कोल्हापुरी गूळ (Kolhapuri jaggery) हे देशातील नावलौकिक असलेले उत्पादन (Jaggery Production) आहे. जिल्ह्यातील सहा- सात तालुक्यांतील गूळ कोल्हापूर बाजार समितीत (Kolhapur APMC) येतो. ही बाजार समिती गुळासाठी देशात प्रसिद्ध आहे. गुळाच्या खरेदी- विक्रीसाठी (Jaggery Market) स्वतंत्र विभाग आहे. बाजार समितीच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत गूळ आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या विभागातून दरवर्षी तब्बल साडेसहाशे कोटींपर्यंतची उलाढाल होते. प्रत्येक वर्षी सुमारे २५ लाख गूळ रवे (ढेपा) एवढी आवक होते.
बारमाही सौद्यांचा ‘ट्रेण्ड’
ऑक्टोबर ते मार्च हा गुळाचा मुख्य हंगाम समजला जातो. ऊस हंगाम सुरू झाला, की त्याच वेळेस हा हंगाम सुरू होतो. गेल्या दोन वर्षांपासून मात्र हा ‘ट्रेण्ड’ बदलला आहे. बाजार समितीतील हंगामी गुळाचे सौदे बारमाही होत आहेत. एप्रिल २०२१ पासून ऑक्टोबर या काळात सौदे एकदाही बंद राहिले नाहीत. अगदी पावसाळा हंगमात देखील. यंदा वर्षभर किमान २० ते २५ गुऱ्हाळे सुरू राहिली. त्यामुळे आवक सातत्याने झाली. कोल्हापूर हा प्रमुख ऊस उत्पादन जिल्हा आहे.
आडसाली, पूर्वहंगामी व सुरू अशा तीन हंगामात ऊस लागवड होते. मात्र अलीकडील दोन वर्षांत बिगर हंगामी लागवड होत आहे. हा ऊस वेळेत साखर कारखान्यांना जाईल याची शक्यता कमी असते. महापुराचा कालावधी व अन्य कारणांमुळे ऊस उत्पादक ऊस रसवंतीगृह, गुऱ्हाळासाठी देत असल्याचे चित्र दिसून आले आहे. प्रसंगी शेजारील सांगली जिल्हा व अन्य भागातूनही ऊस आणून गूळनिर्मिती सुरू राहिली. परिणामी, वर्षभर उपलब्धता राहिली. गेल्या वर्षी बिगर हंगामी गुळाची आवक झाली असली, तरी दर मात्र फारसे उच्चांकी नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. या गुळाला ३६०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले.
बाजार समितीतील बिगर हंगामी गुळाचे चित्र (२०२२)
महिना गूळ रवे आवक सरासरी दर (प्रति क्विंटल)
एप्रिल ७३१३९ ३८००
मे ५३२०२ ३६००
जून ४५५८५ ३६००
जुलै ७६५३ ३६००
ऑगस्ट २४७५१ ३८००
सप्टेंबर ७४८३१ ३७००
‘जीआय’ मानांकित गूळ
कोल्हापुरात गूळ तयार होत असला तरी सुमारे ८० टक्के गूळ गुजरातमधील व्यापारी कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करतात. वेष्टणात पॅकिंग करून गूळ सुरक्षितपणे गुजरातला पाठवण्यात येतो.
गोडसरपणा, टिकाऊपणा व विशिष्ट भौगोलिक वातावरणात तयार केलेला म्हणून कोल्हापुरी गुळाला
भौगोलिक मानांकनही (जीआय) आहे. गुजरातमध्ये तो वर्षभर शीतगृहात साठवून ग्राहकांना पुरवला जातो. साहजिकच कोल्हापूरची गूळ बाजारपेठ मुख्यतः गुजरातच्या मागणीवर तरलेली आहे.
