सांगली ः राज्यातील आंबिया बहारातील डाळिंबाची काही अंशी विक्री सुरू झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत डाळिंबाच्या दरात (Pomegranate Rate) सुधारणा झाली होती. मात्र, या बहारातील डाळिंबाचे देखील पावसाने नुकसान (Pomegranate Damage) झाले आहे. परिणामी उत्पादनात घट (Pomegranate Production) झाली असली तरी, बाजारपेठेत पावसामुळे डाळिंबाची मागणी (Demand Of Pomegranate) फारशी नाही. त्याचा फटका डाळिंब दरावर झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत ११० रुपये प्रति किलो असणारा डाळिंबाचा दर ९० रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक गणित कसे बसवायचे असा प्रश्न पडला आहे.
राज्यात डाळिंबाचे क्षेत्र सुमारे १ लाख ७० हजार हेक्टर इतके आहे. ज्या भागात शाश्वत अशी पाण्याची सोय आहे. त्याचठिकाणी आंबिया बहार धरला जातो. राज्यात अंदाजे २० टक्के म्हणजे ३५ हजार हेक्टरवर जानेवारीपासून आंबिया बहार घेतला जातो. या हंगामातील डाळिंबाची काढणी जुलै ते ऑगस्ट महिन्यापासून सुरू होते. हंगामाच्या प्रारंभी डाळिंबाला चांगली मागणी असते, आणि अपेक्षित दरही मिळतात. यंदाच्या हंगामात डाळिंबाला प्रति किलोस ११० रुपयांपर्यंत असा दर मिळाला असून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही अंशी दिसाला मिळाला. तसेच गणेशोत्सवात डाळिंबाला मोठी मागणी असते. त्यामुळे गणपतीच्या दरम्यान, डाळिंबाची विक्री करण्यासाठी बहाराचे नियोजन शेतकऱ्यांकडून करण्यात येते.
दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठेत डाळिंबाची आवक होत असली तरी, अपेक्षित अशी मागणी नसल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. त्यातच डाळिंबाचे उत्पादन घटले आहे. परिणामी ग्राहकही कमी आहे. त्यामुळे डाळिंबाचा हवा तेवढा उठाव होत नाही. परिणामी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी डाळिंबाला प्रतिकिलोस ११० रुपये मिळणाऱ्या दरात २० रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या डाळिंबाला प्रतिकिलोस ७० रुपयांपासून ते ९० रुपयांपर्यंत असा दर मिळत आहे. अर्थात दर्जेदार डाळिंबास ९० रुपये असा दर आहे. मात्र, पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाचा दर्जा घसरला असल्याने दर्जेदार डाळिंबाचे उत्पादनही कमी आहे. त्यामुळे दोन नंबरच्या डाळिंबाला प्रति किलोस ६० ते ७० रुपये असा दर मिळत आहे.
गतवर्षी आंबिया बहरातील डाळिंबाला प्रति किलोस १५० रुपये असा दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा काही प्रमाणात फायदाही झाला. मात्र, यंदाच्या हंगामात तब्बल ६० रुपयांनी दर कमी झाले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक गणित बसवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गणेशोत्सवात डाळिंबाचे दर वाढणार का?
देशभरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या वेळी डाळिंबाला अधिक मागणी असते. त्यामुळे दरही चांगले मिळतात. परंतु यावर्षी डाळिंबाचे घटलेले उत्पादन आणि सध्या कमी असलेली मागणी याचा परिणाम गणेशोत्सवात येणाऱ्या डाळिंबाच्या दराला फटका बसणार की डाळिंबाच्या दरात वाढ होणार अशी चर्चा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
गेल्या पंधरा दिवसांत डाळिंबाच्या दरात सुधारणा झाली होती. मात्र, अतिपावसामुळे डाळिंबाचे नुकसान झाले. याचा परिणाम डाळिंबाच्या दर्जावर झाला असल्याने डाळिंबाच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे आर्थिक गणित कशी जुळवायची असा प्रश्न आहेच.प्रदीप वाघ, डाळिंब उत्पादक शेतकरी, तीसगाव, ता. पाथर्डी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.