India Agriculture Export नवी दिल्ली (एएनआय) : ‘‘गेल्या काही वर्षांत कृषी आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यातीत (Agriculture Export) लक्षणीय वाढ झाली आहे,’’ अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी संसदेत दिली.
या उत्पादनांची २०२१-२२ या वर्षात ३ लाख ७४ हजार ६११ कोटी रुपयांची विक्रमी निर्यात झाली आहे. त्यात २०.७९ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी (ता. ३) जाहीर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदनानुसार, २०१९-२० मध्ये कृषी आणि संबंधित उत्पादनांची निर्यात २ लाख ५२ हजार ४०० कोटी रुपयांची होती. हीच निर्यात २०२०-२१ मध्ये ३ लाख १० हजार १३० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
त्यात २२.८७ टक्क्यांची वाढ झाली. तर २०२१-२२ या वर्षात ३ लाख ७४ हजार ६११ कोटी रुपयांची विक्रमी निर्यात झाली आहे. त्यात २०.७९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तोमर यांनी माहिती दिल्यानुसार, देशाच्या पश्चिम विभागात गुजरात आणि महाराष्ट्राने कृषी आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यातीत आघाडी घेतली आहे.
त्यानंतर पूर्वेकडील आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल, मध्य किंवा उत्तर प्रदेशात उत्तर प्रदेश आणि हरियाना, तर दक्षिणेकडील कर्नाटक आणि केरळ राज्ये आघाडीवर आहेत.’’
निर्यात केलेल्या वस्तूंपैकी सागरी उत्पादनांचे मूल्य २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात १३ हजार ७३४.६१ कोटी रुपयांनी वाढले, तर साखरेचे मूल्य १३ हजार ६७६.१२ कोटी रुपयांनी वाढले.
२०२१-२२ मध्ये निर्यात केलेल्या गव्हाच्या मूल्यात ११ हजार ६७२.३७ कोटी रुपयांची वाढ झाली, तर बासमतीचा अपवाद वगळता तांदळाचे मूल्य आर्थिक वर्षात १० हजार १६८.३९ कोटी रुपयांनी वाढले, असे तोमर यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
२०२१-२२ मध्ये कच्च्या कापसाच्या निर्यातीत ७ हजार ३८.६६ कोटी रुपयांची वाढ झाली, तर इतर तृणधान्यांचे मूल्य २९११.०४ रुपयांनी वाढले.
तर दुग्धजन्य पदार्थाच्या निर्यातीत २ हजार ३५२.९३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तर कॉफीचे मूल्य २ हजार २७३.९७ कोटी रुपयांनी वाढले. याशिवाय एरंडेल तेलाच्या निर्यातीत १ हजार ९५२.३६ कोटी रुपयांची वाढ झाली.
तर विविध प्रक्रिया केलेल्या वस्तूंचे मूल्य २ हजार ३११.८६ कोटी रुपयांनी वाढले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.