Rajma Cultivation
Rajma Cultivation Agrowon
मार्केट बुलेटीन

Rajma Cultivation : हरभऱ्याऐवजी राजमा पीक निवडले तर शेतकऱ्यांना फायदा होईल का?

टीम ॲग्रोवन

भारताची सोयापेंड निर्यात वाढणार

१. भारतातून होणारी सोयापेंड निर्यात पुढील काही महिन्यांत वाढती राहील, असे सॉल्वन्ट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे एसईएचे कार्यकारी संचालक बी व्ही मेहता यांनी सांगितले. चालू हंगामात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत भारताची सोयापेंड निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ८ टक्के घटली. परंतु आता परिस्थिती सुधारत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये निर्यात वाढलीय. ऑक्टोबर महिन्यात ४० हजार १९६ टन सोयापेंड निर्यात झाली. तर सप्टेंबरमध्ये फक्त १३ हजार ७१८ टन सोयापेंड निर्यात झाली होती. म्हणजे महिनाभरात निर्यातीत सुमारे १९३ टक्के वाढ झाली. महिनाभरापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दराच्या तुलनेत भारतातील सोयापेंड महाग पडत होती. परंतु आता सोयाबीनला प्रति क्विंटल ५७०० ते ५८०० रूपये दर मिळत असून निर्यातीच्या किमतीतही पडतळ बसत आहे. त्यामुळे निर्यात वाढलीय, असे मेहता म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सायोपेंडेच्या किंमतीत किंचित घट होऊ शकते. भारतातील सोयापेंड निर्यात आता वाढत जाईल, असे त्यांनी सांगितले. सोयापेंड निर्यात वाढल्यास त्याचा सोयाबीन उत्पादकांना थेट फायदा होईल.

देशात गव्हाचा पेरा १५ टक्के वाढला

२. यंदा देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्यांत गव्हाची पेरणी नेहमीपेक्षा लवकर सुरू झाली. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील १८ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार सुमारे १०१ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झालीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाचा पेरा १५ टक्क्यांनी वाढलाय. गव्हाचा सर्वाधिक पेरा पंजाबमध्ये झालाय. त्यानंतर राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांचा क्रमांक लागतो. रब्बी अन्नधान्य पिकांमध्ये एकट्या गव्हाचा वाटा ७० टक्के आहे. यंदा गव्हाचं क्षेत्र जास्त राहील. परंतु पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशात खतांचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

मक्याच्या भावात वाढीचा कल

३. छिंदवाडा हे मध्य प्रदेशातील मार्केट मक्यासाठी प्रसिध्द आहे. तिथे मक्याच्या किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या. परंतु नंतरच्या टप्प्यात किमतीत सुधारणा झाली. गेल्या आठवड्यात स्पॉट किमती १.६ टक्क्यांनी वाढून प्रति क्विंटल २,१७१ रूपयांवर पोहोचल्या. चालू आठवड्यात त्या १.३ टक्क्यांनी वाढून २,२०० रूपयांवर गेल्या. मक्याची किमान आधारभूत किंमत म्हणजे हमीभाव १९६२ रूपये आहे. फ्युचर्स मार्केटमध्येही दरवाढीचा कल आहे. फ्युचर्समध्ये डिसेंबर डिलिवरी किमती रु. २,२८५ वर आल्या आहेत. यंदा खरीप मक्याचे देशातील उत्पादन २३१ लाख टन राहील, असा केंद्र सरकारचा अंदाज आहे. हे उत्पादन विक्रमी ठरेल. परंतु मक्याची मागणी वाढती आहे. विशेषतः पशुखाद्यासाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे दराला आधार मिळेल, असे एकंदर चित्र आहे.

साखर उत्पादनात किंचित घट

४. पश्चिम भारतात पावसामुळे साखर कारखान्यांची धुराडी उशिरा पेटली. त्यामुळे गाळप हंगाम सुरू व्हायला उशीर झाला. त्याचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. चालू साखर हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू झालाय. या हंगामाच्या पहिल्या ४५ दिवसांत साखर उत्पादनात किंचित घट झालीय. या काळात १९.९ लाख टन साखर उत्पादन झालंय. गेल्या वर्षी याच कालावधीत २०.८ लाख टन उत्पादन झालं होतं. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने म्हणजे इस्माने ही माहिती दिलीय. तसेच आतापर्यंत ३५ लाख टन साखर निर्यातीसाठीचे करार झाले आहेत. त्यापैकी फक्त २ लाख टन साखर ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्षात निर्यात झालीय. गेल्या वर्षी याच कालावधीत ४ लाख टन साखर निर्यात झाली होती. केंद्र सरकारने साखर निर्यात धोरण जाहीर करण्याआधीच अनेक व्यापाऱ्यांनी साखर निर्यातीचे करार करून टाकले होते. मधल्या काळात साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे आता साखर कारखान्यांनी निर्यात दराच्या बाबतीत नव्याने वाटाघाटी करायला सुरूवात केलीय, असंही इस्मानं म्हटलंय.

हरभऱ्याऐवजी राजमा पीक निवडले तर शेतकऱ्यांना फायदा होईल का?

५. रब्बी हंगामात राजमा (Rajma Cultivation) हा हरभऱ्याला (Chana Crop) चांगला पर्याय ठरू शकतो, असे मत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (MPKV) माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख (Dr. Rajaram Deshmukh) यांनी व्यक्त केलंय. राज्यात गेल्या काही वर्षांपासून हरभरा हे रब्बी हंगामातील (Rabi Season) प्रमुख पीक बनलं आहे. पूर्वी रब्बीत हरभऱ्याबरोबर गहू, ज्वारी, मसूर, राजमा, करडई, जवस, मोहरी, सूर्यफूल अशी पिकं घेतली जायची. पण हळूहळू हरभऱ्याचं क्षेत्र वाढत गेलं. रोगराईचा कमी प्रादुर्भाव आणि भावाची खात्री यामुळे हरभरा राज्यात वाढत गेला. इतर पिकांचं क्षेत्र खूपच घटलं. करडईसारखी पिकं तर संपल्यातच जमा आहेत.

पण आता हरभऱ्यावर मर आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. तसेच वर्षानुवर्षे हरभरा हे एकच पीक घेतल्यामुळे जमिनीचा कसही कमी होत आहे. त्यातच गेल्या काही हंगामापासून सरकारच्या धोरणामुळे हरभ्याला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. त्यामुळे शेतकरी रब्बीत हरभऱ्याला पर्यायी पीक शोधत आहेत. डॉ. देशमुख यांनी त्याला दुजोरा दिला आहे. राजमा हे पीक हरभऱ्याच्या तुलनेत कमी कालावधीत हाताशी येते, त्यावर फारसे रोग पडत नाहीत, त्याला पाणीही तुलनेने कमी लागते, भाव चांगला मिळतो, असे डॉ. देशमुख म्हणाले. राजमा हे पीक सध्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू येथेच मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे या पिकाला फारशी स्पर्धा नाही. म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी राजमा पिकाचा हरभऱ्याला पर्याय म्हणून विचार करावा, असे डॉ. देशमुख म्हणाले. राजमा पिकाची नोव्हेंबर अखेरपर्यंत पेरणी करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

SCROLL FOR NEXT