Pune News : केंद्र सरकारचा कांदा निर्यातबंदी उठवण्याच निर्णय म्हणजेच शेतकऱ्यांच्या जखमेवर मोठ चोळण्याचा प्रकार दिसतो. कारण निर्यातबंदी उठवल्यानंतरही कांद्याचा भाव तोच आहे. कारण ५५० डाॅलर किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्कामुळे भारताचा कांदा आयातदार देशांना महाग पडत आहे. त्यामुळे निर्यातीला मागणी घटली. तर सरकार कधी काय निर्णय घेईल, याची शाश्वती नसल्यानं शेतकरी कांदा विक्रीची घाई करताना दिसत आहेत. यामुळे बाजारातील कांद्याचे भाव पुन्हा निर्यातबंदीच्या काळातील भावापर्यंत कमी झाले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर, निर्यात बंदी उठवल्यापासून मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत आहेत. त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. सरकार शेतकऱ्यांचा नेहमीच विचार करते, हेही सांगायला ते विसरले नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र सरकारनं शेतकऱ्यांसोबत पुन्हा एकदा हातचलाखी केली. निर्यातबंदी उठवल्यानंतर का कांद्याची निर्यात वाढली ना कांद्याचे भाव वाढले.
आज बाजारात कांद्याला सरासरी १२०० ते १५०० रुपयांचा भाव मिळाला. आता काही बाजारांमध्ये कांद्याचा भाव १७०० ते २००० रुपयांच्या दरम्यान दिसतो. पण त्या बाजारातील कांद्याची आवक खूपच कमी आहे. विशेष म्हणजे सध्या कांद्याला जो भाव मिळतोय हाच भाव कांद्यावर निर्यातबंदी असतानाही मिळत होता. मग सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्याचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला?
सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली. पण किमान निर्यात मूल्य ५५० डाॅलर आणि ४० टक्के निर्यात शुल्क लावले. हा भाव होतो जवळपास ६५ रुपये किलो.कांदा निर्यातीसाठी खर्च लागतो किमान १५ रुपये. म्हणजेच भारताचा कांदा आयातदार देशांना किमान ८० रुपये प्रतिकिलोने पडतो. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे भाव यापेक्षा कमी आहेत. दुबईसह आखातील देशात काही ठिकाणी भाव या दरम्यान आहेत. पण चीन, पाकिस्तान, इजिप्त, श्रीलंका आणि बांगलादेशात कांदा आपल्यापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे भारताच्या कांद्याला कमी मागणी आहे. म्हणजेच निर्यात खुली केली तरी निर्यात मात्र नगण्य होत आहे.
दुसरीकडे सरकार सतत कांद्याबाबत आपले धोरण बदलत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांनाही सरकारच्या धोरणावर विश्वास राहीला नाही. आता तरी निर्यात खुली कमी, पुढे सरकार काय करेल याचा भरवसा नाही. त्यामुळे सध्या मिळेल तो भाव पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी पॅनिक सेलिंग करताना दिसत आहेत. यामुळे बाजारात कांदा आवक वाढून भाव आणखी दबावात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याचे पॅनिक सेलिंग टाळावे. टप्प्याटप्यात माल बाजारात आल्यास आवक मर्यादीत राहून भाव टिकून राहण्यासही मदत होईल, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले त्याप्रमाणे खरचं शेतकऱ्यांना चांगला भाव द्यायचा असेल तर किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क काढायले हवे. नाही किमान निर्यात मूल्य काढले तरी चालेल पण ४० टक्के निर्यात शुल्क काढायला हवे. या निर्यातशुल्कामुळे सगळी अडचण होत आहे, असे निर्यातदार सांगतात. त्यामुळे ४० टक्के निर्यातशुल्क काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरवा करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.