Grape Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Grape Rate : द्राक्ष उत्पादकांची दरामुळे कोंडी

Grape Market : गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलत असल्याने द्राक्षाची गोडी, रंग आणि जाडी वाढण्यास अडथळे निर्माण होत आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : सततच्या अस्मानी संकटांनी द्राक्ष उत्पादक शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलत असल्याने द्राक्षाची गोडी, रंग आणि जाडी वाढण्यास अडथळे निर्माण होत आहे. अशा परिस्थितीही राज्यातील द्राक्ष हंगाम सुरू झाला असून, आतापर्यंत १० ते १५ टक्के क्षेत्रावरील द्राक्षाची विक्री झाली आहे. मात्र द्राक्षाचे दर दबावात असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चारही बाजूंनी कोंडी झाली आहे.

राज्यात द्राक्षाचे क्षेत्र सुमारे ४ लाख ५० हजार एकर इतके आहे. या वर्षी द्राक्ष हंगामाला अस्मानी संकटांचा फटका बसला. त्यातूनही शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बागा वाचवल्या. आगाप फळ छाटणी सुमारे ५० हजार एकरांवर झाली होती. या आगाप फळ छाटणीमधील द्राक्षाची विक्री पूर्ण झाली आहे.

द्राक्ष हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना झाला. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून हंगामाला थोडी गती मिळाली. मात्र डिसेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे नुकसान झाले. सध्या उत्तर भारतात थंडी वाढल्याने त्या भागातून द्राक्षाची मागणी कमी झाली असल्याचे चित्र आहे.

त्यातच गेल्या महिन्याभरात कधी ढगाळ वातावरण, थंडी याचा फटका बागेला बसला आहे. परिणामी द्राक्षात गोडी उतरली नाही. रंग, आकार वाढला नाही. त्यामुळे याचा परिमाण द्राक्षाच्या दरावर झाला असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या द्राक्षाला वाण आणि दर्जानुसार प्रति किलोस २० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत असा दर मिळत आहे.

द्राक्षाची छाटणी होतेय विभागून

वास्तविक पाहता, गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी द्राक्षाचा हंगाम सुमारे तीन ते चार महिने चालत होते. परंतु गेल्या चार ते पाच वर्षांत राज्यात द्राक्षाचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच नैसर्गिक संकट सातत्याने बागेला बसतोय.

यामुळे शेतकरी फळ छाटणीचे नियोजन विविध टप्प्यांत करू लागले आहेत. जून-जुलै, ऑगस्ट-सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर असे चार टप्प्यांत फळ छाटणी होऊ लागली आहे. त्यामुळे द्राक्ष विक्रीचीही त्यानुसार होऊ लागली असून, आठ ते नऊ महिने द्राक्ष बाजारपेठेत येऊ लागली आहेत.

उत्पादन खर्च जास्त; मिळणारा दर कमी

कोरोनापूर्वी द्राक्षाला प्रति किलोस ५० रुपयांपासून ७५ रुपये असा दर मिळाला होता. मात्र त्यानंतर प्रत्येक हंगामात २० रुपयांनी दरात घसरण होत आहे. त्यातच द्राक्ष उत्पादन खर्चही वाढत आहे. एक किलो द्राक्ष तयार करण्यासाठी ३० रुपये इतका खर्च येतो.

सध्या द्राक्षाला २० ते ४० रुपये असा दर मिळत आहे. वास्तविक पाहता, उत्पादन खर्चापेक्षा दर कमी मिळत असल्याने आर्थिक ताळमेळ कसा लावायचा, असा प्रश्‍न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

बदलत्या वातावरणामुळे संकट.

द्राक्ष फळ छाटणीची झाली विभागणी.

त्यामुळे दरात होतेय चढ-उतार.

फेब्रुवारीच्या मध्यापासून गती येण्याची शक्यता.

गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी दर कमीच....

गतवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्षाला प्रति किलोस ४० ते ६० रुपये असा दर होता. मात्र यंदा हंगाम सुरू झाल्यापासून द्राक्षाचे दर कमी अधिक होत होते. परंतु जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी दर कमीच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे.

यंदाचा द्राक्षाचा हंगाम दरामुळे अडचणीत आला आहे. द्राक्षाला पोषक वातावरण मिळाले, तर द्राक्षाची गोडी वाढले आणि दर वाढीस मदत होईल. पण या साऱ्या गोष्टी वातावरणावर अवलंबून आहे.
- शिवाजी पवार, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT