
Maize Rate Update : देशातील मका बाजाराला गेल्या वर्षभरापासून इथेनाॅलने कलाटणी दिली आहे. यंदाही इथेनाॅल गेमचेंजर ठरणार हे जवळपास निश्चित झाले आहे.देशात मक्याचे पारंपरिक ग्राहक पोल्ट्री, पशुखाद्य आणि स्टार्च उद्योग आहेत. पण या उद्योगांना इथेनाॅल उद्योगाशी स्पर्धा करावी लागत आहे.
देशातील एकूण उत्पादनापैकी तब्बल ६० टक्के मका पोल्ट्री आणि पशुखाद्यासाठी जातो. पोल्ट्री उद्योगाचा वार्षिक मका वापर १६० ते १७० लाख टनांच्या दरम्यान आहे. तर ५० ते ७० लाख टनांच्या दरम्यान मका पशुखाद्यासाठी जातो.
स्टार्च उद्योगातही मक्याचा वापर ५० ते ७० टनांचा आहे. अन्न प्रक्रिया उद्योगात ३० ते ४० लाख टन मका वापरला जातो. इतर क्षेत्रांतही ५० ते ६० लाख टन मका वापरला जातो. तर काही प्रमाणात मक्याचा शिल्लक साठा राहतो.
देशाच्या मका ताळेबंदाचे हे चित्र इथेनाॅलने बदलले. केंद्र सरकारने २०२५-२६ मध्ये इंधनात २० टक्के इथेनाॅल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धान्यापासून इथेनाॅल निर्मितीला प्रोत्साहन दिले. मात्र मागील हंगामात दुष्काळी परिस्थिती होती.
त्यामुळे सरकारने धान्यापासून इथेनाॅल निर्मितीवर बंधने आणली. मात्र इथेनाॅलसाठी मक्याला प्रोत्साहन दिले. त्यासाठी ६ जानेवारी २०२४ रोजी मक्यापासून निर्मित इथेनाॅलची किंमत वाढवून ७१.८६ रुपये केली.
तर इतर खराब धान्यापासून निर्मित इथेनाॅलची किंमत ६४ रुपये प्रतिलिटर आहे. त्यामुळे सहाजिकच मक्याचा वापर इथेनाॅसाठी वाढला. मागील हंगामातच इथेनाॅसाठी जवळपास ६० लाख टन मक्याचा वापर झाला.
बाजारात मक्याला उठाव वाढल्याने मक्याच्या किमती वाढल्या होत्या. मात्र खरिपातील मका बाजारात दाखल झाल्यानंतर भाव कमी झाले. पण खरिपातील मका बाजारात दाखल झाल्यानंतरही मक्याच्या भावात दरवर्षीप्रमाणे मोठी पडझड दिसली नाही.
नोव्हेंबरमध्ये नवा माल बाजारात आल्यानंतर भाव १६०० रुपयांपासून सुरू झाले होते. पण जसजसा मक्यातील ओलावा कमी होत गेला आणि गुणवत्ता सुधारत गेली तशी मक्याच्या भावात वाढ झाली.
विशेष म्हणजे बाजारातील मक्याची आवक वाढत असतानाही दरात सुधारणा पाहायला मिळाली. सरकारने यंदा मक्यासाठी प्रति क्विंटल २ हजार २२५ रुपये हमीभाव जाहीर केला. सध्या देशातील बहुतांशी बाजारांमध्ये हमीभावाच्या दरम्यान भाव पोहोचला.
तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि तमिळनाडूमध्ये मक्याचा भाव हमीभावापेक्षा जास्त आहे. या राज्यांमध्ये मक्याचा सरीसरी भाव २ हजार २५० ते २ हजार ३७५ रुपयांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रातही बहुतांशी बाजारांमध्ये भावपातळी २ हजार १०० ते २ हजार २५० रुपयांच्या दरम्यान आहे.
उत्पादनाचे अंदाज
देशात गेल्या हंगामात ३७६ लाख टन मका उत्पादन झाले होते. देशात मक्याचे भाव चांगले होते; त्यामुळे खरिपातील मक्याची लागवड जवळपास ४.५ टक्क्यांनी वाढून ८७ लाख हेक्टरवर पोहोचली होती. तर चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे यंदा खरिपातील मका उत्पादनात १० टक्क्यांची वाढ होईल, असा सरकारचा अंदाज आहे.
गेल्या खरिपात २२२ लाख टन मका उत्पादन झाले होते. यंदा ते २४५ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला होता. पण महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मका पिकाला पावसाचा फटका बसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सरकारचा खरिपातील विक्रमी मका उत्पादनाचा अंदाज चुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मक्याला मागणी असल्याने रब्बीतही मक्याची लागवड जास्त राहण्याची चिन्हे आहेत. सध्या रब्बीची लागवड सुरू आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये लागवडीचे चित्र स्पष्ट होईल. पण उत्तर भारतात यंदा गहू आणि मोहरी पिकालाही शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे.
उसाकडेही शेतकऱ्यांचा ओढा आहे. त्यामुळे रब्बीतही फार मोठे क्षेत्र वाढण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे रब्बी हंगामात मक्याची लागवड वाढली तरी मक्याच्या उत्पादनात १० टक्क्यांपर्यंत वाढ शक्य नसल्याचे उद्योग क्षेत्रातील काही जाणकारांनी सांगितले.
