सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता
1. गेल्या आठवड्यात देशातील व राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सोयाबनच्या दरात काहीशी घट झाली होती. शेतकऱ्यांना सरासरी ५४०० ते ५५०० रूपये दर मिळाला. परंतु आता आठवडाभरात सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल सुमारे १०० रूपयांनी वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणत आहेत. त्यामुळे बाजारात आवक कमी आहे. त्याचा परिणाम प्रक्रिया उद्योगावर झाला आहे. तसेच मलेशियात पामतेलाच्या किंमतीत सुधारणा झाली आहे. मलेशियात पामतेलाच्या किंमतीत ३ टक्के वाढ झाली आहे. क्रुड ऑईल म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरणही थांबली आहे. त्यामुळे आठवडाभरात सोयाबीनचे दर सुधारण्याचा अंदाज आहे.
निर्यात थंडावल्याने कापसातील तेजीला ब्रेक
2. कापूस निर्यात थंडावल्याने कापसातील तेजीला ब्रेक लागला आहे. जागतिक बाजारातील दरपातळीच्या तुलनेत भारतीय कापूस महाग पडतोय. त्यामुळे निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. बांगलादेश आणि व्हिएतनामसारखे देश भारताऐवजी ब्राझीलसारख्या देशांमधून कापूस आयात करत आहेत. त्यातच डॉलरच्या तुलनेत रूपयातील घसरण आता कमी झाली आहे. त्याचाही प्रतिकूल परिणाम निर्यातीवर होत आहे. तसेच चीनकडून कापसाची अपेक्षित मागणी नाही. तिथे कोरोना निर्बधांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. तेथील अस्थिर राजकीय स्थितीचा कापसाच्या मागणीवर परिणाम होणार आहे. एकंदर कापसाला गेल्या वर्षीइतका विक्रमी भाव मिळणार नाही, परंतु मंदीही येणार नाही. कापसाचे किमान भाव नऊ हजार रूपयांच्या पातळीवर स्थिर राहण्याची शक्यता आहे, असे विश्लेषकांनी सांगितले.
यंदा शिल्लक उसाची समस्या नाहीः साखर आयुक्त
3. यंदा उसाचा गळित हंगाम उशिरा सुरू झालेला असला तरी शिल्लक उसाची समस्या भेडसावणार नाही. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी असे मत व्यक्त केले आहे. राज्यातील ४५ मोठ्या साखर कारखान्यांनी विस्तारीकरण केलेले आहे. त्यामुळे राज्याची दैनंदिन गाळप क्षमता ६० हजार टनाने वाढलेली आहे. त्यामुळे यंदा गाळप हंगाम जूनपर्यंत चालणार नाही, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच यंदा खोडवा उसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या वजनामध्ये २० टक्क्यांपर्यंत तर मराठवाड्यात ३० टक्क्यांपर्यंत घट येते आहे. परिणामी महिनाभर आधीच यंदाचा गाळप हंगाम समाप्त होऊ शकतो. त्यामुळे शिल्लक उसाची समस्या उद्भवणार नाही, असे साखर आयुक्तांनी सांगितले.
किटनाशकांच्या ऑनलाईन विक्रीला परवानगी
4. केंद्र सरकारने किटकनाशकांची ऑनलाईन विक्री करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना ॲमेझॉन, फ्लिफकार्टसारख्या इ-कॉमर्स वेबसाईटवरून किटकनाशकांची थेट खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होईल. कृषी रसायन उद्योगाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयाचा उद्योग आणि शेतकरी या दोन्ही घटकांना फायदा होईल, असे म्हटले आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन खरेदीमुळे किटकनाशकांचे अनेक पर्याय उपलब्ध होतील. सध्या कृषी सेवा केंद्रातून शेतकरी किटकनाशके खरेदी करतात. कमिशनच्या हव्यासापोटी कमी गुणवत्तेची किंवा बनावट उत्पादने शेतकऱ्यांच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होतो. तसेच किंमतीतही एकवाक्यता नाही. ऑनलाईन खरेदीमुळे शेतकऱ्यांना गुणवत्तेची हमी मिळू शकते, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. सध्या देशातील कृषी रसायने उद्योगाची उलाढाल ८६ हजार कोटींच्या घरात आहे. पण सध्या कृषी रसायनांची ऑनलाईन विक्री नगण्य आहे.
देशात गहू, तांदळाचा साठा बफर स्टॉकपेक्षा अधिक
5. केंद्र सरकारकडे गहू आणि तांदळाचा पुरेसा साठा (Wheat Rice Stock) उपलब्ध आहे. येत्या एप्रिलपर्यंत देशात संरक्षित साठ्याच्या म्हणजे बफर स्टॉकच्या (Wheat Buffer Stock) तुलनेत अधिक साठा उपलब्ध असेल. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी नुकतीच ही माहिती दिली. १५ नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात सुमारे २०१ लाख टन गव्हाचा साठा आहे. तर १४० लाख टन तांदूळ साठा (Rice Stock) उपलब्ध आहे. केंद्र सरकारने एप्रिलपर्यंत आपल्याकडे किती साठा असेल, याचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार १ एप्रिल २०२३ रोजी गव्हाचा अंदाजे साठा ११३ लाख टन असेल. बफर स्टॉकसाठी ७५ लाख टन गव्हाचा साठा अपेक्षित आहे. तर १ एप्रिल रोजी सरकारकडे तांदळाचा अंदाजित साठा २३७ लाख टन असेल. बफर स्टॉकसाठी १३६ लाख टन तांदूळ लागतो. थोडक्यात गहू आणि तांदूळ या दोन्हींचा साठा बफर स्टॉकपेक्षा जादा असेल, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.
सरकार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY), राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) आणि इतर कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना अन्नधान्यांचा परवुठा करत असते. त्यासाठी पुरेशी तरतूद केल्यानंतरही सरकारी गोदामात बफर स्टॉकपेक्षा अधिक साठा असेल, असं सरकारी निवेदनात म्हटलंय. साठ्याची स्थिती समाधानकारक असल्यामुळे सरकार दर नियंत्रणासाठी उपाययोजना करणार नाही, असे अन्न सचिवांनी सांगितलंय. तसेच यंदाच्या रब्बी हंगामात गहू लागवड वाढण्याची शक्यता आहे. अन्नधान्य उपलब्धतेसाठी ही बाब अनुकूल ठरणार आहे. ही सगळी स्थिती पाहता गहू, तांदळाचे दर पडण्याची सध्या तरी शक्यता नाही, असं बाजारविश्लेषकांचं मत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.