Nagpur News : अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, अधून-मधून होणारी गारपीट यामुळे आंब्याला मागणी घटल्याने बाजारात दरही दबावात आले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला स्थानिक आंबा वाणाला ४००० ते ५००० रुपये क्विंटलचा दर होता. आता मात्र दरात सुमारे ५०० ते १००० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. ३००० ते ४५०० रुपयांनी या आंब्याचे व्यवहार होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
दरवर्षी उन्हाळ्यात हंगामी फळांची आवक आणि उलाढाल वाढते. ही उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात असल्याचे व्यापारी सांगतात. त्यानुसार एप्रिलच्या सुरुवातीला कळमना बाजार समितीत स्थानिक आंबा वाणांचीच आवक मर्यादित होती. ४०० क्विंटल आवक आणि ४००० ते ६५०० असा दर २ एप्रिलच्या दरम्यान होता.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे दर ४००० ते ५००० रुपयांवर पोचले. या दरम्यान आवक ५ ते ११७७ क्विंटल अशी होती. १५ एप्रिलपर्यंत याच दराने व्यवहार झाले. त्यानंतर मात्र सर्वदूर अवकाळी पाऊस, गारपिटीने आंबा मागणीत घट आली. या दरम्यान बाजारातील आवक दोन हजार क्विंटलच्या पुढे होती. ३६०० ते ४५०० असा दर या कालावधीत मिळाला.
कळमना बाजारात स्थानिक आंबा वाणांची आवक होत असतानाच १६ एप्रिलपासून तोतापुरी आंबाही दाखल झाला. त्यास ३८०० ते ५५०० रुपये दर मिळाला. ३५०० ते ५५०० रुपयांनी देखील मध्यंतरी या आंब्याचे व्यवहार झाले. सद्यःस्थितीत स्थानिक आंबा वाणाला ३००० ते ४५०० आणि तोतापुरी जातीच्या आंब्याला ३५०० ते ५५०० रुपये दर आहे. मागणीत वाढ झाल्यास दरात सुधारणा होईल, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
अमरावतीत केसरची आवक नाही
अमरावती बाजार समितीतही आंबा आवक नियमित होत आहे. या बाजारात केसर आंब्याचे दर गेल्या आठवड्यात ११ हजार रुपयांच्या पुढे होते. आता हे दर ८००० ते १०००० रुपयांवर स्थिरावले आहेत. मात्र सध्या या आंब्याची आवकच नाही.
लालपट्टा आंबा ४५०० ते ५०००, बैगणपल्ली ४००० ते ६००० आणि अन्य वाण ४५०० ते ५५०० रुपये क्विंटल आहे. अमरावती बाजाराचा विचार करता या ठिकाणी कैरीला २५०० ते ३५०० रुपये दर आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.