दुसरीकडे अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) भारताचे मका उत्पादन ३७५ लाख टनांवरच स्थिरावण्याचा अंदाज दिला. तर भारताचा मक्याचा वापर ३८६ लाख टनांवर म्हणजेच उत्पादनापेक्षा ११ लाख टनांनी जास्त राहील, असे म्हटले आहे.
म्हणजेच मक्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे भारतातून निर्यात कमी होऊन आयात वाढत आहे. जिथे भारताची मका निर्यात २० ते ४० लाख टन असायची ती मागील हंगामात ४.५ लाख टनांवर स्थिरावली. तर आयात १० लाख टनांच्या घरात पोहोचलेली दिसते.
इथेनाॅलवर भिस्त
गेल्या हंगामात मका बाजाराला कलाटणी देणारा इथेनॉल यंदाही गेमचेंजर ठरणार आहे. कारण यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त मका इथेनाॅलकडे वळणार आहे. तेल मार्केटिंग कंपन्यांनी नुकतेच पुरवठा वर्ष २०२४-२५ साठी ८३७ कोटी लिटर इथेनाॅलची मागणी केली. यापैकी तब्बल ४३१ कोटी लिटरची मागणी मक्यापासून निर्मित इथेनाॅलची आहे.
एकूण मागणीच्या ती तब्बल ५१.५ टक्के भरते. त्यानंतर उसाच्या रसापासून निर्मित इथेनाॅलची मागणी १८८ कोटी लिटर, बी हेवी मोलॅसिस जवळपास ११४ कोटी लिटर, खराब धान्यापासून ९३.८ कोटी लिटर आणि सी हेवी मोलॅसिसपासून निर्मित इथेनाॅलची मागणी ९.१५ कोटी लिटर नोंदविली गेली आहे.
थोडक्यात काय, तर सरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टाची मदार प्रामुख्याने मक्यापासून निर्मित इथेनाॅलवर आहे. आता तेल कंपन्यांनी चालू हंगामात मक्यापासून निर्मित इथेनाॅलची ४३१ कोटी लिटर मागणी केली. इथेनाॅल उताऱ्याचा विचार केला तर एक टन मक्यापासून साधारणतः ३७० ते ३८० लिटर इथेनाॅल मिळते.
आपण अगदी वरच्या बाजूला ४०० लिटर जरी पकडले तरी ही मागणी पूर्ण करण्यासाठी १०७ लाख टन मक्याची आवश्यकता आहे. नुकत्याच सरलेल्या हंगामात जवळपास ६० लाख टन मक्याचा वापर झाला. म्हणजेच यंदा मक्याचा इथेनाॅलमध्ये वापर जवळ जवळ दुप्पट होण्याची शक्यता आहे.
आता देशात इथेनाॅलसाठी खरंच एवढा मका जाईल का, याविषयी मतभिन्नता आहे. उद्योगविश्वातील काही जाणकारांच्या मते १०० लाख टनांपेक्षा जास्त मका इथेनाॅलकडे वळणार नाही. तर काही जणांच्या मते ८५ ते ९० लाख टन मका इथेनाॅलसाठी जाईल.
थोडक्यात, याबाबतीत मतभिन्नता असली तरी इथेनाॅलसाठी मक्याचा वापर गेल्या वर्षीपेक्षा जास्त होणार, हे मात्र नक्की. म्हणजेच मक्याच्या उत्पादनातील वाढीपेक्षा इथेनाॅलसाठी मक्याची मागणी खूपच जास्त असणार आहे. नेमकी हीच बाजू मका बाजाराला आधार देणारी ठरू शकते.
सरकारच्या धोरणाकडे लक्ष
इथेनाॅल उत्पादक कंपन्या सर्व प्रकारच्या इथेनाॅलच्या दरात वाढ करण्याची मागणी करत आहेत. तर धान्यापासून इथेनाॅल निर्मिती करणारे उद्योग सर्व धान्यांपासून निर्मित इथेनाॅलसाठी एकच दर देण्याचे धोरण राबविण्याची मागणी करत आहेत. पण सरकारने मक्याला इथेनाॅलकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक मक्यापासूनच्या इथेनाॅलला जास्त दर दिला आहे.
पण सरकार पुढच्या काही दिवसांमध्ये सर्व प्रकारच्या इथेनाॅलच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. यात सरकार मक्यापासून निर्मित आणि इतर इथेनाॅलचे दर धोरणे काय आखते, याचाही बाजारावर परिणाम होणार आहे. त्यामुळे बाजाराचे लक्ष सरकारच्या धोरणाकडे आहे.
मक्याची दरवाढ अपेक्षित
देशातील मक्याला यंदा मागणी वाढणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आयातवाढीचाही अंदाज लावला जात आहे. मात्र देशात जीएम मका आयातीला परवानगी नाही. नाॅन जीएम मका आयात केला जातो. मागील हंगामात आयात विक्रमी १० लाख टनांवर पोहोचली होती. प्रामुख्याने म्यानमार आणि युक्रेनमधून आयात झाली.
यंदाही मक्याला उठाव चांगला राहण्याच्या शक्यतेमुळे ऐन आवकेच्या हंगामात मक्याने हमीभावाची पातळी गाठली. यापुढच्या काळातही मक्याची मागणी कायम राहील व बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंतची सुधारणा अपेक्षित आहे.
तर हंगामाच्या शेवटी मका २६०० ते २८०० रुपयांचाही टप्पा गाठू शकतो, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. परंतु सरकारने आपले आयात-निर्यात धोरण किंवा इथेनाॅलबाबतचे धोरण बदलले तर त्याचा बाजारावर परिणाम होऊ शकतो, हेही लक्षात असू द्यावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.