Jowar Fodder Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jowar Fodder Rate : बार्शीचा ज्वारी कडबा खातोय राज्यात ‘भाव’

Team Agrowon

अविनाश पोफळे

Pune News : ज्वारीच्या कडब्याचा राज्यातील प्रमुख बाजार असलेल्या बार्शी (जि. सोलापूर) यथे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कडब्याची आवक ४० टक्क्यांनी घटली आहे. तर दरात सुमारे ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. यामुळे पशुधनाचे आवडीचे, पौष्टिक खाद्य म्हणून ओळख असलेला हा कडबा सध्या ‘भाव’ खात आहे.

कडब्याला सध्या १३५० ते १४७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हाच दर गेल्या वर्षी या काळात ५०० ते १२५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होता. गेल्या वर्षी, तसेच ज्वारी काढणी हंगामात दररोज १५० टनांपर्यंत असलेली कडब्याची आवक सध्या ८० ते ९० टनांपर्यंत खाली आली आहे.

त्यामुळे दरात वाढ झाली असल्याची माहिती कडबा खरेदीदार, कडबा कुट्टी कारखानदारांनी दिली आहे. आताच्या रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी मार्चमध्ये सुरू होईल. तोपर्यंत आवक कमी होत जाईल. त्यामुळे दर स्थिर राहतील अथवा थोडेसे वाढतील, असा कडबाकुट्टी कारखानदारांचा अंदाज आहे.

बार्शीतील कडबाकुट्टी कारखानदार संतोष बागमार म्हणाले, की बार्शी हे कडबा खरेदी-विक्रीचे राज्यातील प्रमुख मार्केट आहे. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातून बार्शी येथे कडब्याची आवक होते. मार्च, एप्रिलमध्ये सुरुवातीला आवक चांगली होती.

सध्या मात्र केवळ सोलापूर जिल्ह्यातूनच आवक सुरू आहे. सध्या दररोज ८० ते ९० टन माल येतोय. सध्या १३५० ते १४७५ रुपये प्रतिक्विंटल दर आहे. गेल्या वर्षी १५० टन माल दररोज येत होता. दर ५०० ते १२५० रुपये क्विंटल होता. मागील वर्षीपेक्षा यंदा दरात ३० ते ४० टक्के वाढ आहे.

सध्या लातूरसह मंगळवेढ्यातून (जि. सोलापूर) होणारी आवकही थांबली आहे. दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांनी कडबा राखून ठेवला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे स्थिती बदलेल. पुरेशा ओलीअभावी राहिलेल्या ज्वारीच्या पेरण्या आता होतील. त्यामुळे पुढील हंगामात कडबा उपलब्ध होईल. परिणामी मार्च, एप्रिलमध्ये कडब्याची आवक वाढेल. तोपर्यंत दर स्थिर राहतील, अशी स्थिती आहे, असेही बागमार यांनी सांगितले.

पांगरी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील शेतकरी प्रमोद माळी म्हणाले, की ४ हजार पेंढ्या कडबा होता. त्यातील दीड हजार पेंढ्या चार हजार रुपये शेकडा या दराने जागेवरच विकल्या. जनावरांसाठी अडीच हजार पेंढ्या गंज लावून शिल्लक ठेवल्या आहेत. एक पेंढी साधारण दोन ते अडीच किलोची भरते. बार्शी मार्केटच्या हिशेबाने शेकडा पेंढ्यांचे वजन २०० ते २५० किलो होते.

मुंबईतील (गोरेगाव) तबेलाचालक मोहितकुमार गरख म्हणाले, की तबेल्यात १५० म्हशी आहेत. मी मुंबईत दूधपुरवठा करतो. यंदा कडबा कुट्टीचे दर खूप वाढले आहेत. आवक कमी आहे. गेल्या वर्षी १० ते ११ रुपये प्रतिकिलो दर होते. यंदा ते १८ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे सध्या ही कुट्टी घेणे बंद आहे. त्याऐवजी सध्या सुकलेला घास वापरतो.

बार्शीतील कडबा कुट्टीला राज्यभर मागणी

बार्शीत १२ ते १३ कडबा कुट्टी कारखानदार आहेत. ते शेतकऱ्यांकडून कडबा विकत घेतात. त्याची कुट्टी बनवून पुणे, मुंबई, अमरावती या प्रमुख ठिकाणांसह राज्यभर पाठविली जाते. तबेले चालविणारे दूध उत्पादक हे यांचे प्रमुख ग्राहक आहेत. या कुट्टीला सध्या जागेवर पोच १७५० ते १८०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे.

जळगावच्या हायब्रीडसह सोयाबीन, मका कुट्टीलाही मागणी

मुंबईतील तबेलाचालक कडबा कुट्टीचे दर वाढल्याने त्यातुलनेत कमी दरात मिळणाऱ्या सोयाबीन कुट्टी, मका कुट्टी, जळगावच्या हायब्रीड कुट्टीचा वापर करीत आहेत. सोयाबीन कुट्टी ९ ते १० रुपये, सुका घास १२ रुपये, मका कुट्टी १० ते १२ रुपये, जळगावची हायब्रीड कुट्टी १२ ते १३ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे, अशी माहिती कुट्टीचे मुंबईतील व्यापारी किशोर कोटक यांनी दिली.

गावात सध्या १० ते २५ टक्केच कडबा शिल्लक आहे. पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी कडबा विकला. मात्र निसर्गाने यंदा फसविले. आता दुष्काळी स्थितीत अडचण झाली. नवीन कडबा येईपर्यंत अजून तीन-साडेतीन महिने काढायचेत.
- प्रमोद माळी, शेतकरी, पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर
कडबा कुट्टी ही जनावरांसाठी सर्वांत दर्जेदार चारा आहे. सोलापुरातील कडबा कुट्टीचा दर्जा उत्तम असतो. त्यामुळे त्याला मोठी मागणी आहे. सध्या सर्वच चाऱ्याचे दर वाढले आहेत. मात्र दुधाच्या दरात वाढ होत नाही. पावसाअभावी स्थिती आणखी बिकट बनली आहे. चाराटंचाईमुळे जिल्हाबंदी केली जाते. त्यामुळे दर आणखी वाढतात. त्याचा फटका बसतो.
- मोहितकुमार गरख, तबेलाचालक, गोरेगाव, मुंबई

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT