Chana Market Agrowon
बाजार विश्लेषण

Chana Market : हरभरा बाजाराची दिशा काय राहू शकते?

Chana Bazar : हरभरा बाजारावर पुढील काळात काय परिणाम होऊ शकतो आणि बाजाराची दिशा काय राहू शकते, याची घेतलेला हा आढावा.

Anil Jadhao 

अनिल जाधव

Chana Rate : हरभऱ्याचे भाव सध्या काही कारणांनी कमी झाले आहेत. सरकार मात्र ग्राहकांचा विचार करून बाजार दबावात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यंदा घटलेले उत्पादन, इतर कडधान्यांचे भाव, सरकारकडील हरभरा स्टॉक, सरकारची हमीभावाने खरेदी या गोष्टी बाजाराला आधार देणाऱ्या आहेत. या सगळ्या घटकांचा हरभरा बाजारावर पुढील काळात काय परिणाम होऊ शकतो आणि बाजाराची दिशा काय राहू शकते, याची घेतलेला हा आढावा.

जगातील हरभरा वापरात कोणते देश आघाडीवर आहेत, असा प्रश्‍न आला तर त्याचे उत्तर भारत असेच आहे. भारत जागतिक पातळीवर कडधान्य उत्पादन आणि वापरात आघाडीवर आहे. देशांतर्गत उत्पादन कमी पडत असल्याने भारताला कडधान्यांची आयातही करावी लागते. त्यात हरभऱ्याचाही समावेश आहे. हरभरा वापरात भारत जगात आघाडीवर आहे. सोबतच ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, म्यानमार आणि इथिओपिया या देशांमध्ये हरभऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

जागतिक पातळीवर कडधान्यामध्ये हरभरा तिसऱ्या क्रमांकाचे मुख्य पीक आहे. हरभरा उत्पादनात भारत जगात आघाडीवर आहे. जगाच्या एकूण उत्पादनात भारताचा वाटा तब्बल ७० टक्के आहे. मागील हंगामात भारतात ११९ लाख टन उत्पादन झाले, अशी सरकारची आकडेवारी सांगते. मात्र उद्योगाच्या मते उत्पादन १०० लाख टनांवरच स्थिरावले. त्यानंतर टर्कीचा नंबर लागतो. जगाच्या उत्पादनात टर्कीचा वाटा ४.४२ टक्के आहे. त्यानंतर रशिया ३.५५ टक्के, म्यानमार ३.५० टक्के, पाकिस्तान ३.१३ टक्के, इथिओपियाचा ३ टक्के वाटा आहे.


पीकनिहाय कडधान्यातील वाटा (टक्क्यांत)

बीन्स…३१
वाटाणावर्गीय…१७
हरभरा…१५
मसूर…८
तूर….७

जागतिक उत्पादनाची स्थिती
जगात हरभरा उत्पादन वर्षागणिक वाढतच आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, टर्की, रशिया, म्यानमार, पाकिस्तान, अमेरिका, मेक्सिको, इराण आदी ६० ते ६५ देशांमध्ये हरभऱ्याचे उत्पादन होते. मात्र भारताचा वाटा अधिक आहे. जगात हरभरा उत्पादनात सतत वाढच होत गेली. २०१६ मध्ये जागतिक हरभरा उत्पादन १५९ लाख टनांवर होते. ते २०१८ मध्ये १६९ लाख टनांवर पोहोचले. जागतिक हरभरा उत्पादनात सातत्याने वाढच होत आहे. २०२२ मध्ये जागतिक हरभरा उत्पादन २१३ लाख टनांवर पोहोचल्याचे, मार्केटमधील अंदाज आहेत. मात्र जागतिक पातळीवर हरभरा लागवड आणि उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे.

जागतिक हरभरा उत्पादन (लाख टनांत)
२०१६…१५९
२०१७…१६१
२०१८….१६९
२०१९….१७२
२०२०…१८६
२०२१…१९५
२०२२…२१३

हरभरा उत्पादनात भारताचा वाटा ः
जगात हरभरा उत्पादनात आणि वापरात भारत आघाडीवर आहे. भारतात हरभरा वगळता इतर कडधान्याची आयातही करावी लागते. भारत कडधान्यामध्ये केवळ हरभरा उत्पादनात स्वयंपूर्ण आहे. एकूण जागतिक उत्पादनाचा विचार करता भारतात जगातील एकूण हरभरा उत्पादनापैकी तब्बल ६६ टक्के उत्पादन गेल्या हंगामात झाले होते. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा जागतिक उत्पादनातील वाटा केवल ५.८ टक्के होता. यातूनच जागतिक हरभरा
उत्पादनात भारत किती महत्त्वाची भूमिका पार पाडतो यावरून स्पष्ट होते.


जागतिक हरभरा उत्पादनात देशनिहाय वाटा (टक्क्यांत)
भारत…६६
ऑस्ट्रेलिया…५.८०
टर्की…४
रशिया…३.७०
अमेरिका…३.५०
इथिओपिया…३
इतर…१४

देशातील हरभरा लागवड
जागतिक हरभरा लागवडीचा विचार केला तर भारतातील लागवड सर्वाधिक असते. २०२१-२२ मध्ये भारतात सर्वाधिक ११४ लाख ९५ हजार हेक्टरवर हरभरा लागवड झाली होती. पण त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या कारणांनी लागवड कमी होत गेली. यंदा हरभरा लागवड कमी होण्याचे मुख्य कारण होते कमी पाऊस. यंदा देशातील ६० टक्के भागात कमी पाऊस झाला. तसेच परतीचा पाऊसही पुरेसा झाला नाही. परिणामी, रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण नव्हते. यामुळे देशातील हरभरा लागवड गेल्या वर्षीपेक्षा तब्बल ६ टक्क्यांनी कमी झाली. चालू हंगामात देशात हरभऱ्याखालील क्षेत्र १०४ लाख ७४ हजार हेक्टर होते.

देशातील हरभरा लागवड (लाख हेक्टरमध्ये)
२०१६-१७…९९
२०१७-१८…१०७
२०१८-१९…९६.१९
२०१९-२०…१०७.३०
२०२०-२१…११०.३८
२०२१-२२…११४.९५
२०२२-२३…११०.७१
२०२३-२४…१०४.७४

देशातील राज्यनिहाय हरभरा लागवड
देशात दरवर्षी मध्य प्रदेशात हरभरा लागवड सर्वाधिक होत असते. पण गेल्या दोन हंगामांपासून महाराष्ट्र हरभरा लागवडीत आघाडीवर पोहोचला. यंदाही महाराष्ट्र आपलं स्थान राखून आहे. मात्र लागवड गेल्या वर्षीपेक्षा कमी झाली. यंदा देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक सर्वच राज्यांमध्ये हरभरा लागवड कमी झाली. फक्त मध्य प्रदेशातील लागवड गेल्या वर्षीपेक्षा जास्त दिसते. महाराष्ट्रातील हरभरा लागवड यंदा जवळपास १० टक्क्यांनी कमी झाली. तर मध्य प्रदेशातील लागवड ११ टक्क्यांनी वाढली. मध्य प्रदेश वगळता इतर राज्यांमधील लागवडही घटलेली दिसते.

राज्यनिहाय हरभरा लागवड (लाख हेक्टरमध्ये)
राज्य…२०२२-२३…२०२३-२४
महाराष्ट्र…२९…२६
मध्य प्रदेश…२१…२३
राजस्थान…२१…१९
कर्नाटक…११…९
गुजरात…७…६

देशातील उत्पादन यंदाही घटणार
गेल्या तीन वर्षांचा ट्रेण्ड पाहता भारतात हरभरा उत्पादन कमी होत असल्याचे दिसते. २०१६-१७ पासून ते २०२१-२२ पर्यंत उत्पादन वाढतच होते. पण त्यानंतर मात्र यंदाचे दुसरे वर्ष आहे की ज्यात उत्पादन घटले आहे. देशातील उत्पादन घटण्याला प्रामुख्याने दुष्काळी स्थितीमुळे कमी झालेली लागवड हे कारण आहे. यंदा देशातील लागवड ६ टक्क्यांनी कमी झाली. त्यातच लागवड झालेल्या पिकाला पाण्याची टंचाई भासत होती. याचा उत्पादकतेला फटका बसला. तर वाढत्या उष्णतेमुळेही उत्पादन कमी राहणार आहे. पाणीटंचाई आणि वाढती उष्णता तसेच बदलते वातावरण यामुळे उत्पादन यंदा किमान १५ टक्क्यांपर्यंत कमी राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील हरभरा उत्पादन (लाख टनांत)
२०१६-१७…९३.८
२०१७-१८…११३.८
२०१८-१९…९९.४
२०१९-२०…११०.८
२०२०-२१…११९.१
२०२१-२२…१३१.२
२०२२-२३…१२२.६
२०२३-२४…१२१.६*
(* दुसरा सुधारित अंदाज )

...यामुळे घटणार उत्पादन
- देशातील लागवड यंदा ६ टक्क्यांनी घटली
- पिकाला पोषक वातावरण नव्हते
- देशात अनेक भागांत लागवडीसाठी पुरेशी ओल नव्हती
- देशातील ६० टक्के भागात पाऊस कमी असल्याने पिकाला पाणी कमी होते
- ऐन बहर लागण्याच्या काळात वातावरणात मोठे बदल झाले होते
- चालू वर्षात जानेवारी, फेब्रुवारी आणि आता मार्च या तीनही महिन्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त होते.
- तापमान वाढीमुळे हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज

भाव हमीभावापेक्षा कमी होण्याची तीन कारणे ः
१) नवीन मालाची आवक ः

मागील काही आठवड्यांपासून देशात मोठ्या बाजारांमध्ये नव्या मालाची आवक वाढत आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर महत्त्वाच्या राज्यांमधील हरभरा काढणी आता पूर्ण झाली. तसेच यंदा इतर पिकांचा पर्याय कमी असल्याने शेतकरी हरभरा विकत आहेत. सरकारचाही दबाव हरभरा बाजारावर दिसून येत आहे. आवकेचा हंगाम आणि सरकारचे धोरण यामुळे पुढील महिना दोन महिने बाजार दबावात राहू शकतो. त्यामुळे शेतकरी हरभरा विक्री करत आहेत. त्यामुळे सर्वच राज्यांमधील मोठ्या बाजारातील भाव ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचले. तर हमीभाव ५ हजार ४४० रुपये आहे.

