार या सर्वांची तीन लाखांपर्यंतची शेतीकर्जे सरसकट माफ करावीत. सोयाबीन सुद्धा हमीभावाच्या कमी विकली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- डॉ. गजानन गिऱ्हे, शेतकरी, जि. बुलडाणा
सोयाबीन बाजार हा गेल्या दोन वर्षांपासून उतरत्या क्रमात सुरू झाला. सोयाबीन बाजारभाव आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नैराश्याच्या खाईत नेत आहे. मी २०१४ पासून सुमारे ५.८० आर हेक्टरवर सोयाबीनची लागवड करीत आहे. मात्र, दरांमुळे ही पहिल्यांदा फक्त एक एकर सोयाबीन पेरली व उर्वरित कपाशी लावली. वाढलेल्या खर्चामुळे सोयाबीनची शेती तोट्याची बनली आहे. म्हणूनच सोयाबीनऐवजी इतर खरीप पिकांकडे मोर्चा वळवला.
- कैलास अर्जुनराव नागरे, शेतकरी, रा. शिवणी आरमाळ, ता. देऊळगावराजा. जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

Bamboo Farming : पृथ्वी रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त : पाशा पटेल

Agriculture PG Admissions : कृषी ‘पदव्युत्तर’ अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Fish Production : पर्ससीन, एलईडी मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात घट

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

SCROLL FOR NEXT