Kolhapur News : देशात यंदा चांगला मॉन्सून आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेपासून इथेनॉल निर्मिती वाढण्याची शक्यता आहे. तसेच केंद्राने मक्यासारख्या पिकांचे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न सुरू केल्याने साखर व धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीत पुढील वर्षात (नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५) ६०० कोटी लिटरपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या क्रिसिल रेटिंग कंपनीने हा अंदाज वर्तवला आहे. यंदाच्या हंगामात हे उत्पादन ३८० कोटी लिटरपर्यंत झाले आहे.
गेल्या वर्षी देशाच्या इथेनॉल मिश्रणाला दोन घटकांमुळे मोठा धक्का बसला. गेल्या वर्षी पाऊस नसल्याने मक्यासह अन्य धान्याच्या उत्पादकतेवर परिणाम झाला, यामुळे धान्यावर आधारित इथेनॉल निर्मिती होऊ शकली नाही. तर दुसरीकडे कमी साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने इथेनॉलकडे वळविण्यात येणाऱ्या साखरेवर ही निर्बंध घालण्यात आले.
या दोन्ही घटकांचा मोठा फटका इथेनॉल निर्मितीला बसला. याचा प्रतिकूल परिणाम इथेनॉल तयार करण्यावर झाला. अनेक प्रकल्प बंद राहिले तर काही क्षमतेपेक्षा कमी इथेनॉल निर्मिती केली.
याचा फटका इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला बसला. तेल कंपन्यांकडे शिल्लक साठा असल्याने तेल कंपन्यांनी त्याचा आधार घेऊन मिश्रण सुरू ठेवले. यंदा मात्र मिश्रणाचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी जादा इथेनॉल निर्मिती करणे गरजेचे आहे.
२०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. यासाठी ९९० कोटी लिटर वार्षिक पुरवठा होणे गरजेचे आहे. २०२१ पासून केंद्राच्या प्रोत्साहनाने प्रत्येक वर्षी इथेनॉल मिश्रणात वाढ झाली. यंदा साखर उद्योगातील अनेक संस्थांनी पुढील हंगामाच्या प्रारंभापर्यंत गरजेपेक्षा जास्त साखर शिल्लक राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
इथेनॉलसाठी शिल्लक साखर, मका वापरणार
साखर शिल्लक राहण्याची शक्यता असल्याने केंद्र प्राधान्याने इथेनॉल निर्मितीसाठी साखर वापरायला परवानगी देऊ शकते. यामुळे यंदा ४० लाख टनांपर्यंत पर्यंत साखर इथेनॉलसाठी वापरण्यात येऊ शकते असा अंदाज आहे. मका पिकाच्याही लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने पुढे हंगामात हा मका मोठ्या प्रमाणात बाजारात येईल व त्याचा वापर इथेनॉल वाढीसाठी होऊ शकतो, असा संस्थेचा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.