२) वाटाणा आयात ः
देशातील डाळींचे वाढते भाव आणि घटलेले उत्पादन पाहू केंद्र सरकारने पिवळा वाटाणा आयातीला मुक्त परवानगी दिली. त्यामुळे पिवळा वाटाणा आयात वाढली. फेब्रुवारीपर्यंत तब्बल ६ लाख टन पिवळा वाटाणा आयात झाला होता. तर एप्रिलच्या शेवटपर्यंत ही आयात १५ लाख टनांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे. पिवळा वाटाणा आयात वाढीचा थेट परिणाम हरभरा भावावर झाला. कारण पिवळा वाटाणा हरभऱ्याला पर्याय म्हणून वापरला जातो. हरभरा डाळीपेक्षा स्वस्त असल्याने प्रक्रिया उद्योगाने पिवळा वाटाण्याचा वापर वाढवला. बेसन उद्योगही किमती कमी ठेवण्यासाठी हाच कित्ता गिरवत आहेत. यामुळे हरभऱ्याच्या मागणीवर परिणाम होऊन दरावर दबाव आला.

३) सरकारची स्वस्त विक्री ः
ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने हरभरा डाळीची स्वस्त दरात विक्री सुरू केली. भारत ब्रॅण्डच्या नावाखाली केंद्र सरकार ६० रुपये प्रतिकिलोने हरभरा डाळीची विक्री करत आहे. बाजारात जेव्हा हरभरा भाव ६० रुपये किलो होता तेव्हा सरकार ६० किलोने डाळ देत होते. सहाजिकच याचा परिणाम बाजारावर दिसत गेला. विशेष म्हणजे जेव्हा पिवळ्या वाटाण्याची आयात वाढत गेली आणि नवा माल बाजारात येत गेला तेव्हा सरकारच्या या डाळ विक्रीचा परिणाम वाढत गेला.

बाजाराचे भविष्य काय राहू शकते?
देशातील कडधान्याचे उत्पादन आणि मागणी लक्षात घेता भावपातळी हमीभावापेक्षा जास्त राहण्यासाठी पोषक स्थिती आहे. पण सरकार ग्राहकांना दिलासा देण्यासाठी भाव कमी करण्याचे नक्कीच प्रयत्न करत आहे. सरकारचा मुख्य जोर निवडणुका होईपर्यंत राहू शकतो. निवडणुकांच्या काळात महागाई वाढल्यास सरकारला याची किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे सरकार काहीही करून भाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून आयात, स्वस्त विक्री, व्यापारी आणि उद्योगांवर दबाव, असे सरकारचे धोरण दिसते. सरकार किमान निवडणुका होईपर्यंत बाजार ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी सरकार स्टॉकमधील हरभऱ्याची विक्री करू शकते. सध्या नाफेडकडे १० लाख टनांच्या दरम्यान हरभरा असू शकतो. म्हणजेच स्टॉक कमी झाला. सरकार नवा हरभराही खरेदी करणार आहे. सध्या बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकरी नाफेडला जास्त हरभरा विकतील, असा अंदाज बांधला जात आहे. पण नाफेडची खरेदी आणि बाजारभावात ३०० ते ५०० रुपयांपेक्षा जास्त फरक असला तरच शेतकरी जास्त हरभरा नाफेडला देतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेही नाफेडची खरेदी सुरू झाल्यानंतर खुल्या बाजारालाही आधार मिळेल आणि दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील महिना-दोन महिन्यांनंतर बाजारातील आवक कमी झाली आणि निवडणुका पार पडल्यानंतर बाजार पुन्हा हमीभावाची पातळी ओलांडू शकतो. बाजारभाव ५ हजार ४०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभरा भावाला कशाचा आधार मिळू शकतो?
- हरभरा उत्पादनात १० ते १५ टक्के घटीचा अंदाज
- हरभरा आयातीवरील ५० टक्के शुल्क कायम
- नाफेडकडील हरभरा स्टॉक कमी होऊन १० लाख टनांवर आला
- तूर, मूग, उडीद या कडधान्याचे भाव टिकून
- लग्नसराई, सणांमुळे हरभऱ्याला चांगली मागणी
- सरकारची हमीभावाने खरेदी सुरू झाल्यास खुल्या बाजाराला आधार मिळेल
- खुल्या बाजारात सध्या हमीभावापेक्षा सरासरी २०० ते ३०० रुपये कमी भाव
- चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांची सावध विक्री
- निवडणुकीनंतर सरकारचे धोरण बदलण्याची शक्यता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT