Pune News : इथेनाॅलसाठी मक्याचा वापर यंदा किमान ५० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तर रब्बीतील मका लागवडही गेल्यावर्षीपेक्षा कमी दिसत आहे. बाजारातील हीच परिस्थिती मक्याच्या भावाला आधार देणारी ठरणार आहे. मक्याचा बाजार रब्बीचा माल बाजारात येऊन गेल्यानंतर २ हजार ६०० ते २ हजार ८०० रुपयांचा भाव दिसू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात सध्या मक्याला सरासरी २ हजार १०० ते २ हजार २५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर काही बाजारात मक्याच्या भावाने महीभावाची पातळी ओलांडली आहे. सरकारने यंदा मक्यासाठी २ हजार २२५ रुपये हमीभाव जाहीर केला. सध्या काही राज्ये वगळता इतर राज्यांमध्ये मक्याचा बाजार हमीभावापेक्षा जास्त दिसतो. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि तमिळनाडूमध्ये मक्याचा भाव हमीभावापेक्षा जास्त आहे. या राज्यांमध्ये मक्याचा सरीसरी भाव २ हजार २५० ते २ हजार ३७५ रुपयांच्या दरम्यान आहे.
खरिपात मक्याची लागवड वाढली होती. त्याप्रमाणे रब्बी हंगामातही मक्याची लागवड वाढेल, असा अंदाज होता. पेरणी सुरु झाली तेव्हा सुरुवातीच्या काळात तसे संकेतही मिळत होते. मात्र पेरणी जसजशी पुढे सरकत गेली, तसे पेरणीचा वेग कमी होत गेला. सध्या रब्बीत मक्याची लागवड गेल्यावर्षीपेक्षा ४ टक्क्यांनी कमी दिसत आहे. यंदा मक्याची लागवड १६ लाख हेक्टरपर्यंतच झाली आहे.
त्यामुळे रब्बी हंगामात मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढेल, ही शक्यता आता मावळली आहे. तसेच यंदाही तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. यामुळे उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारणांनी यंदाही देशातील उत्पादन गेल्यावर्षीएवढेच राहील, अशी शक्यता आहे. ही स्थिती मका बाजाराला आधार देणारी ठरू शकते.
देशात मक्याचा वापर इथेनाॅलसाठी वाढल्याने बाजारातील समिकरणही बदलत आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी तब्बल ६० टक्के मका पोल्ट्री आणि पशुखाद्यासाठी जातो. पोल्ट्री उद्योगाचा वर्षाला मका वापर १६० ते १७० लाख टनांच्या दरम्यान आहे. पशुखाद्यासाठी ५० ते ७० लाख टन मका जातो. स्टार्च उद्योगाचाही वापर ५० ते ७० टनांच्या दरम्यान असतो. अन्न प्रक्रिया उद्योगात ३० ते ४० लाख टन मका वापरला जातो. इतर क्षेत्रांतही ५० ते ६० लाख टनांचा वापर होतो. पण इथेनाॅलसाठी मागील वर्षापासून मक्याचा वापर वाढत आहे. गेल्या हंगामात इथेनाॅलसाठी ७० लाख टनांच्या दरम्यान मक्याचा वापर झाल्याची शक्यता आहे. यंदा तर आणखी मका इथेनाॅलासाठी जाईल.
यंदा इथेनाॅलसाठी १०७ लाख टनांच्या दरम्यान मका वापरला जाण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी मक्यापासून इथेनाॅलची तब्बल ४३१ कोटी लिटर मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी १०७ लाख टन मका लागेल. म्हणजेच मक्याला यंदाही चांगली मागणी आहे. मक्यासाठी पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांना स्पर्धा करावी लागेल. मक्याची आयातही मर्यादीत राहण्याची शक्यता आहे. कारण देशात जीएम मका आयातीला परवानगी नाही. ही परिस्थिती मका बाजाराला आधार देणारी ठरणार आहे.
सध्या मक्याचा बाजार देशभरात २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. पण वाढती मागणी आणि उत्पादन पाहता मक्याच्या भावात पुढील काळात सुधारणा होण्याची शक्यता आहे. इथेनाॅल उद्योगाकडून मागणी वाढल्यानंतर बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते. मक्याचा बाजारात पुढील काळात २ हजार ६०० ते २ हजार ८०० रपयांची पातळी दिसू शकते. तसेच सरकारने मक्याबाबत धोरण बदलल्यास त्याचाही परिणाम दरावर दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.