Tur Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement : यंदा तुरीचे उत्पादन भरघोस, पण केवळ २५% खरेदीची शक्यता

Tur Market : सोयाबीननंतर आता राज्यात हमीदराने तूर खरेदी केली जात आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक अंदाजानुसार, राज्यात तुरीचे यंदा ११ लाख ९० हजार १६८ टन उत्पादन होईल.

Team Agrowon

Ahilyanagar / Amaravati News : सोयाबीननंतर आता राज्यात हमीदराने तूर खरेदी केली जात आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक अंदाजानुसार, राज्यात तुरीचे यंदा ११ लाख ९० हजार १६८ टन उत्पादन होईल. सहकार व पणन विभागाने सध्या, तरी २ लाख ९७ हजार टन तूर खरेदी करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केलेले आहे.

त्यामुळे यंदा होणाऱ्या उत्पादनापैकी केवळ पंचवीस टक्के तूर खरेदी होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, दहा जिल्ह्यांत यंदा हेक्टरी दहा क्विंटलपेक्षा अधिक उत्पादनाचा प्राथमिक अंदाज आहे. नोंदणीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र खरेदीचा प्रारंभ होत नसल्याने आर्थिक गरजेपोटी शेतकरी खासगी बाजारात तूर विकत असल्याने बाजारातील आवक वाढली आहे.

राज्यात यंदा तुरीचे १२ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पीक घेतले. आता बऱ्यापैकी तुरीची काढणी झाली असल्याने पीक हाती आले आहे. मात्र तुरीची बाजारात आवक सुरू झाली, की बाजारात दर पाडले जात असल्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. तुरीला हमीदरानुसार ७७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळणे गरजेचे असताना सध्या बाजारात तुरीला प्रति क्विंटल केवळ ७ हजार २०० रुपयांच्या आतच दर मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या तुरीची हमीदराने खरेदी करता यावी यासाठी यंदाही हमीदराने खरेदी सुरू केली आहे. यापूर्वी जेथे सोयाबीन खरेदी केली त्याच केंद्रावर तुरीची खरेदी केली जात आहे. यंदा राज्यात दोन लाख ९७ हजार ४३० टन तूर खरेदी केली जाणार असल्याचे पणन विभागाने निश्‍चित केले आहे.

कृषी विभागाकडून पीक कापणी प्रयोगातून उत्पादकता निश्‍चित केली जाते. अजून पूर्णतः तुरीची उत्पादकता हाती आलेली नसली तरी प्राथमिक अंदाज कृषी विभागाने जाहीर केला आहे.

त्यानुसार ११ लाख ९० हजार १८६ टन तुरीचे उत्पादन होणार असल्याचे दिसते आहे. मात्र दोन लाख ९७ हजार ४३० टन तूर खरेदी केली जाणार असल्याचे उत्पादन होणाऱ्यापैकी पंचवीस टक्केच तूर खरेदी होईल. एक तर उशिराने सरकारी तूर खरेदी सुरू झाली, त्यातच खरेदीचे उद्दिष्ट कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांना सरकारी खरेदी केंद्रांवर तूर विक्रीपासून वंचित राहावे लागणार आहे.

राज्यात यंदा तुरीचे पीक चांगल्या स्थितीत होते. त्यामुळे अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत तुरीची उत्पादकता हेक्टरी १० क्विंटलपेक्षा अधिक आहे. ज्या जिल्ह्यात तुरीची उत्पादकता अधिक असेल तेथे खरेदीचे उद्दिष्ट अधिक असले पाहिजे असे शेतकऱ्यांना वाटत आहे. अमरावती जिल्ह्यात १ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली.

कृषी विभागाने जिल्ह्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी १३६० किलो काढली आहे. त्यानुसार १ लाख ५८ हजार ६१६ टन उत्पादनाचा अंदाज असून नाफेड त्यातील ३२ हजार ३८४ टन तूर हमीदराने खरेदी करणार आहे. त्यासाठी जिल्हा मार्केटिंगच्या आठ व व्हीसीएमएफच्या (विदर्भ को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन) १२ केंद्रांवर २४ जानेवारीपासून नोंदणीचे आदेश काढण्यात आले. प्रत्यक्षात नोंदणी तीन फेब्रुवारीपासून सुरू झाली. २५ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे मुदत संपताना जिल्ह्यातील ३ हजार ९५२ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. आता नोंदणीस तीस दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून २४ मार्चपर्यंत नोंदणीची प्रक्रिया चालणार आहे.

खासगी बाजारांतील आवकेत वाढ

शासकीय खरेदी प्रारंभ होत नसल्याने कंटाळलेल्या गरजवंत शेतकऱ्यांनी खासगी बाजारात तुरीची आवक वाढविली आहे. १ जानेवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत अमरावती बाजार समितीत तुरीची पावणेदोन लाख क्विंटलची आवक झाली आहे. हमीदरापेक्षा कमी दर मिळत असला तरी नगदी चुकारे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. जानेवारीत ७ हजार २४० व १८ फेब्रुवारीदरम्यान तुरीला सरासरी ७ हजार १६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. गेल्या आठवड्यात या दरात थोडी सुधारणा झाली असून दर ७ हजार ३३८ रुपये दर मिळाला.

सोयाबीन विक्रीपासून अनेक शेतकरी वंचित

अहिल्यानगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत यंदा सोयाबीनचे चांगले उत्पादन निघाले. बाजारात पुरेसा दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची हमीकेंद्रांवर विक्री करण्यासाठी नोंदणी केली. मात्र हमीकेंद्रांवर सोयाबीन खरेदी बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीपासून वंचित राहावे लागले आहे. एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात नोंदणी करूनही एक हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना तूर विक्री करता आली नाही. आता तुरीचीही अशीच अवस्था होणार का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

शासनाला केवळ घोषणांमधूनच शेतकरी हित जपायचे आहे. हमीभावाची देखील वारंवार घोषणा केली जाते. परंतु त्याचा कोणताच उपयोग शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. कधी बारदाना तर कधी साठवणुकीच्या जागेचा मुद्दा उपस्थित करून खरेदी थांबवली जात आहे. तुरीची केवळ नोंदणी सुरू आहे. प्रत्यक्षात खरेदी केव्हा सुरू होईल हे साक्षात ब्रह्मदेवाला सांगता येणार नाही.
- मनीष जाधव, प्रदेश प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT