कापसाचा दर टिकून राहणार
मागील दोन दिवसांमध्ये कापसाच्या (Cotton Rate) कमाल दरात ३०० रुपयांची नरमाई दिसून आली. सध्या कापसाला ८ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तर वायद्यांमध्ये कापसाचे दर नरमल्यानंतर (Cotton Market Rate Under Pressure) पुन्हा सुधारलेले दिसतात. १४ सप्टेंबरला वायद्यांमध्ये (Cotton Futures Market) कापूस जवळपास ३५ हजार रुपये प्रतिगाठीवर होता. एक कापूस गाठ १७० किलोची असते.
मात्र १९ सप्टेंबरला ३२ हजार ४३० रुपयांपर्यंत कापूस नरमला. त्यानंतर वायद्यांच्या दरात चढ-उतार होत आज ३२ हजार ९२७ रुपयाने व्यवहार झाले. सध्या बाजारात काहीशी अस्थिरता असली तरी जागतिक आणि देशातील बाजाराची स्थिती पहता शेतकऱ्यांनी किमान ९ हजार रुपयांची दरपातळी लक्षात ठेऊन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
मका दर निर्यातीवर अवलंबून
देशात सध्या मका दर (Maize Market Rate) काहीसे नरमले आहेत. केंद्र सरकारनं तुकडा तांदूळ निर्यातबंदी (Boiled Rice Export Ban) केली, तसचं काही तांदूळ वाणांच्या निर्यातीवर शुल्कही लावले. त्यामुळं तांदळाचे दर (Rice Rate) काहीसे कमी झाले आहेत. त्याआधीही तांदळाच्या तुलनेत मका महाग होता.
त्यामुळं पोल्ट्री उद्योगानं तांदळाचा वापर वाढवला होता. परिणामी मका दर २८०० रुपयांवरून २ हजार ५०० रुपयांपर्यंत नरमले. सध्या मक्याला चांगली मागणी आहे. निर्यात अशीच सुरु राहील्यास मक्याचा दर २ हजार ४५० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
काकडीला उठाव कायम
काकडीला सध्या चांगला दर मिळतोय. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळं काकडीच्या लागवडी खराब झाल्या होत्या. तसचं भाजीपाला पिकाखालील क्षेत्र रिकामं होण्यास उशीर झाला. त्यामुळं सध्या बाजारातील काकडीची आवक कमीच होतेय.
पुणे, मुंबई आणि नागपूर या बाजार समित्यांमध्ये काकडीची आवक ३०० क्विंटलपेक्षा अधिक होतेय. तर इतर बाजार समित्यांमधील आवक ही सरासरी ३० क्विंटलपेक्षाही कमी आहे. त्यामुळं सध्या काकडीला १८०० रुपये ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हा दर टिकून राहण्याचा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
लिंबाचे दर तेजीतच
लिंबू सध्या चांगलाच भाव खातोय. मागील तीन आठवड्यांपासून लिंबाला मागणी वाढली आहे. त्यातच पावसामुळं लिंबाचं उत्पादन कमी झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं सध्या बाजारातील लिंबू आवक कमी होतेय. पुणे आणि मुंबई वगळता इतर बाजार समित्यांतील आवक सध्या खुपच कमी आहे.
त्यामुळं लिंबाला चांगला दर मिळतोय. सध्या सरासरी ४ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलनं लिंबाचे व्यवहार होत आहेत. बाजारतील आवक वाढेपर्यंत हा दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
हरभरा दरात सुधारणा होईल
यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच हरभरा दर दबावात आहेत. सप्टेंबर महिन्यापासून देशातील बाजारात सणांची मागणी वाढते. एरव्ही दबावात असणाऱ्या हरभऱ्याला या काळात उठाव मिळत असतो. मात्र यंदा नाफेडकडे मोठ्या प्रमाणात साठा आहे. हा साठा नाफेड खुल्या बाजारात विक्री करतेय. त्यातच केंद्र सरकारनं राज्यांना सवलतीच्या दरात १५ लाख टन हरभरा देण्याचा निर्णय घेतलाय.
सरकारकडून या योजनेतून हरभरा खरेदीसाठी छत्तीसगड, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांनी तयारी दाखवल्याचं वृत्त आहे. याचाही मानसिक परिणाम बाजारावर जाणवतोय. बफर स्टाॅकच्या नियमानुसार नाफेडकडे ६ लाख टनांचा साठा असणं आवश्यक आहे. मात्र सध्या नाफेडकडे २८ ते ३० लाख टनांच्या दरम्यान साठा असण्याची शक्यता आहे. पुढील हंगामात एप्रिल २०२३ पासून पुन्हा नवा हरभरा खरेदी करता यावा यासाठी नाफेड जास्तीत जास्त विक्री करण्याचा प्रयत्न करतेय.
सध्या खुल्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. नाफेडच्या विक्रीमुळं बाजार दबावात असला तरी चांगल्या गुणवत्तेच्या हरभऱ्याला मागणी वाढतेय. चांगल्या गुवत्तेच्या हरभरा दरात दोन दिवसांमध्ये क्विंटलमागं सरासरी ३० रुपयांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. सणांच्या काळात या हरभरा दरात काहीशी वाढ होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.