Chana Market Update पुणे : बाजारातील हरभरा आवक (Chana Arrival) काहीशी वाढलेली दिसते. पण हरभरा बाजाराभाव (Chana Market Rate) टिकून आहेत. ‘नाफेड’ची खरेदीही (Chana NAFED Procurement) सुरू असल्याने बाजाराला आधार मिळत आहे.
‘नाफेड’ची खरेदी कशी राहते, याकडे बाजाराचे लक्ष आहे. तसेच पुढील काळात ‘नाफेड’ची खेरदी आणि विक्रीनुसारच दरात चढ उतार दिसू शकतात, असे हरभरा बाजारातील व्यापारी आणि जाणकार सांगत आहेत.
देशातील बाजारात हरभरा आवक वाढत आहे. मात्र तरीही हरभरा बाजार स्थिर दिसतो. दुसरीकडे ‘नाफेड’ची हरभरा खरेदीही सुरू आहे. ‘नाफेड’ने देशात आतापर्यंत ५ लाख ८१ हजार टन हरभरा खरेदी केला. ‘नाफेड’ने आता महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेशसह उत्तर प्रेदशातही हरभरा खरेदी सुरू केली.
‘नाफेड’ने आतापर्यंत महाराष्ट्रातच सर्वाधिक हरभरा खेरदी केला. महाराष्ट्रातील खरेदी ३ लाख २९ हजार टनांवर पोहोचली. तर गुजरातमध्ये १ लाख ६४ हजार टन, कर्नाटकात ५२ हजार टन आणि आंध्र प्रदेशात ४६ हजार टनांचाी खरेदी झाली. तसेच उत्तर प्रदेशात आता कुठे ६८ टनांचा आकडा गाठता आला.
एप्रिलमध्ये शेतात असलेल्या हरभरा पिकाला पावसाचा फटका बसला. त्यामुळे सरकारच्या अंदजापेक्षा कमी उत्पादन होईल, हे निश्चित असल्याचे सांगितले जाते. मात्र ‘नाफेड’ आणि इतर सरकारी संस्थांकडे मागील हंगामातील हरभऱ्याचा साठा आहे.
सरासरी संस्था आणि बाजारातील पुरवठा पाईपालाईन मिळून मागील हंगामातील २२ लाख टन माल असू शकतो, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
सरकारने मागील वर्षभर कमी दरात हरभरा विकून बाजाराला हादरे दिले. परिणामी यंदाही व्यापारी आणि स्टॉकिस्ट सरकारच्या हरकतीवर लक्ष ठेऊन आहे.
तसेच ‘नाफेड’ची खरेदी कशी राहते, यावर बाजाराची दिशा अवलंबून राहील. कारण यंदाही हरभऱ्याचा सर्वात मोठा स्टॉकिस्ट सरकारचे असणार आहे.
देशात सध्या रमजान आणि लग्नसराईमुळे हरभऱ्याला उठाव आहे. पण पावसाळा सुरू झाल्यानंतर डाळीची मागणी कमी राहू शकते. त्यामुळे पुढील का काळ बाजार स्थिर राहील, असाही अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सध्याची भावपातळी
सध्या हरभऱ्याला खुल्या बाजारात ७ हजार ७०० ते ५ हजारांचा भाव मिळत आहे. पण बाजारातील आवक कमी आहे. केंद्र सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ३३५ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला.
त्यामुळे नाफेडला माल देण्याचाच प्रयत्न जास्ती जास्त शेतकऱ्यांचा आहे. परिणामी बाजारातील आवक कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. नाफेडला माल देण्याच्या कारणानेही अनेक शेतकऱ्यांनी हरभरा मागे ठेवला आहे.
दर टिकणार
एकूणच काय तर बाजाराची दिशा ही सरकारच्या खरेदीवर अवलंबून आहे. पण सध्याच्या पातळीवरून बाजार कमी होण्याची शक्यता दिसत नाही. कारण शेतकऱ्यांनी यंदा बाजारावर आवकेचा दबाव आतापर्यंत येऊ दिला नाही.
तसेच तूर, मूग आणि उडदाचे दरही तेजीत आहेत. याचा आधार हरभऱ्याला मिळत आहे. त्यामुळे आवकेच्या काळात हरभरा दर टिकून राहतील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.