Cotton Rate
Cotton Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : कापूस दरात मोठी घट; दर वाढतील का?

Anil Jadhao 

अनिल जाधव

पुणेः कापूस बाजाराचा (Cotton Market) आजचा दिवस शेतकऱ्यांना निराश करणारा ठरला. आज वायदे (Future market) आणि बाजार समित्यांमधील कापूस दरात (Cotton Rate) मोठी नरमाई पाहायला मिळाली. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली. आज कापूस दरात क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयांपर्यंत दर कमी झाले आहेत. 

आज वायद्यांमध्ये कापसाचे दर गाठीमागे १६४० रुपयाने कमी झाले. वायदे आज २७ हजार ४०० रुपयांवर होते. क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर हा दर १६ हजार रुपये प्रतिक्विंटल होतो. तर बाजार समित्यांमध्येही कापसाचे दर शनिवारच्या तुलनेत आज ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटलने कमी झाले होते. आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.

ख्रिसमस आणि नव वर्षाच्या सुट्ट्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पुढील आठवडाभर व्यवहार बंद आहेत. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे सौदे होत नाहीत. याचाही परिणाम देशातील कापूस दरावर झालाय. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठे खरेदीदार, निर्यातदार आणि ब्रोकर्स या काळात सुट्टी घेत असतात. केवळ कापूस नाही, तर सर्वच शेतीमालाचेही व्यवहार सध्या बंद आहेत. पण आपल्याकडे सोयाबीनच्या वायद्यांवर आधीच बंदी आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरावर फारसा परिणाम जाणवणार नाही.

तसंच देशातील वायद्यांमध्ये सध्या केवळ डिसेंबरचे व्यवहार सुरु आहेत. सेबीने अद्याप जानेवारी २०२३ आणि त्यापुढील वायद्यांना परवानगी दिलेली नाही. म्हणजेच केवळ डिसेंबरच्या वायद्यांसाठीच व्यवहार सुरु आहेत. तेही ३० डिसेंबरला संपतात. याचाही मानसिक परिणाम कापूस दरावर होतोय. सेबी कापसाचे जानेवारी आणि पुढील वायदे आणणार की वायदेबंदी करणार? हा प्रश्न कायम असून बाजारात त्याचे पडसाद मागील काही दिवसांपासून उमटत आहेत.

…………
आवकेचा दबाव?

एरवी डिसेंबर हा जास्त आवकेचा महिना असतो. यापुर्वी यावर आपण चर्चा केलेलीच आहे. डिसेंबर आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कापसाचे दर हंगामातील सर्वात कमी पातळीवर असतात. यंदा शेतकऱ्यांनी कापूस रोखला, त्यामुळं दर जास्त होते. मात्र दरात चढ उतार होऊन काही काळासाठी बाजारावर दबाव येईल, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी यापुर्वीच दिला होता. त्याप्रमाणं सध्या बाजार दबावात आलाय.

……………….
चीनमधील कोरोना

चीनमध्ये कोरोना वाढल्याच्या बातम्यांचाही परिणाम बाजारावर जाणवतोय. मात्र, चीनमध्ये कोरोना दाखवला जातो त्या तीव्रतेचा नाही, असंही काही जणांचं म्हणणंये. पण काही असलं तरी चीन कापसाचा सर्वात मोठा ग्राहक असल्यानं त्याच्या मागणीचा आंतरराष्ट्रीय बाजार आणि पर्यायाने देशातील बाजारावरही परिणाम होत असतो. याचाच मानसिक परिणाम भारताच्या कापूस बाजारावर होत असल्याचं काही जणांचं म्हणणये.

……………
चित्र कधी स्पष्ट होईल?

सध्या आपला बाजार सुरु असला तरी आंतरराष्ट्रीय बाजार बंद आहे. आता तुम्ही म्हणालं, त्यावरून आम्हाला काय घेणं देणं? पण कापसाचा बाजार केवळ देशापुरताच मर्यादीत नसून जागतिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी जास्त झाल्याचा परिणाम आपल्या बाजारावर थेट होत असतो. त्यामुळंच तर उद्योग मागील काही दिवसांपासून देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दराची तुलना करून आयात शुल्क काढण्याची मागणी करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ४ जानेवारीपासून व्यवहार सुरु होतील. चीनमधील कोरनाचे चित्रही जानेवारीच्या मध्यापर्यंत स्पष्ट होईल. चीनच्या मार्केटमधून मागणी वाढेल की घटेल याचा अंदाज स्पष्ट होऊ शकतो. तसंच देशातील जास्त आवकेचा दबाव कमी होईल. त्यामुळं जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

……………….
काय परिस्थिती राहील?

पुढील दोन किंवा तीन आठवडे कापूस बाजारावर दबाव असेल. सध्या देशातील कापूस दराची तुलना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारही सुरु नाही. त्यामुळं घाबरून न जाता. पॅनिक सेलिंग टाळावे. जानेवारीत परिस्थिती सुधारु शकते. आंतरराष्ट्रीय बाजारही सुरु होईल. त्यामुळं आणखी स्पष्टता येईल. त्यामुळं शेतकऱ्यांनी गरजेपुरता कापूस विकून शक्य असल्यास दर वाढेपर्यंत वाट पाहणेच सध्याच्या परिस्थितीत फायदेशीर ठरेल, असे आवाहन जाणकारांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT