Palm Oil and Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Palm Oil Impact on Soybean : पाम तेलातील तेजी सोयाबीनच्या मुळावर

Market Impact : पाम तेलाचा पुरवठा कमी झाल्याने सोयातेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा महाग झाले. सूर्यफूल तेलाचा पुरवठाही मर्यादित आहे. सोयाबीनची उपलब्धता मात्र मुबलक असल्याने गाळप वाढत आहे.

Anil Jadhao 

Pune News : पाम तेलाचा पुरवठा कमी झाल्याने सोयातेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा महाग झाले. सूर्यफूल तेलाचा पुरवठाही मर्यादित आहे. सोयाबीनची उपलब्धता मात्र मुबलक असल्याने गाळप वाढत आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे भाव दबावात आले. अर्जेंटिनातून भारतात सोयातेल आयातीचा लोंढा वाढला. या घडामोडींचा परिणाम देशातील सोयाबीन बाजारावर होत आहे.

जागतिक बाजारात पहिल्यांदा पाम तेलाचे भाव सोयातेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा जास्त झाले आहेत. मलेशियातील पुरामुळे उत्पादनावर झालेला परिणाम आणि इंडोनेशियाने निर्यात शुल्कात केलेली वाढ तसेच जैवइंधनासाठी पामतेलाचा वाढलेला वापर यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाला चांगलीच फोडणी मिळाली. एकेकाळी गरिबांचे तेल म्हणून ओळखले जाणारे पाम तेल आता सर्वांत महाग झाले.

द सॉल्व्हेंट एक्स्ट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आयात होणाऱ्या तेलामध्ये पाम तेलाचे भाव जास्त आहेत. सध्या कच्चा पाम तेलाचे भाव टनामागे कच्चा सोयातेलापेक्षा १२२ डॉलरने जास्त आहेत. तर कच्चा सूर्यफूल तेलापेक्षा ६५ डॉलरने जास्त आहेत. रिफाइंड पाम तेलाचे भावही रिफाइंड सोयातेल आणि रिफाइंड सूर्यफूल तेलापेक्षा जास्त आहेत, मात्र दरात फरक काहीसा कमी आहे.

इंडोनेशियाने रिफायनिंगची क्षमता वाढवली आहे. त्याचा फटका भारतातील रिफायनरींना बसत आहे. त्यातच इंडोनेशिया रिफाइंड पाम तेल निर्यातीला अनुदानही देत आहे. मात्र कच्चे पामतेल निर्यातीवर निर्यात शुल्क लावत आहे. त्यामुळे कच्चे पाम तेल, कच्चे सोयातेल आणि कच्चे सूर्यफूल तेलाच्या तुलनेत जास्त महाग झाले. पण रिफाइंड पाम तेल, रिफाइंड सोयातेल तसेच सूर्यफूल तेलाच्या भावातील फरक कमी आहे. म्हणजेच रिफाइंड पाम तेल तुलनेत स्वस्त पडत आहे.

आयातीच्या आलेखात बदल

आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजारात बदलत्या समीकरणांमुळे भारताच्या खाद्यतेल आयातीतही बदल होत आहे. नोव्हेंबर महिन्यात भारताच्या सोयाबीन तेलाच्या आयातीत १७२ टक्के वाढ झाली. तर रिफाइंड पाम तेलाच्या आयातीत ६६ टक्के वाढ झाली. मात्र कच्चा पाम तेलाच्या आयातीत २१ टक्क्यांची घट झाली.

इंडोनेशियाचे धोरण

इंडोनेशियाने जानेवारी २०२५ पासून बी-४० धोरण लागू करण्याचे ठरवले आहे. म्हणजेच इंडोनेशिया ४० टक्के पाम तेल जैवइंधनात वापरणार आहे. इंडोनेशियाच्या या धोरणामुळे २० लाख टन पाम तेलाचा वापर जैवइंधनात होणार आहे. पाम तेलाचा पुरवठा कमी करून किमती स्थिर ठेवण्यासाठी आणि देशातील उत्पादकांना फायदा देण्यासाठी इंडोनेशियाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इंडोनेशियाने पाम तेलापासून जैवइंधन निर्मितीसाठी उद्योगांची क्षमता वाढवली आहे. त्यामुळे जास्त पाम तेलाचा वापर जैवइंधनासाठी होत असून पाम तेलाचा पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत आहे.

सोयातेलासाठी गाळप वाढले

पाम तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत आहेत. तर रशिया युक्रेनमधील तणामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठाही मर्यादित झाला. त्यामुळे सोयातेलाला मागणी आली. सोयातेलाचेही भाव वाढत असल्याने अर्जेंटिनात सोयाबीनचे गाळप वाढले. परिणामी सोयापेंडचे साठे तयार झाले असून, भाव कमी झाले आहेत. त्यातच चलनाचे मूल्य कमी झाल्याचा फायदा अर्जेंटिनाला मिळत आहे. पण भारतातील शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.

इंडोनेशियाचे धोरण आणि मलेशियातील अडचणी यामुळे पामतेलाचा पुरवठा कमी झाला. सध्या पाम तेल जास्त किमतीने विकले जात आहे. यामुळे सोयातेलाला मागणी वाढली आणि गाळपही वाढत आहे. पण सोयापेंडचे साठे तयार झाल्याने किमती दबावात आहेत.
बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, द साॅल्व्हेंट एक्स्ट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT