Tur Market Update : तुरीच्या बाजारातील नरमाई आता थांबली आहे. देशातील बाजारात तुरीचा सरासरी भाव काही बाजारात वाढलेला दिसतो. बाजारातील सध्याची तुरीची आवक सरासरीपेक्षा कमी झाली. सरकार बाजारभावाने तुरीची खरेदी करणार असल्याने शेतकरी विक्रीसाठी थांबलेले दिसतात.
त्यामुळे तुरीच्या भावाला देखील आधार मिळात आहे. सध्या तुरीचा सरासरी भाव ७ हजार ७०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसतो. यंदा उत्पादन कमीच आहे. सरकारही बाजारभावाने खरेदीत उतरत असल्याने तुरीच्या बाजाराला चांगला आधार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही यंदा तुरीसाठी चांगला भाव मिळू शकतो, असे अभ्यासकांनी सांगितले.
देशातील बाजारात सोयाबीनचे भाव कमीच आहेत. बाजारातील आवक दीड लाख क्विंटलच्या दरम्यान आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून सरासरी आवक कायम दिसते. राज्यातील बाजारातच ५० ते ६० हजार क्विंटलच्या दरम्यान सोयाबीन विक्रीसाठी आले होते. मध्य प्रदेशात आवक काहीशी अधिक होती.
राजस्थानमध्ये १५ हजार क्विंटल आणि इतरही भागात याचदरम्यान आवक झाली होती. आवक कायम असल्याने भावावरील दबावही कायम दिसतो. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ही भावपातळी बाजारातील आवक असेपर्यंत कायम राहू शकते, असा अंदाज आहे.
कापसाच्या भावावरील दबावही कायम आहे. कापसाची बाजारातील आवक वाढलेलीच दिसते. कापसाचे भाव कमी असतानाही बाजारातील आवक जास्त आहे. सध्या कापसाचे भाव सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजारातील आवक जवळपास १ लाख ८० हजार गाठींच्या दरम्यान राहीली.
सर्वाधिक आवक महाराष्ट्रातील बाजारात झाली. जवळपास ४५ ते ५० लाख गाठी कापूस आला होता. तर तेलंगणात ४० हजारांच्या दरम्यान आणि गुजरातमध्ये ३५ हजार गाठींच्या दरम्यान कापूस बाजारात विक्रीसाठी येत आहे, असे व्यापारी आणि उद्योगांनी सांगितले. बाजारातील आवक जास्त आहे तोपर्यंत दरावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज आहे.
लसूण बाजारात सध्या चांगलाच भाव खात आहे. लसणाची बाजारातील आवक खपूच कमी आहे. तर मागणी मात्र चांगली दिसते. लसणाला सध्या लग्न समारंभ आणि हाॅटेल क्षेत्रातून चांगली मागणी येत आहे. याचा आधार लसणाच्या भावाला मिळत आहे. त्यामुळे लसणाचे भाव तेजीत आले.
सध्या राज्यातील बाजारात लसूण प्रतिक्विंटल १८ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. किरकोळ बाजारात लसणाचे भाव चांगेच वाढले आहेत. यापुढील काळातही लसणाची मागणी कायम राहून, लसणाच्या भावातील तेजीही कायम राहू शकते, असा अंदाज आहे.
आल्याचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये क्विंटलमागे एक हजार रुपयाने कमी झालेले दिसतात. बाजारातील आवक आणि नफावसुलीसाठी झालेली विक्री याचा परिणाम आले दरावर दिसून येत आहे. सध्या आल्याचे भाव ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत.
पुढील काळात लग्न समारंभामुळे आल्याला मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यातच यंदाही आले उत्पादनाविषयीची चिंता कायम आहे. उत्पादन यंदाही कमीच राहू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून राहतील, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.