Rose Flower Farming पुणे ः कोरोना काळात गुलाब उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरत असताना वाढलेले वाहतूक दर आणि सरकारने आकारलेले १८ टक्के ‘जीएसटी’चे भूत मानगुटीवर बसले आहे.
त्यामुळे निर्यातीचा खर्च तीन पटींपर्यंत गेला असल्याने मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्याचा फटका निर्यातीला बसत आहे.
त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक नुकसानीच्या खाईत लोटला जात आहे. सरकारने हा जीएसटी रद्द करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फूल उत्पादन मावळ तालुक्यात होते. व्हॅलेंटाइन डे’च्या काळात या फुलांना मोठी मागणी असते.
त्या पार्श्वभूमीवर मावळसह जिल्ह्यातून निर्यात करण्यासाठी दोन महिने अगोदर शेतकरी गुलाबाचे उत्पादन घेण्याची तयारी सुरू करतात.
त्यानुसार गुलाबाचे अधिक उत्पादन घेण्याकडे लक्ष असते. साधारणपणे २५ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात गुलाबांची मोठी निर्यात केली जाते.
मावळ तालुक्यात २५०-३०० हेक्टरवर गुलाब क्षेत्र आहे. यामध्ये ३० टक्के खासगी कंपनी व ७० टक्के शेतकरी उतरला आहे. देशातील एकूण उत्पादनाच्या ७० टक्के गुलाब फुलांचे उत्पादन मावळात होते. निर्यातीतून देशाला परकीय चलनही मिळते.
येथे अनेक प्रकारच्या जातीचे व रंगाचे गुलाब उत्पादन घेतले जाते. त्यात मुख्यत्वे ‘व्हॅलेंटाइन डे’साठी लाल रंगाच्या (टॉप सिक्रेट या जातीच्या) फुलांना जास्त मागणी असते. दरवर्षी एकट्या मावळ तालुक्यातून ७०-८० लाख फुलांची निर्यात होत होती.
परंतु वाहतूक दर वाढल्याने शेतकरी आता कमी निर्यात करत आहेत. यंदा तालुक्यातून ३० -४० लाख फुलांची निर्यात होण्याची शक्यता आहे.
सध्या तालुक्यात काढणीची लगबग सुरू असून, शेतकऱ्यांपुढे विक्रीचा मोठा प्रश्न आहे. त्यातच निर्यातक्षम माल तयार करण्यासाठीचा खर्च वाढला आहे. टॉनिकचे डोस, औषध फवारणी, रासायनिक खते, मजुरी यावर मोठा खर्च होतो.
त्यामुळे परदेशात निर्यात करणे म्हणजे तोटा सहन करणे अशी भावना तयार होत आहे. त्यातच शासनाकडून निर्यातीसाठी उत्पादकांना कोणतीही सवलत मिळत नाही.
यंदा २९ जानेवारी रोजी पहिली गुलाबाची शिफमेट परदेशात रवाना झाली. गुरुवारपर्यंत (ता.९) परदेशात माल पाठविण्यात येईल. त्यानंतर सर्व माल स्थानिक बाजारपेठेत पाठविला जाईल. कोरोनापूर्वी गुलाबाचा वाहतूकदर प्रतिकिलो ९० - ११५ रुपयांच्या दरम्यान होता.
कोरोना काळात हा वाहतूक दर ३०० रुपयांपर्यंत गेला. परंतु सर्व काही सुरळीत झाल्यानंतर उत्पादकांना वाहतूक दर कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र तसे न घडता नुकतेच वाहतुकीवर १८ टक्के जीएसटी आकारण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे वाहतूक दर आणि जीएसटी असे मिळून शेतकऱ्यांना प्रति किलोला ३४५ रुपयांपर्यंत निर्यातीचा खर्च येत आहे. परदेशात गुलाबाला चांगली मागणी असूनही केवळ वाहतूक दर व जीएसटीमुळे माल पाठविण्यात अडचणी येत आहेत.
परदेशात व स्थानिक बाजारपेठेत एकसारखाच दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्याकडे कल आहे.
गुलाब विक्रीची स्थिती
- देशांतर्गत दिल्ली, सुरत, अहमदाबाद, बडोदा, गुवाहाटी, राजकोट, जम्मू, हैदराबाद, पटना, पुणे, मुंबई येथे विक्री
- परदेशातील हॉलंड, जपान, ऑस्ट्रेलिया, दुबई, अमेरिका, मलेशिया येथे निर्यात
- निर्यातीसाठी प्रतिफूल सरासरी २२ रुपयांपर्यंत ठरविला होता दर
- सध्या निर्यातीसाठी वाहतूक, जीएसटीसह प्रतिफूल ११-१२ रुपये खर्च
- स्थानिक बाजारपेठेत प्रतिफूल सरासरी १४-१५ रुपये दर
यंदा पवना फूल उत्पादक संघाद्वारे ‘व्हॅलेंटाइन डे’साठी दहा लाख फुले निर्यात करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु परदेशात आणि स्थानिक बाजारपेठेतील दर जवळपास एकसारखाच आहे. त्यामुळे विक्री कुठे करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
- मुकुंद ठाकर, अध्यक्ष, पवना फूल उत्पादक संघ, पवनानगर, मावळ.
जीएसटीमुळे खर्चात वाढ झाल्याने गुलाबाच्या दरात वाढ झाली आहे. मात्र केनिया, इथोपिया या देशांतील गुलाबाचे दर कमी आहेत. त्यामुळे देशातील लाल रंगाच्या गुलाबाच्या ऑर्डर्स इतर देशाकडे वळल्या आहेत. त्याचा फटका राज्यातील गुलाब उत्पादकांना बसत आहे.
- नरेंद्र पाटील, सोएक्स फ्लोरा कंपनी, कान्हे फाटा, मावळ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.