रव्याचे बदलते स्वरूप
गूळ बाजारपेठ सुरू झाली त्या काळी ३० किलोचे रवे बाजार समितीत यायचे. मात्र गेल्या काही वर्षात हे रवे १० किलोवर आले. मोठ्या वजनापेक्षा लहान वजनाच्या रव्यालाच मागणी वाढत गेली. बाजार समितीतील मुख्य उलाढाल ही दहा किलोच्या रव्यावरच होते. रवे बाजार समितीत आणल्यानंतर
गोडीनुसार सौदा होतो. सध्याही सौद्याची हीच प्रचलित पद्धत सुरू आहे. ढेपेत चाकू मारून थोडासा गूळ काढून चव पाहिली जाते व गोडीनुसार दर ठरवले जातात. ग्राहकांची मागणी ओळखून आता एक किलोचे रवेही तयार करण्यात येत आहेत. त्याचा स्वतंत्र सौदा काढण्यात येतो.
एक किलोला असलेली मागणी, मिळत असलेला चांगला दर व अधिक किरकोळ ग्राहक या बाबी पाहात अधिकाधिक गूळ उत्पादक त्याच्या निर्मितीकडे वळले आहेत. काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून थेट खरेदीही सुरू केली आहे. काही शेतकऱ्यांनी बदलती बाजारपेठ बघून आपल्या पारंपारिक गुऱ्हाळ घरांमध्येही सुधारणा सुरू केली आहे.
‘मार्केट’ विस्तारले
गुजरातकेंद्रित ‘मार्केट’ हळूहळू मुंबई, पुण्याकडे सरकत आहे. गुळाची निर्यातही होत आहे. मात्र या त्यासाठीचे मापदंड अत्यंत काटेकोर आहेत. ढेपेला ‘कार्पोरेट’ किंवा व्यावसायिक लूक देण्याचा प्रयत्न गूळ उत्पादक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. मेवा- चॉकलेट, सहा ग्रॅमचे क्यूब्सज, पावडर, बारीक दाणे, बदाम, बेसन डाळयुक्त बर्फी, नाचणी लाडू, शुद्ध काकवी याद्वारे गुळाचे मूल्यवर्धन झाले आहे.
हा बदल निश्चितच महत्त्वाचा आहे. औषध म्हणूनही त्याचा वापर होत आहे. अशा मूल्यवर्धनामुळे गुळाची किंमत किलोला १५० ते २०० रुपयांपर्यंत जाण्यास मदत झाली आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळीत अनेक कंपन्यांनी गुळावर आधारित पदार्थांचे ‘गिफ्ट हॅम्पर’ घेतले. विविध कार्यक्रमांतही ते दिसू लागल्याने देणाऱ्या व घेणाऱ्या अशा दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटून जातात.
जिल्ह्यात बहुतांशी भागात बारमाही पाण्याची उपलब्ध असल्याने खरीप व रब्बीची पिके निघाल्यानंतर तातडीने ऊस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खाण्याबरोबरच रोपवाटिका व गुऱ्हाळ घरासांठी ऊस देण्याचे प्रमाण वाढले आहे. ऊस हंगाम सोडून अन्यवेळी येणाऱ्या गुळाचा दर्जा तुलनेने कमी असला तरी गुळाला वर्षभर मागणी असल्याने गुऱ्हाळ घरांना उत्पादन कायम सुरू ठेवणे परवडते.डॉ. अशोक पिसाळ कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर
गेल्या वर्षभरात एकही महिना विना सौद्याचा घालवला नाही. या वर्षी प्रथमच वर्षाहून अधिक काळ सलग सौदे सुरू राहिल्याचे चित्र बाजार समितीत दिसले.के. बी. पाटील, गूळ विभाग प्रमुख कोल्हापूर बाजार समिती ८८८८८ ४६१३४
पूर्वी बिगर हंगामातील गुळाच्या उपलब्धतेसाठी व्यापारी हंगामात गूळ घेऊन तो शीतगृहात ठेवत असत. मात्र आता वर्षभर आवक होत असल्याने व्यापाऱ्यांनी शीतगृहासाठी खरेदी केली नाही. परिणामी, दरात देखील उच्चांकी वाढ झाली नाही. व्यापारी गरजेपुरताच गूळ खरेदी करत आहेत. परिणामी, फार समाधानकारक दर मिळत नसल्याची स्थिती आहे.एम. एस. जाधव, व्यवस्थापक, दीपक गूळ उत्पादक सहकारी सोसायटी, कोल्हापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.